

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सर्वाधिक विकेट घेणारा डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकाती तब्बल नऊ वर्षांनी घरच्या मैदानावर क्रिकेट खेळणार आहे. निमित्त असेल वेर्णा येथील १९१९ स्पोर्टस मैदानावर नियोजित असलेली वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० क्रिकेट स्पर्धा. ४५ वर्षीय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजास राजस्थान लायन्सने संघात निवडले आहे.
वर्ल्ड लीजंड्स प्रो टी-२० क्रिकेटमध्ये निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भाग घेतील. स्पर्धा २६ जानेवारीपासून खेळली जाईल. शदाबने निवडीची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. ‘‘या प्रकारच्या लीग पूर्णतः वेगळ्या असतात. येथे लोक विकेट्स नाही, तर षटकार पाहायला येतात,’’ अशी मिश्कील प्रतिक्रिया त्याने आपल्या सहभागासंदर्भात व्यक्त केली.
राजस्थान लायन्स संघाचे नेतृत्व इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन करत असून सुरेश रैना,नमन ओझा, कॅलम फर्ग्युसन, जेपी ड्युमिनी, बेन कटिंग, एल्टन चिगुम्बुरा आदी माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू या संघात आहेत.
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत जानेवारी २०१८ मध्ये शदाब गोव्यातर्फे अखेरच्या वेळेस खेळला, पण ती स्पर्धा आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टमण येथे झाली होती. घरच्या मैदानावर शेवटचा स्पर्धात्मक प्रथम श्रेणी सामना तो ऑक्टोबर २०१७ मध्ये खेळला होता.
२४ ते २७ ऑक्टोबर २०१७ या कालावधीत पर्वरी येथे पंजाबविरुद्ध खेळल्यानंतर शदाबला गोव्याची ‘रणजी कॅप’ परिधान करता आली नाही. त्या सामन्याच्या पहिल्या डावात ५ गडी बाद करुनही या अनुभवी गोलंदाजास गोव्याच्या रणजी संघात नंतर निवडले गेले नाही. रणजी क्रिकेटमधील अंतिमठरलेल्या डावात शदाबने ४६-७-१६५-५ अशी ‘मॅरेथॉन’ गोलंदाजी केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.