मोरजी: मांद्रे येथील यश शूटिंग हबमध्ये घेण्यात आलेली राष्ट्रीयपूर्व रायफल स्पर्धा यशस्वी ठरली. या स्पर्धेद्वारे आगामी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी स्पर्धक पात्र ठरले. गोव्यात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत देशभरातून पाच हजारपेक्षा जास्त नेमबाज सहभागी झाले होते, अशी माहिती यश शूटिंग अकादमीचे चेअरमन योगेश्वर पाडलोसकर यांनी दिली.
पत्रकार परिषदेस आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाज भाग्यश्री पाडलोसकर व राष्ट्रीय नेमबाज यश पाडलोसकर यांची उपस्थिती होती. यश शूटिंग हबमध्ये या स्पर्धेनिमित्त पूर्णतः वातानुकुलीत यंत्रणा सज्ज होती. या ठिकाणी १० मीटर, २५ मीटर, ५० मीटर रेंजवर स्पर्धा झाली. गोव्यात प्रथमच २५ मीटर व ५० मीटर रेंजवरील नेमबाजी स्पर्धा रंगली, असे योगेश्वर यांनी नमूद केले. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे गोव्यातील आठ ते दहा नेमबाज राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीयपूर्व रायफल स्पर्धेसाठी अखिल भारतीय रायफल शूटिंग असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष मन राजू भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. स्पर्धेला १८ ऑगस्ट रोजी सुरवात झाली.
योगेश्वर पाडलोसकर यांनी सांगितले, की ‘‘राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेला चार-पाच दिवस असताना यश शूटिंग अकादमीचा काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता, त्यामुळे याठिकाणी स्पर्धा होण्याबाबत साशंकता होती. मात्र आम्ही खचलो नाही. युद्धपातळीवर दुरुस्तीकाम हाती घेऊन स्पर्धा यशस्वीपणे घेऊ शकलो याचा अभिमान वाटतो. आगीत आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, मात्र पाच हजारापेक्षा जास्त स्पर्धकांच्या सहभागाने हुरूप वाढला. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.’’
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.