
पणजी: डावाच्या सुरवातीस लागोपाठ तीन धक्के बसल्यानंतर कर्णधार राँगसेन जोनाथन याने हेम छेत्री याच्यासमवेत शतकी भागीदारी केल्यामुळे नागालँडचा संघ सावरत असल्याचे वाटत होते, मात्र धावबादमुळे जोडी फुटली आणि यजमान संघाने ३५ धावांत ५ गडी गमावले. यामुळे पडझडीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागीय अंतिम लढतीत शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याला आघाडीची संधी प्राप्त झाली.
पाच दिवसीय अंतिम लढत नागालँड (Nagaland) क्रिकेट असोसिएशनच्या सोविमा येथील मैदानावर सुरू आहे. कश्यप बखले (नाबाद ७९, १८८ चेंडू, ६ चौकार) याच्या झुंझार अर्धशतकामुळे गोव्याने पहिल्या दिवसअखेरच्या ७ बाद २५८ वरून शुक्रवारी पहिल्या डावात २७६ धावा केल्या. खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात सुमारे दोन तासांचा खेळ वाया गेला. दिवसअखेर नागालँडची ८ बाद २०५ अशी स्थिती झाली होती. ते अजून ७१ धावांनी मागे आहेत.
हेरंब परब याने सुरवातीला तीन धक्के दिल्यामुळे नागालँडची ३ बाद २५ अशी दाणादाण उडाली. यजमान संघाला सावरताना जोनाथन याने हेम याच्यासमवेत चौथ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. जम बसवलेल्या हेम याला सुयश प्रभुदेसाईने धावबाद केल्यानंतर नागालँडचा डाव गडगडला. ३ बाद १५९ वरून त्यांची ८ बाद १९४ अशी घसरण उडाली. त्यांचा आणखी एक फलंदाज इमलीवटी लेमतूर कश्यप बखलेच्या फेकीवर धावबाद झाला. हेम याने १३३ चेंडूंत सहा चौकारांसह ५५ धावा केल्या. धोकादायक जोनाथन याला गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याने त्रिफळाचीत बाद करून मोठा अडसर दूर केला. जोनाथनने ११६ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ८६ धावा केल्या.
गोवा (Goa), पहिला डाव (७ बाद २५८ वरून) ः १०४.२ षटकांत सर्वबाद २७६ (कश्यप बखले नाबाद ७९, अमूल्य पांड्रेकर ८, फेलिक्स आलेमाव ०, हेरंब परब ७, जे. सुचित ४-६९, इमलीवटी लेमतूर ३-३८).
नागालँड, पहिला डाव ः ६२ षटकांत ८ बाद २०५ (हेम छेत्री ५५, राँगसेन जोनाथन ८६, चेतन बिस्त नाबाद १७, हेरंब परब १०-१-२६-३, फेलिक्स आलेमाव ५-१-२७-०, मोहित रेडकर २४-५-६९-२, अमूल्य पांड्रेकर ४-०-२०-०, दर्शन मिसाळ १८-१-४९-१, सुयश प्रभुदेसाई १-०-७-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.