Ranji Trophy 2024 Goa Vs Mizoram
पणजी: गोव्याने मिळालेल्या संधींचा लाभ उठवत निर्विवाद वर्चस्व राखले, तर रणजी करंडक प्लेट विभाग क्रिकेट सामन्यात त्यांना सलग चौथ्या विजय शक्य होईल. दोन-तीन खेळाडूंवर अवलंबून असलेल्या मिझोरामविरुद्ध त्यांचे पारड जड राहणे अपेक्षित आहे.
गोवा व मिझोराम यांच्यातील चार दिवसीय सामना बुधवारपासून (ता. ६) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या ब मैदानावर खेळला जाईल. सध्या गोव्याचे सलग तीन विजयांसह सर्वाधिक १९ झाले असून पुढील मोसमातील एलिट विभाग पात्रता निश्चित आहे. मिझोरामने दोन विजय व एका पराभवासह १३ गुणांची कमाई केली असून ते सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. एलिट विभाग पात्रतेसाठी तेसुद्धा प्रयत्नशील आहेत.
मिझोरामविरुद्ध गोव्याच्या संघात बदलांची शक्यता आहे. कर्नाटकचा पाहुणा फलंदाज के.व्ही. सिद्धार्थ याने नागालँडविरुद्ध मागील लढतीत दोन्ही डावांत मिळून १५ धावा केल्या होत्या. मिझोरामविरुद्ध त्याला विश्रांती देण्याचा निर्णय झाल्यास २६ वर्षीय फलंदाज कश्यप बखले याला पदार्पणाची संधी मिळेल.
वेगवान गोलंदाजीत शुभम तारीऐवजी हेरंब परब अशी अदलाबदलीही होऊ शकते. कागदावर गोव्याचा संघ बलवान भासत असला, तरी फलंदाजीत गोव्याला सावध राहावे लागेल. नागालँडविरुद्ध गोव्याचा पहिला डाव ५ बाद ३६ वरून १७९ धावांत आटोपला होता ही बाब नजरेआड करता येणार नाही.
मिझोरामचा संघ अग्नी चोप्रा, के. सी. करिअप्पा, मोहित जांगरा या तीन खेळाडूंवर अधिकांश अवलंबून आहे. अग्नी याने तीन सामन्यांतील पाच डावांत १६१.५०च्या सरासरीने ६४६ धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये मागील दोन डावांत सलग द्विशतकांचा समावेश आहे. त्याला दोन्ही डावांत लवकर बाद केल्यास गोव्याचा विजय पक्का असेल. लेगब्रेक गोलंदाज करिअप्पा याने सहा डावांत २६ गडी बाद केले असून दोन अर्धशतकांसह १४१ धावाही केल्या आहेत. करिअप्पाची फिरकी गोलंदाजी गोव्याला कोंडीत पकडू शकते. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहित जांग्रा गोव्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्याने १४ गडीही बाद केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.