Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

Goa vs Baroda Ranji Trophy Score: एलिट अ गट सामना पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू आहे. बडोद्याने गोव्याच्या सुमार गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत धावसंख्या वाढविली.
Goa vs Baroda Ranji Trophy Score
Ranji TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रणजी करंडक क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी गोव्याने पुन्हा एकदा सुमार गोलंदाजी केली, साहजिकच त्याचा लाभ बडोदा संघाच्या फलंदाजांनी घेतला आणि पहिला डाव त्यांनी आठ बाद ४७२ धावांवर घोषित केला, मात्र त्यांचा कर्णधार अतीत शेठ याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले.

एलिट अ गट सामना पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सुरू आहे. बडोद्याने गोव्याच्या सुमार गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत धावसंख्या वाढविली. गोव्याने डावात १५७ षटके गोलंदाजी केली. त्यापैकी ऑफस्पिनरद्वयी मोहित रेडकर (४१ षटके) व ललित यादव (२६ षटके) यांनी एकत्रित ६७ षटके टाकली, पण त्यांची गोलंदाजी बडोद्याच्या फलंदाजांसाठी विशेष त्रासदायक ठरू शकली नाही.

Goa vs Baroda Ranji Trophy Score
Goa Assembly Women Representation: गोवा विधानसभेत महिलांचा आवाज आहे कुठे?

दुसऱ्या दिवशी सोमवारी खेळ थांबला तेव्हा गोव्याने एक गडी गमावून पाच धावा केल्या होत्या. बडोदा संघाचा ऑफ स्पिनर महेश पिठिया याने टाकलेल्या डावातील पहिल्याच चेंडूवर अनावश्यक उंचावरून फटका खेळण्याचा जुगार गोव्याचा सलामी फलंदाज सुयश प्रभुदेसाई याच्या अंगलट आला. बदली खेळाडू मनन सोळंकी याने डीप मिडविकेट क्षेत्रात अचूक झेल पकडला. पहिल्याच चेंडूवर महत्त्वाचा गडी गमावल्यामुळे गोव्याला मोठा धक्का बसला.

शतकाच्या वाटेवर असताना अतीत याच्या पायाचा स्नायू दुखावला, त्यामुळे त्याला मैदानावरच उपचार घ्यावे लागले. परिणामी त्याच्या एकाग्रतेवर परिणाम झाला व ९९ धावावर गोव्याच्या गोलंदाज वासुकी कौशिक याला पुढे येऊन खेळणे अतीत याला महागात पडले व तो त्रिफळाचीत बाद झाला. त्यानंतर बडोदा संघाने लगेच डाव घोषित केला. अतीत याने दोन महत्त्वपूर्ण भागीदारी केल्या. त्याने अगोदर मितेश पटेल (८१) याच्या समवेत सहाव्या विकेटसाठी १३२ धावांची, नंतर सातव्या विकेटसाठी राज लिंबानी (२९) याच्या समवेत ७० धावांची भागीदारी केली. त्यामुळे बडोदा संघाला साडेचारशे धावांचा डोंगर उभारणे शक्य झाले.

सकाळच्या सत्रात कालची नाबाद जोडी शाश्वत रावत (६९) आणि दीपक हुडा (५२) यांनी जोमदार फलंदाजी करत अर्धशतके ठोकली. त्यांनी चौथ्या विकेटसाठी ११० धावांची मजबूत भागीदारी करून बडोदा संघाला भक्कम पायाभरणी करून दिली. बडोदा संघाने पहिल्या दिवस अखेरच्या तीन बाद २०४ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती.

सोडलेला झेल महागात!

बडोदा संघाचा कर्णधार अतीत शेठ वैयक्तिक वीस धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. वेगवान गोलंदाज ऋत्विक नाईक याच्या गोलंदाजीवर गोव्याचा कर्णधार अभिनव तेजराणा याने झेल सोडला. त्यावेळी बडोदा संघाची स्थिती पाच गडी बाद ३०३ धावा अशी होती. या जीवदानाचा लाभ उठवत अतीत याने नंतर चमकदार फलंदाजी केली. तीस वर्षांच्या या अष्टपैलू खेळाडूला प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीतील पाचवे शतक मात्र फक्त एका धावेने हुकले.

Goa vs Baroda Ranji Trophy Score
Goa Water Crisis: आज पाणी वाहून जातेय, उद्या थेंबासाठी वणवण! संभाव्य पाणीटंचाईवर आताच नियोजन करा

संक्षिप्त धावफलक

बडोदा, पहिला डाव (३ बाद २०४ वरून) : १५७ षटकांत ८ बाद ४७२ घोषित (शाश्वत रावत ६९, दीपक हुडा ५२, मितेश पटेल ८१, अतीत शेठ ९९, राज लिंबानी २९, महेश पिठिया नाबाद १, रसिक दार नाबाद १, वासुकी कौशिक ३१-१२-५१-२, ऋत्विक नाईक १९-३-४२-१, ललित यादव २६-३-९०-०, शुभम तारी १९-०-७३-१, मोहित रेडकर ४१-२-१२०-३, दर्शन मिसाळ ११-०-४०-१, अभिनव तेजराणा २-०-३-०, दीपराज गावकर ८-२-३५-०).

गोवा, पहिला डाव : ३ षटकांत १ बाद ५ धावा (सुयश प्रभुदेसाई ०, शिवेंद्र भुजबळ नाबाद ५, दर्शन मिसाळ नाबाद ०, महेश पिठिया २-१-४-१, भार्गव भट १-०-१-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com