

पणजी: गोव्याचा उदयोन्मुख गुणवान क्रिकेटपटू वंश कुडतरकर याने सोमवारी प्रचंड एकाग्रता प्रदर्शित केली. त्याच्या चिवट फलंदाजीमुळे अखेर गोव्याविरुद्धच्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात राजस्थानला अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. वंश याने १५० चेंडू खिंड लढविताना नऊ चौकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावा केल्या. त्याने पहिल्या डावातही १५१ चेंडूंत ५७ धावांची खेळी केली होती.
तीन दिवसीय एलिट ब गट सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमच्या ब मैदानावर झाला. गोव्याचा गोलंदाज शौर्य चोडणकर याने पाच गडी टिपल्यामुळे राजस्थानचा पहिला डाव ५ बाद ३०६ वरून सोमवारी ३८६ धावांत संपुष्टात आला. त्यांना पहिल्या डावात १५८ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर पहिल्या डावात ९५ धावा केलेला युवराज दाभोळकर (३२) व कर्णधार विश्राम परब (२९) यांनी दुसऱ्या डावात गोव्याला ६४ धावांची सलामी दिली, मात्र नंतर डाव ६ बाद ११८ असा गडगडला.
अखेरच्या दिवसाचे जवळपास एक सत्र बाकी असल्यामुळे राजस्थानला विजयाची संधी प्राप्त झाली. प्रतिस्पर्ध्यांचे मनसुबे उधळून लावताना वंश याने ईशांत तिवरेकर (नाबाद २१, ६२ चेंडू, ४ चौकार) याच्या साथीत खिंड लढविली. त्यामुळे राजस्थानला अनिर्णित निकाल मान्य करावा लागला. तिसऱ्या दिवशी खेळ थांबला तेव्हा गोव्याने दुसऱ्या डावात ६ बाद १५७ धावा केल्या होत्या. वंश व ईशांत यांनी तब्बल १३१ चेंडू खिंड लढविताना सातव्या विकेटसाठी ३९ धावांची अभेद्य भागीदारी केली. अनिर्णित लढतीतून राजस्थानला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण, तर गोव्याला एक गुण मिळाला. गोव्याचा पुढील सामना १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत लखनौ येथेच कर्नाटकाविरुद्ध होईल.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव : २२८
राजस्थान, पहिला डाव (५ बाद ३०६ वरून) ; ८५.२ षटकांत सर्वबाद ३८६ (कुमार वासुदेव १५३, शौर्य चोडणकर २३.२-४-७४-५).
गोवा, दुसरा डाव : ७४ षटकांत ६ बाद १५७ (युवराज दाभोळकर ३२, विश्राम परब २९, संच नाईक ४, वंश कुडतरकर नाबाद ५९, शौर्य चोडणकर २, तनिष्क नाईक १, मृणाल नाईक २, ईशांत तिवरेकर नाबाद २१, लव्हमीत गुर्जर ४-२७, निलय अरोरा २-२१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.