

Amit Passi Century: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हार्दिक पांड्याची टीम बडोदा जबरदस्त कामगिरी करत आहे. पांड्याही या स्पर्धेत बडोद्यासाठी काही सामने खेळला. मात्र आता तो मंगळवारपासून (9 डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणारी टी20 मालिका खेळणार आहे. याचदरम्यन पाड्यांच्या एका सहकाऱ्याने कमाल केली. अमित पस्सी नावाच्या खेळाडूने आपल्या टी20 पदार्पणाच्या सामन्यातच तुफानी फलंदाजी करुन विश्वविक्रमाची बरोबरी केली. या धमाकेदार कामगिरीमुळे पस्सी आता आयपीएल लिलावापूर्वी अनेक टीम्सच्या नजरेत आला.
बडोदा संघाचा नियमित खेळाडू जितेश शर्मा हा टीम इंडियासोबत जोडला गेल्यामुळे त्याच्या जागी 26 वर्षीय अमित पस्सीला संघात संधी मिळाली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील बडोद्याचा शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना सर्विसेस संघाशी झाला. या सामन्यात पस्सीला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्यात आले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने धडाकेबाज फलंदाजी करत सुरुवातीपासूनच मोठे शॉट मारायला सुरुवात केली. त्याने अवघ्या 44 चेंडूंत शतक ठोकले. पस्सीने 55 चेंडूंत 114 धावांची धडाकेबाज खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 9 उत्तुंग षटकार लगावले. पहिल्याच सामन्यात पस्सीने केलेल्या या तूफानी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बडोद्यासाठी दमदार शतक झळकावणाऱ्या अमित पस्सीने या खेळीच्या जोरावर एक मोठा विश्वविक्रम नोंदवला. टी20 पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या बिलाल आसिफ याच्या नावावर आहे. आसिफने 2015 मध्ये सेलकोट स्टॅलियन्सकडून तूफानी खेळी खेळली होती. तब्बल 10 वर्षांपासून टी20 डेब्यूमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आसिफच्या नावावर होता. आता अमित पस्सीने 10 वर्षांनंतर या विश्वविक्रमाशी बरोबरी साधली. तोही आपल्या टी20 पदार्पणाच्या सामन्यात 114 धावा करणारा जगातला दुसरा खेळाडू ठरला.
इंडियन प्रीमियर लीगचा लिलाव 16 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. अमित पस्सीच्या या अविश्वसनीय कामगिरीमुळे आता आयपीएलमधील अनेक संघांच्या नजरा त्याच्याकडे लागल्या आहेत. अमित पस्सी केवळ उत्कृष्ट फलंदाज नाही, तर तो विकेटकीपिंगही करतो. अनेक आयपीएल (IPL) संघांना भारतीय बॅकअप विकेटकीपर फलंदाजाची गरज आहे.
अमित पस्सीसारख्या खेळाडूंवर बोली लावणे फ्रँचायझींसाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. पहिल्याच टी20 सामन्यात त्याने ज्या पद्धतीने मोठे शॉट्स खेळून शतक ठोकले, ते पाहून तो टी20 फॉरमॅटसाठी किती महत्त्वाचा ठरु शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे 16 डिसेंबरच्या लिलावात पस्सीला मोठी किंमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित पस्सीच्या या कामगिरीने त्याला रातोरात स्टार बनवले. आता आयपीएलमध्ये त्याला कोणत्या संघात संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.