

पणजी: अनुभवी फलंदाजांनी कमजोर मानसिकतेसह सपशेल शरणागती पत्करली, त्यांना खेळपट्टीवर मंथन खुटकर व शिवेंद्र भुजबळ या नवोदितांप्रमाणे धैर्य दाखविता आले नाही, परिणामी गोव्याला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात गुरुवारी सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. विदर्भाने स्पर्धेतील लागोपाठ तिसरा सामना जिंकताना डाव व २७ धावांनी विजय मिळवून बोनस गुणाचीही कमाई करत गटात अग्रस्थान मिळविले.
जामठा-नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर गुरुवारी सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी गोव्याच्या फलंदाजांनी कमालीचा संयम प्रदर्शित करत दिवसभरात १८१ धावांची पिछाडी भरून काढणे आवश्यक होते. बुधवारी त्यांनी १ बाद ४१ धावा केल्या होत्या. एकूण २२२ धावांनी मागे पडलेल्या गोव्याला दुसऱ्या डावात दोनशे धावाही करता आल्या नाहीत. १९५ धावांत डाव संपुष्टात आला.
रणजी करंडक स्पर्धेत २०२५-२६ पासून गोव्याचा हा ओळीने सातवा पराभव आहे, त्यापैकी तीन सामने डावाने गमावले आहेत. दुसऱ्या डावात मोसमातील पहिलाच सामना खेळणाऱ्या मंथन खुटकरने झुंझार ७० धावांची खेळी करून संघातील अनुभवी फलंदाजांना धडा गिरविण्यास दिला. डावखुऱ्या मंथनने १६० चेंडूंचा सामना करताना चार चौकार व पाच षटकार मारले. पहिलाच रणजी मोसम खेळणाऱ्या शिवेंद्र भुजबळ यानेही खिंड लढविली. तो ४५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ७९ चेंडूंतील खेळीत आठ चौकार व एक षटकार मारला.
स्नेहलचे धक्कादायक अपयश
गोव्याचा माजी कर्णधार स्नेहल कवठणकर संघातील सर्वांत अनुभवी फलंदाज, पण विदर्भाविरुद्ध पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर तो दुसऱ्या डावात फक्त एक धाव करू शकला. स्नेहलने बडोद्याविरुद्ध पहिल्या डावात ५० धावा केल्या, त्यानंतर त्याने ०, ०, ७, ०, १ हे अपयश खूपच धक्कादायक आहे. २०२४-२५ मध्ये रणजी प्लेट स्पर्धेतील सात डावांत एका त्रिशतकासह १८९.८०च्या सरासरीने ९४९ धावांचा रतीब टाकलेल्या या फलंदाजाने यंदा सहा डावांत ९.६६च्या सरासरीने फक्त ५८ धावा केल्या आहेत. गोव्याचा आणखी एक अनुभवी फलंदाज सुयश प्रभुदेसाई सुद्धा धावांसाठी झगडत असून त्याने सहा डावात १६.६६च्या सरासरीने शंभर धावाच केल्या आहेत.
गोव्याच्या संघात बदल अपेक्षित
गोव्याचा आता पुढील सामना त्यांच्याप्रमाणेच तिन्ही सामने गमावलेल्या बिहारविरुद्ध होईल. ही लढत पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर दोन नोव्हेंबरपासून खेळली जाईल. या लढतीसाठी गोव्याच्या फलंदाजीत बदल अपेक्षित आहेत.
एलिट अ गटातील सध्याची स्थिती
विदर्भ (१९ गुण), बडोदा (१७), उत्तर प्रदेश (१६), मध्य प्रदेश (१३), जम्मू-काश्मीर (२, कोशंट ०.६७८), पुदुचेरी (२, कोशंट ०.५७८), गोवा (०, कोशंट ०.४९४), बिहार (०, कोशंट ०.३१५).
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव : २२० : विदर्भ, पहिला डाव : ८ बाद ४४२ घोषित
गोवा, दुसरा डाव (१ बाद ४१ वरून) : ७६ षटकांत सर्वबाद १९५ (मंथन खुटकर ७०, अभिनव तेजराणा १४, स्नेहल कवठणकर १, ललित यादव २६, शिवेंद्र भुजबळ नाबाद ४५, यश कसवणकर ०, दर्शन मिसाळ ३, ऋत्विक नाईक १५, वासुकी कौशिक ०, शुभम तारी ०, हर्ष दुबे ४-३८).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.