

Jemimah Rodrigues Singing Video: भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स ही केवळ तिच्या दमदार फलंदाजीसाठीच नाही, तर तिच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या रिलायन्स फाउंडेशनच्या 'युनायटेड इन ट्रायम्फ' या कार्यक्रमात जेमिमाने पुन्हा एकदा आपल्या गायकीने सर्वांना थक्क केले. मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या जेमीने मंचावर गिटार हाती घेत जेव्हा सुर लावले, तेव्हा उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या खास कार्यक्रमात जेमिमाने 2005 मध्ये आलेल्या 'इक्बाल' या चित्रपटातील गाजलेले 'आशाएं' हे गाणे सादर केले. विशेष म्हणजे, तिने हे गाणे तिचे वडील इवान आणि आई लविता रॉड्रिग्स यांच्यासोबत मिळून गायले. 'आशाएं खिले दिल की' हे गाणे जिद्द, आशा आणि संघर्षाचे प्रतीक मानले जाते. क्रिकेटमधील स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या एका मुलाची कथा सांगणाऱ्या या चित्रपटातील गाण्याला जेमिमाने दिलेला आवाजाचा स्पर्श अतिशय भावूक होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून चाहत्यांनी तिच्या बहुमुखी प्रतिभेचे तोंडभरुन कौतुक केले आहे. काहींनी तर तिला "मल्टिटॅलेंटेड स्टार" असे संबोधले आहे.
जेमिमासाठी सध्याचा काळ केवळ कौतुकाचाच नाही, तर मोठ्या जबाबदारीचा देखील आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असून दिल्ली कॅपिटल्सने जेमिमा रॉड्रिग्सची आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. दिग्गज मेग लॅनिंगने यूपी वॉरियर्समध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या जागेसाठी दिल्लीने जेमिमावर विश्वास दाखवला आहे. 10 जानेवारी रोजी नवी मुंबईत मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) होणाऱ्या सामन्यातून जेमिमा आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.
जेमिमाच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केवळ भारतातच (India) नाही, तर परदेशातील दिग्गज खेळाडूही करत आहेत. दक्षिण आफ्रिकेची अनुभवी अष्टपैलू खेळाडू मॅरिजन कॅप हिने जेमिमाला हरमनप्रीत कौरनंतर भारतीय संघाची कर्णधार बनवण्यासाठी पाठिंबा दिला आहे. कॅप म्हणाली की, "जेमिमामध्ये नेतृत्व करण्याचे नैसर्गिक गुण आहेत. ती खेळाडूंना एकत्र ठेवण्याचे काम उत्तम प्रकारे करु शकते. तिचा मनमिळाऊ स्वभाव आणि खेळाची समज तिला एक यशस्वी कर्णधार बनवेल."
यापूर्वी, जेमिमाने घरगुती क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे यशस्वी नेतृत्व केले आहे, मात्र आता डब्ल्यूपीएलच्या मंचावर स्वतःला सिद्ध करण्याची तिला मोठी संधी मिळाली आहे. मैदानातील तिची फटकेबाजी आणि मंचावरील तिचे गाणे पाहून हे स्पष्ट होते की, जेमिमा केवळ एक खेळाडू नाही, तर एक खरी 'एंटरटेनर' आणि भविष्यातील एक कणखर कर्णधार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.