पणजी: छत्तीसगडचा संघ मोठ्या धावसंख्येच्या दिशेने कूच करत असताना गोव्याने सामन्याच्या पहिल्या दिवशी अखेरच्या सत्रात मुसंडी मारली, त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना सोमवारी दिवसअखेर ७ बाद २८९ धावांची मजल मारता आली.
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसीय सामना अळूर-बंगळूर येथे सुरू आहे. फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ व मोहित रेडकर यांनी सात धावांत एकत्रितपणे तीन गडी बाद केले, त्यामुळे ४ बाद २६४ वरून छत्तीसगडची ७ बाद २७१ अशी घसरगुंडी उडाली. छत्तीसगडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती.
भूपेन लालवानी याला डावखुरा वेगवान अर्जुन तेंडुलकरने बाद केल्यामुळे छत्तीसगडला प्रारंभीच धक्का बसला. नंतर मोहित रेडकर याने आदित्य सिंग याला बाद करून दुसऱ्या विकेटची ४८ धावांची भागीदारी फोडली, मात्र ऋषभ तिवारी (८६) व संजीत देसाई (७७) यांनी गोव्याच्या गोलंदाजांचे वर्चस्व झुगारून लावले. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. मोहितने संजीतला बाद करून धोकादायक जोडी फोडली.
अर्जुन तेंडुलकरने सानिध्य हुरकत याला जास्तवेळ टिकू दिले नाही. दिवसातील दहा षटकांचा खेळ बाकी असताना दर्शन मिसाळने जम बसलेल्या ऋषभसह दोघांना, तर मोहितने एकास बाद केल्यामुळे छत्तीसगडची घसरण झाली. दिवसअखेर कर्णधार शशांक सिंग ५० धावांवर खेळत होता. गोव्यातर्फे मोहितने तीन, तर अर्जुन व दर्शन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
छत्तीसगड, पहिला डाव ः ९० षटकांत ७ बाद २८९ (भुपेन लालवानी ४, ऋषभ तिवारी ८६, आदित्य सिंग २६, संजीत देसाई ७७, सानिध्य हुरकत १७, शशांक सिंग नाबाद ५०, पवन पर्नते ०, शुभम अग्रवाल २, सुमीत रुईकर नाबाद ७, लक्षय गर्ग १२-१-३३-०, अर्जुन तेंडुलकर १८-५-४०-२, विजेश प्रभुदेसाई १५-३-४५-०, दीपराज गावकर ८-४-२७-०, मोहित रेडकर २४-२-९२-३, दर्शन मिसाळ १३-१-४३-२).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.