
पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या एफसी गोवाच्या कामगिरीत ‘विंगर’ ब्रायसन फर्नांडिस व गोलरक्षक ऋतिक तिवारी या २३ वर्षीय उदयोन्मुख फुटबॉलपटूंची कामगिरी लाजवाब ठरली आहे. त्यांचे कौतुक करताना सोमवारी संघाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी या दोघा खेळाडूंत भारतीय फुटबॉलचे भविष्य दडल्याचे नमूद केले, तसेच मोसमातील त्यांची प्रगतीपथावरील गुणवत्ता विलक्षण असल्याचे सांगितले.
सासष्टी तालुक्यातील लोटली येथील ब्रायसन याने यंदा आयएसएल स्पर्धेतील १९ सामन्यांत सात गोल व दोन असिस्टची नोंद केली आहे. आयएसएल स्पर्धेत जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही त्याला प्राप्त झाला.
मूळ गुवाहाटी येथील, पण एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघातून उदयास आलेल्या ऋत्विकने १३ सामन्यांत पाच क्लीन शीट्स राखताना ३९ फटके अडविले, तर १२ गोल स्वीकारले. एफसी गोवाच्या ओडिशा एफसीविरुद्धच्या मागील विजयी सामन्यात ऋतिकने अफलातून एकाग्रता प्रदर्शित करताना पेनल्टी फटका अडविला होता.
मार्केझ भारताच्या राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असल्याने ब्रायसन व ऋतिक यांना आगामी कालखंडात भारतीय संघात संधी मिळू शकते.
आयएसएल स्पर्धेत १९ सामन्यांत १० विजयांसह एफसी गोवाचे सध्या ३६ गुण आहेत. मोहन बागान संघ ४६ गुणांसह अव्वल आहे. एफसी गोवा बुधवारी (ता. १२) मुंबई येथे मुंबई सिटी एफसीविरुद्ध खेळेल. मुंबई सिटीचे सध्या १९ सामन्यांतून ३१ गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. एफसी गोवाविरुद्ध मुंबई सिटी सलग १३ सामने अपराजित आहे.
ब्रायसन याच्याविषयी मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘ब्रायसन सध्या फुटबॉलमधील प्रत्येक आनंद लुटत आहे. ही बाब खूपच महत्त्वाची आहे. गतमोसमात त्याला आपल्याला नेमके काय करायचे आहे याची जाणीव नव्हती, मात्र त्याने लक्ष्य निश्चित केले, सरावात मेहनत घेतली. त्याची प्रगती विलक्षण असून गुणवत्ता आगळी आहे. मैदानावर तो खूप धाडसी असतो. त्याची चेंडूवरील हुकमत अफलातून आहे. तांत्रिकदृष्ट्या काही त्रुटी असतील, पण मैदानावर आपल्या जागी खेळताना तो परिपक्व भासतो. वैयक्तिक पातळीवर माझी त्याच्याशी खूप चर्चा होते. नम्र राहत प्रगतिपथावर राहण्याचा सल्ला मी त्याला दिलेला आहे.’’
ऋतिकबाबत मार्केझ म्हणाले, की ‘‘मोसमाच्या सुरवातीस आम्ही त्याला ड्युरँड कप स्पर्धेत खेळविले. त्यावेळी तो आपल्या क्षमतेबाबत साशंक होता. आम्ही त्याला संधी दिली, तेव्हा त्याने आपण मोठ्या आव्हानासाठी सज्ज असल्याचे प्रदर्शित केले. त्याचा खेळाप्रती दृष्टिकोन सकारात्मक आहे. अगोदरच्या लढतीत जमशेदपूर एफसीविरुद्ध त्याने चुका केल्या, त्याची त्याला जाणीव होती, ओडिशाविरुद्ध त्याने अफलातून खेळ केला, पेनल्टी फटका अडविला. यावरून त्याची प्रगल्भता दिसून येते.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.