
पणजी: गोव्याने उत्तराखंडमधील ४१ व्या गोल्ड कप क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी नवोदित गोलंदाजांना आजमावले. त्यांची यथेच्छ धुलाई करताना हिमाचल प्रदेशने २४.३ षटकांतच २४७ धावा करून सामना आठ विकेट राखून सहजपणे जिंकला. गोव्याचा हा स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला, त्यामुळे गट ४ मधील त्यांचे आव्हान संपुष्टात आले. सामना देहरादून येथील आयुष क्रिकेट अकादमी मैदानावर झाला.
हिमाचल प्रदेशच्या अंकुश बैन्स याने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या ७५ चेंडूंत १२ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने नाबाद १३१ धावा केल्या. त्याने रवी ठाकूर याच्यासमवेत संघाला १५.५ षटकांतच १५६ धावांची सलामी दिली. रवी याने ४० चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह ७८ धावा नोंदविल्या.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याने अझान थोटा, मंथन खुटकर, तसेच १९ वर्षांखालील दिशांक मिस्कीन यांच्या शानदार अर्धशतकांमुळे ९ बाद २४१ धावा केल्या. अझान व मंथन यांनी तिसऱ्या विकेटसाठीसाठी ९७ धावांची भागीदारी केली.
अझान याने ५४ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५६, मंथनने ५५ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ५०, तर दिशांक याने ९० चेंडूंतील संयमी खेळीत ३ चौकारांसह ५० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : गोवा : ५० षटकांत ९ बाद २४१ (सनथ नेवगी १३, ईशान गडेकर १०, अझान थोटा ५६, मंथन खुटकर ५०, दिशांक मिस्कीन ५०, यश कसवणकर १, दर्शन मिसाळ ३०, समर दुभाषी नाबाद २४, शमीक कामत ०, फेलिक्स आलेमाव ०, समर्थ राणे नाबाद ०, अविकाश ९-१-४८-४, आयुष जामवाल १०-०-४२-२) पराभूत वि. हिमाचल प्रदेश : २४.३ षटकांत २ बाद २४७ (रवी ठाकूर ७८, अंकुश बैन्स नाबाद १३१, सिद्धांत पुरोहित २५, फेलिक्स आलेमाव ५-०-५२-०, शमीक कामत ५-०-५३-०, समर्थ राणे ४-०-३९-१, दर्शन मिसाळ ६-०-५२-१, यश कसवणकर ४-०-३४-०, दिशांक मिस्कीन ०.३-०-१३-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.