
Yashasvi Jaiswal Batting Record: इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालला इतिहास रचण्याची संधी असेल. या सामन्यात तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा फलंदाज बनू शकतो. सामन्यांच्या बाबतीत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्याचवेळी, डावांच्या आधारे सर्वात जलद 2000 कसोटी धावा करण्याचा विक्रम राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या नावावर आहे.
दरम्यान, यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 20 सामन्यांमध्ये 52.86 च्या सरासरीने 1903 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा टप्पा गाठण्यापासून तो केवळ 97 धावा दूर आहे. जर त्याने एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत 97 धावा केल्या तर तो सर्वात कमी सामन्यांमध्ये 2000 कसोटी धावा करणारा भारतीय ठरेल. सध्या हा विक्रम लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. गावस्कर यांनी 23 कसोटी सामन्यांमध्ये 2000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. गावस्कर यांचा हा विक्रम मोडण्यासाठी जयस्वालकडे दोन सामने असतील.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणाऱ्या इतर भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्यानंतर राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागसारखे दिग्गज आहेत. या दोन्ही माजी खेळाडूंनी 25 सामन्यांमध्ये हा आकडा गाठला होता. दुसरीकडे, डावांच्या बाबतीत सर्वात जलद 2000 कसोटी धावा करण्याच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाल्यास, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग अव्वल स्थानी आहेत. दोघांनीही 40-40 डावांमध्ये हा विक्रम केला आहे, तर गावस्कर यांनी 44 डावांमध्ये 2000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये 38 डाव खेळले आहेत, जर त्याने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 97 धावा केल्या तर तो सर्वात कमी डावांमध्ये 2000 कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.
जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या (England) लीड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावले, परंतु या सामन्यात त्याचे क्षेत्ररक्षण खूपच खराब राहिले. त्यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले. दोन्ही डावात त्याने किमान पाच झेल सोडले. दुसऱ्या डावात तो फलंदाजी करताना अपयशी ठरला आणि केवळ 4 धावा काढून बाद झाला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात तो कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.