
Sanjog Gupta ICC CEO: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) संजोग गुप्ता यांची नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली. संजोग गुप्ता यांनी सोमवारी (7 जुलै) ही जबाबदारी स्वीकारली. संजोग यांनी ऑस्ट्रेलियाचे जेफ अलार्डिस यांची जागा घेतली, जे 2021 पासून या पदावर होते. संजोग हे आयसीसीचे सातवे सीईओ असून मनु साहनीनंतर ही जबाबदारी स्वीकारणारे ते दुसरे भारतीय आहेत.
दरम्यान, संजोग गुप्ता सध्या जिओस्टारमध्ये सीईओ (Sports and Live Experience) म्हणून काम करत आहेत. भारतात खेळांच्या डिजिटल आणि टीव्ही प्रसारणाला एक नवीन दिशा देण्यात संजोग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल), आयसीसी स्पर्धा, प्रो कबड्डी लीग (पीकेएल) आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) सारख्या मोठ्या क्रीडा स्पर्धा लोकप्रिय करण्यात संजोग गुप्ता यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
संजोग गुप्ता यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2010 मध्ये स्टार इंडियामध्ये दाखल झाले. नंतर त्यांनी डिस्ने-स्टारमध्ये क्रीडा प्रमुख म्हणून काम केले. येथे संजोग यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा व्यवसायाचा व्यावसायिक विस्तार झाला. यासोबतच, प्रेक्षकांची संख्याही वाढली.
आयसीसीचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांनी संजोग गुप्ता यांच्याबद्दल सांगितले की, 'संजोग यांना स्पोर्ट प्लॅनिंगचा तगडा अनुभव आहे. क्रिकेटबद्दलची त्यांची आवड आणि तंत्रज्ञानाची समज जागतिक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावेल. ऑलिंपिकसारख्या व्यासपीठांवर क्रिकेटला नियमित स्थान मिळावे असा आमचा प्रयत्न आहे.' जय शाह यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही या पदासाठी अनेक उमेदवारांचा विचार केला होता, परंतु नामांकन समितीने एकमताने संजोग यांची शिफारस केली. आयसीसी संचालक मंडळ त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक असून मी आयसीसीमधील सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो.'
आयसीसीने मार्चमध्ये या पदासाठी निवड प्रक्रिया सुरु केली होती. यासाठी 25 देशांमधून 2500 हून अधिक अर्ज आले होते. त्यानंतर नामांकन समितीने एकमताने संजोग गुप्ता यांची निवड केली. संजोग गुप्ता म्हणाले की, 'ही जबाबदारी मिळणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा क्रिकेटचा (Cricket) जागतिक स्तरावर वेगाने विस्तार होत आहे.'
डेव्हिड रिचर्ड्स (ऑस्ट्रेलिया): 1993-2001
मॅल्कम स्पीड (ऑस्ट्रेलिया): 2001-2008
हारून लॉर्गट (दक्षिण आफ्रिका): 2008-2012
डेव्हिड रिचर्डसन (दक्षिण आफ्रिका): 2012-2019
मनु साहनी (भारत): 2019-2021
ज्योफ अॅलार्डिस (ऑस्ट्रेलिया): 2021-25
संजोग गुप्ता (भारत): 2025-
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.