Goa Ranji Trophy 2024
पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याने अरुणाचल प्रदेशवर एक डाव आणि ५५१ धावांच्या फरकाने विजय नोंदवला आहे. गोव्याला पहिल्या डावात ६४३ धावांची आघाडी मिळाली, अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव ९२ धावांत आटोपला.
कश्यप बखले आणि स्नेहल कवणठकर यांनी नाबाद प्रत्येकी ३०० धावांच्या जोरावर गोव्याला विक्रमी धावसंख्या गाठता आली.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दुसराच सामना खेळणारा कश्यप बखले (नाबाद ३००) व अनुभवी फलंदाज स्नेहल कवणठकर (नाबाद ३१४) या गोव्याच्या फलंदाजांनी वैयक्तिक त्रिशतके नोंदविताना स्पर्धेच्या इतिहासात कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी रचण्याचा विक्रम आज गुरुवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर केला.
गोव्याने अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव ८४ धावांत गुंडाळून ९२ षटकांत २ बाद ७२७ धावांवर डाव घोषित करून रणजी स्पर्धेतील आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदविली. त्यांनी अरुणाचल प्रदेशवर पहिल्या डावात ६४३ धावांची आघाडी प्राप्त केली.
स्नेहल व कश्यप यांनी एकाच डावात त्रिशतके नोंदविण्याचाही पराक्रम साधला. गोव्याने अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव ९२ धावांत गुंडाळून सामना डाव व ५५१ धावांच्या फरकाने जिंकला. गोव्याचा हा प्लेट गटातील सलग पाचवा विजय ठरला.
मिझोरामविरुद्ध मागील लढतीत २५० धावा केलेल्या स्नेहलने २१५ चेंडूत ४५ चौकार व चार षटकारांसह नाबाद ३१४ धावा केल्या. एकंदरीत त्याचे हे ५५ व्या रणजी सामन्यातील नववी शतकी खेळी ठरली.
रणजी स्पर्धेत दुसराच डाव खेळणाऱ्या कश्यपने गुरुवारी उपाहारानंतर नाबाद ३०० धावा करताना २६९ चेंडूंत ३९ चौकार व दोन चौकार मारले. २६ वर्षीय कश्यपने मिझोरामविरुद्ध मागील लढतीत पदार्पण केले होते.
सगुण कामत (नाबाद ३०४, २०१६-१७ मध्ये) याच्यानंतर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्रिशतक नोंदविणारे स्नेहल व कश्यप हे गोव्याचे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज ठरले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.