
पणजी: राजमाता जिजाबाई करंडक तिसाव्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी गोव्याला पराभवाचा धक्का बसला. अ गटातील लढतीत यजमान छत्तीसगडने त्यांना २-१ फरकाने नमविले. सामना नारायणपूर येथे झाला.
गोव्याने अखेरच्या दहा मिनिटांत दोन गोल स्वीकारल्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला. उत्तरार्धातील बदली खेळाडू देविका यादव छत्तीसगडच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिनेच दोन्ही गोल केले. ८२व्या मिनिटास गोव्याने गोलकीपर बदलताना रिया राजेश हिच्याजागी अशिका गडेकर हिला पाचारण केले होते.
सामन्याच्या ९०+५व्या मिनिटास गोल स्वीकारावा लागल्यामुळे गोव्याला पराभवाला सामोरे जावे लागले. यजमान छत्तीसगडला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून देताना देविका यादव हिने भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटास निर्णायक गोल नोंदविला.
त्यापूर्वी देविका हिनेच ८०व्या छत्तीसगडला सामन्यात १-१ अशी गोलबरोबरी साधून दिली होती. करिष्मा शिरवईकर हिने २८व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे अखेरची दहा मिनिटे बाकी असेपर्यंत गोव्याचा संघ सामन्यात आघाडीवर होता.
अ गटातील अन्य एका लढतीत बंगालने ओडिशाला १-० फरकाने नमविले. अगोदरच्या लढतीत बंगालला गोव्याने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. बंगालचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. छत्तीसगडचे दोन लढतीतून तीन गुण असून गोव्याच्या खाती फक्त एक गुण आहे. ओडिशाचा संघ पहिलाच सामना खेळला, तर अन्य एक संघ तमिळनाडूने एका लढतीतून तीन गुणांची कमाई केली आहे. त्यांनी अगोदरच्या लढतीत छत्तीसगडला नमविले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.