Inter Kashi FC: ‘इंटर काशी’च आय-लीग विजेते! ‘सीएएस’च्या आदेशानंतर AIFF कडून अधिकृत घोषणा

Inter Kashi ISL Winner: स्वित्झर्लंडमधील कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) यांनी शुक्रवारी इंटर काशी संघाला २०२४-२५ मधील आय-लीग फुटबॉल स्पर्धा विजेते घोषित करण्याचे निर्देश दिले.
Inter Kashi ISL Winner
Inter Kashi ISL WinnerDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: स्वित्झर्लंडमधील कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (सीएएस) यांनी शुक्रवारी इंटर काशी संघाला २०२४-२५ मधील आय-लीग फुटबॉल स्पर्धा विजेते घोषित करण्याचे निर्देश दिले. क्रीडा क्षेत्रातील या सर्वोच्च लवादाच्या आदेशाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) त्वरित अंमलबजावणी केली आणि नव्या विजेत्यांचे अभिनंदनही केले.

‘एआयएफएफ’च्या अधिकृत घोषणेनंतर आता इंटर काशी संघ २०२४-२५ मधील आय-लीग विजेते बनले असून २०२५-२६ मधील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत खेळण्याचीही संधी प्राप्त झाली आहे. ‘एआयएफएफ’ अपिल्स कमिटीच्या अगोदरच्या निर्णयानंतर गोव्यातील चर्चिल ब्रदर्स संघ अग्रस्थानी राहिला.

आता ‘सीएएस’च्या आदेशानंतर ‘एआयएफएफ’च्या नव्या विजेत्याच्या घोषणेमुळे चर्चिल ब्रदर्सला जेतेपदाचा करंडक व पदके परत करावी लागतील. चर्चिल ब्रदर्स संघ आता आय-लीगमध्ये उपविजेते असतील.

इंटर काशी एफसीने चर्चिल ब्रदर्स गोवा, नामधारी एफसी, रियल काश्मीर एफसी आणि ‘एआयएफएफ’विरुद्ध केलेल्या अपिलास ‘सीएएस’ने अंशतः मान्यता दिली आहे. ‘सीएएस’ने निर्णय दिला आहे, की ‘एआयएफएफ’ने इंटर काशी एफसीला आय-लीग २०२४-२५चे विजेते घोषित करावे, असे फुटबॉल महासंघाने स्पष्ट केले. ‘सत्यमेव जयते...सत्याचाच विजय होतो,’ अशी प्रतिक्रिया इंटर काशी एफसीने सोशल मीडियाद्वारे दिली.

पदकतक्यातील नवी स्थिती

‘सीएएस’च्या निर्णयानुसार, आय-लीग २०२४-२५ मधील अंतिम गुणतक्ता बदलला असून त्यानुसार इंटर काशी एफसीचे सर्वाधिक ४२, चर्चिल ब्रदर्स गोवाचे ४०, रियल काश्मीरचे ३७, तर नामधारी एफसीचे २९ गुण होतील. अग्रस्थानामुळे इंटर काशी संघ विजेता ठरला. एआयएफएफ अपिल्स कमिटीने ३१ मे रोजी दिलेल्या निवाड्यानंतर इंटर काशी संघाला अनुक्रमे रियल काश्मीर, नामधारी व चर्चिल ब्रदर्सविरुद्ध ३-० फरकाने पराभूत घोषित केले होते. प्रत्यक्षात इंटर काशी संघ २ मार्च रोजी रियल काश्मीरविरुद्ध ३-१ फरकाने पराभूत झाला होता, ६ मार्च रोजी नामधारी एफसीविरुद्ध ३-२ असा विजयी होता, तर ३० मार्च रोजी चर्चिल ब्रदर्सविरुद्ध २-२ अशी बरोबरी झाली होती. हे निकाल आता पुनर्स्थापित झाले आहेत.

Inter Kashi ISL Winner
AIFF: अपिल्स कमिटीचा पुन्हा इंटर काशीला धक्का! अपात्र खेळाडू खेळवल्याबद्दल कारवाई; आय-लीग ट्रॉफीसाठी चर्चिल ब्रदर्सचे स्थान भक्कम

यापूर्वीही इंटर काशीला दिलासा

‘सीएएस’ने याआधी १७ जून २०२५ रोजी इंटर काशी एफसीला दिलासा देताना ‘एआयएफएफ’ अपिल्स कमिटीचा आणखी एक निर्णय रद्द केला होता. ज्यामध्ये नामधारी एफसीने अपात्र खेळाडू खेळवल्याबद्दल लादलेली शिक्षा उठविण्यात आली होती. अपिल्स कमिटीच्या निर्णयाविरोधात इंटर काशीने ‘सीएएस’कडे दाद मागितली होती. क्रीडा लवादाने इंटर काशीचे अपिल मान्य करत ‘एआयएफएफ’ शिस्तभंग समितीचा मूळ निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे १३ जानेवारी २०२५ रोजी नामधारी एफसीविरुद्ध इंटर काशी संघाला विजयी घोषित करण्यात आले. तीन गुण मिळाल्यामुळे इंटर काशीने पुन्हा दुसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली होती.

Inter Kashi ISL Winner
ISL 2024-25: FC Goa ची प्लेऑफ सामन्यांसाठी जय्यत तयारी! काय आहेत उपांत्य फेरीची समीकरणे? वाचा

काय आहे प्रकरण?

३१ मे २०२५ रोजी ‘एआयएफएफ’ अपिल्स कमिटीने निर्णय दिला होता, की इंटर काशी एफसीने केलेली मार्को बार्को या परदेशी खेळाडूची नोंदणी वैध नव्हती. त्यामुळे या संघाने खेळलेले सामने पराभूत मानावे. त्यामुळे आय-लीग गुणतक्त्यात फेरबदल झाला आणि चर्चिल ब्रदर्स गोवा संघ अग्रस्थानी राहिला. इंटर काशी एफसीने २३ जून २०२५ रोजी या निर्णयाविरुद्ध ‘सीएएस’कडे अपिल दाखल केले आणि ‘एआयएफएफ’ अपिल्स कमिटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली. १५ जुलै २०२५ रोजी सीएएससमोर सुनावणी झाली. त्यानंतर ‘सीएएस’ मंडळाने ‘एआयएफएफ’चा ३१ मे रोजीचा निर्णय रद्द केला आणि आय-लीग २०२४-२५ स्पर्धेचा गुणतक्ता सुधारण्याचा आदेश दिला, अशी माहिती ‘एआयएफएफ’तर्फे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com