

मुंबई: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून अपेक्षेप्रमाणे कर्णधार शुभमन गिलचे पुनरागमन झाले आहे. उपकर्णधार श्रेयस अय्यरही संघात परतला; पण हजारे करंडक स्पर्धेत एक सामना खेळून त्याला तंदुरुस्ती सिद्ध करावी लागली. मोहम्मद सिराजला प्रदीर्घ कालावधीनंतर स्थान देण्यात आले; मात्र शतक करूनही महाराष्ट्रच्या ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना मान दुखावल्यामुळे शुभमन गिल मैदानापासून दूर होता. विजय हजारे स्पर्धेत अजूनही तो खेळलेला नाही; परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी तंदुरुस्त आहे; पण एकदिवसीय सामन्यांत १० षटके गोलंदाजी करण्याची तंदुरुस्ती त्याच्याकडे नाही, तसेच पुढील महिन्यात टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी हार्दिक महत्त्वाचा खेळाडू असणार आहे. परिणामी, त्याची या मालिकेसाठी निवड करण्यात आली नाही.
गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत शतकी खेळी साकार करणाऱ्या ऋतुराजला मात्र वगळण्यात आले आहे. त्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात शतक करणाऱ्या मुंबईच्या यशस्वी जयस्वालचे स्थान कायम राखण्यात आले.
जसप्रीत बुमराला विश्रांती दिली जाणार असल्यामुळे मोहम्मद सिराजची निवड होईल, अशी चर्चा खरी ठरली. आता केवळ कसोटी सामन्यांसाठीच संघात असलेला मोहम्मद सिराज २०२३ विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकदिवसीय सामन्यांत खेळलेला नाही.
वनडेसाठी केएल राहुल प्रमुख यष्टीरक्षक असल्यामुळे रिषभ पंतला वगळले जाईल, अशी जोरदार चर्चा होती; परंतु पंतचे स्थान कायम राहिले आहे; मात्र त्याला अंतिम संघात निवडले जाण्याची शक्यता कमीच आहे.
भारताचा संघ ः शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर* (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, रिषभ पंत, नितीशकुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.