Ranji Trophy: 54 धावांत 4 फलंदाज बाद, मग स्नेहलची शतकी 'उसळी'; बिहारविरुद्ध गोव्याची दमदार धावसंख्या!

Goa vs Bihar Ranji Trophy: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मागील पाच डावांत फक्त आठ धावा केलेला अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याने सोमवारी संघ संकटात असताना प्रेक्षणीय नाबाद शतक झळकावले.
Goa vs Bihar Ranji Trophy
Ranji TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मागील पाच डावांत फक्त आठ धावा केलेला अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर याने सोमवारी संघ संकटात असताना प्रेक्षणीय नाबाद शतक झळकावले. त्यामुळे एलिट अ गट सामन्यात गोव्याला बिहारविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ६ बाद २८८ असा दमदार पल्ला गाठता आला. कर्णधार अभिनव तेजराणा याने अर्धशतकी खेळी केली.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू असलेल्या सामन्याचा पहिला दिवस ३१ वर्षीय स्नेहलने गाजविला. हा शैलीदार फलंदाज दिवसअखेर ११६ धावांवर खेळत होता. त्याने जबाबदारीने फलंदाजी करताना १९४ चेंडूंतील खेळीत १२ चौकार लगावले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर संघ ४ बाद ५४ असा संकटात असताना स्नेहल गोव्यासाठी संकटमोचक ठरला.

Goa vs Bihar Ranji Trophy
Goa Police: लाचखोरी, कोठडीतील मारहाण ते लैंगिक अत्याचाराचे आरोप; गोव्यात 10 महिन्यांत 26 पोलिस निलंबित!

त्याने कर्णधार अभिनव तेजराणा (७३, ११० चेंडू, ८ चौकार) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. खलिद आलम याने अभिवनला पहिल्या स्लीपमध्ये झेलबाद केल्यानंतर स्नेहलने यश कसवणकर (२८) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करत संघाला द्विशतक गाठून दिले. नंतर स्नेहलने सातव्या विकेटसाठी दर्शन मिसाळ (नाबाद २४) याच्यासमवेत ६२ धावांच्या अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे गोव्याला तीनशे धावांचे लक्ष्य बाळगता आले.

त्यापूर्वी, सकाळच्या सत्रात पदार्पण करणारा २० वर्षीय वेगवान गोलंदाज वासुदेव प्रसाद सिंग याने किंचित ढगाळ वातावरणाचा सुरेख लाभ उठवला, त्यातच गोव्याच्या फलंदाजांनी खराब मालिका कायम राखल्यामुळे यजमानांचा डाव उपाहारापूर्वीच संकटात सापडला होता. सुयश प्रभुदेसाईने पहिल्या स्लीपमध्ये, मंथन खुटकरने यष्टिरक्षकाकडे, शिवेंद्र भुजबळने स्वेअर लेगला बिहारच्या क्षेत्ररक्षकांना झेलांचा सराव दिला.

या तिघांनाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. ललित यादवला ऑफस्पिनर सूरज कश्यपने पायचीत बाद केले. बिहारतर्फे या लढतीत वासुदेव प्रसाद सिंग व १७ वर्षीय पृथ्वी राज यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विदर्भाविरुद्ध पराभूत झालेल्या गोव्याने संघात एक बदल करताना वेगवान शुभम तारी याच्याऐवजी वेगवान हेरंब परब याला संधी दिली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: ८७ षटकांत ६ बाद २८८ (सुयश प्रभुदेसाई ४, मंथन खुटकर १, शिवेंद्र भुजबळ ७, अभिनव तेजराणा ७३, ललित यादव १९, स्नेहल कवठणकर नाबाद ११६, यश कसवणकर २६, दर्शन मिसाळ नाबाद २४, वासुदेव प्रसाद सिंग २-३७, सूरज कश्यप २-५५, सुमन कुमार १-५४, खलिद आलम १-६१) विरुद्ध बिहार.

कारकिर्दीतील अकरावे शतक

स्नेहलने दिवसाच्या अखेरच्या सत्रात डावखुरा फिरकी गोलंदाज सुमन कुमार याच्या गोलंदाजीवर फाईन लेग क्षेत्रात दोन धावा घेत कारकिर्दीतील अकरावे शतक साजरे केले. मागील डावांतील अपयशानंतर या शतकामुळे स्नेहलला प्रचंड दिलासा मिळाला. त्याची शतकी खेळी निर्दोष ठरली. गोव्याचा संघ संघर्ष करत असताना स्नेहलने स्थिरावल्यानंतर आत्मविश्वासाने फलंदाजी करत गोव्याला समाधानकारक स्थिती गाठून दिली. गोव्यातर्फे रणजी क्रिकेट स्पर्धेत यंदा नोंदविलेले हे पहिलेच शतक ठरले.

२२ महिन्यांनंतर ‘वनवास’ संपला

स्नेहल कवठणकर याचे तब्बल २२ महिन्यांनंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शतक

बिहारविरुद्धच्या नाबाद ११६ धावांपूर्वी ९ रणजी करंडक सामन्यांतील १६ डावांत शतकाविना

जानेवारी २०२५ मध्ये रणजी प्लेट अंतिम लढतीत सोविमा येथे नागालँडविरुद्ध दुसऱ्या डावात नाबाद २०२ धावांची खेळी

Goa vs Bihar Ranji Trophy
Goa PF Registration: सरकारी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! 2,220 जणांना पीएफ आणि विमा योजनेचा लाभ

२०२५-२६ मोसमात २ अर्धशतके (पंजाबविरुद्ध ७८, महाराष्ट्राविरुद्ध ७३ धावा), २०२६-२७ मध्ये १ अर्धशतक (बडोदाविरुद्ध ५० धावा)

रणजी करंडक क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांत स्वप्नील अस्नोडकर (१४) याच्यानंतर गोव्याचा दुसरा क्रिकेटपटू

६९ रणजी करंडक सामन्यांतील ११६ डावांत ११ शतके

- संकलन : किशोर पेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.