
पणजी: मडगाव येथे बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या ३८व्या राष्ट्रीय १३ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी संध्याकाळपर्यंत ५९७ प्रवेशिकांची नोंद झाली होती, त्यात आणखी खेळाडूंची भर अपेक्षित असून देशभरातील सहाशेच्या जवळपास बुद्धिबळपटूंत चुरस दिसेल.
स्पर्धा संकेतस्थळानुसार, मंगळवारी संध्याकाळी खुल्या गटात ३९५, तर मुलींच्या गटात २०२ खेळाडूंनी नोंदणी केली होती. स्पर्धेला बुधवारी (ता. ३) सुरवात होईल, पहिला डाव संध्याकाळी चार वाजल्यापासून खेळला जाईल.
स्पर्धा एकूण ११ फेऱ्यांची असून अखेरची फेरी ९ सप्टेंबर रोजी खेळली जाईल. खुल्या गटात कर्नाटकचा सिद्धार्थ पुंजा (एलो २२१५), तर मुलींत आंध्र प्रदेशची आमुक्ता गुंटाका (एलो २१०२) हिला अग्रमानांकन आहे.
स्पर्धेत एकूण आठ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. गोवा बुद्धिबळ संघटना व दैवज्ञ समाज मडगाव यांच्यातर्फे स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेला अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची मान्यता असून गोवा क्रीडा प्राधिकरणाचे सहकार्य लाभले आहे. दोन्ही गटातील विजेत्या खेळाडूस प्रत्येकी ८० हजार रुपये व करंडक दिला जाईल.
उपविजेत्या खेळाडूस ६० हजार रुपये, तर पुढील क्रमांकासाठी अनुक्रमे ४८ हजार रुपये, ३५ हजार रुपये, २८ हजार रुपये, २५ हजार रुपये, २२ हजार रुपये, १८ हजार रुपये, १४ हजार रुपये व १० हजार रुपये बक्षीस मिळेल. ११ ते २० क्रमांकापर्यंत खेळाडूस प्रत्येकी सहा हजार रुपये बक्षीस मिळेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.