
National Games Goa Player Fund Controversy
पणजी: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या आधिपत्याखालील गोवा ऑलिंपिक असोसिएशनने (जीओए) राज्यातील क्रीडापटूंच्या समर्थनार्थ गोवा क्रीडा प्राधिकरणावर (एसएजी) तलवार उपसली असून उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या अत्यल्प भत्त्याच्या निषेधार्थ धनादेश परत केला.
राज्यातील क्रीडापटू सरकारकडून चांगल्या सुविधांसाठी बांधील असल्याचे गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले. क्रीडा प्राधिकरणाने यावेळी मंजूर केलेले आर्थिक साहाय्य गुजरात, तसेच गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी दिलेल्या भत्त्यांच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी नमूद केले.
३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला मंगळवारपासून सुरवात होत आहे. राज्यातील खेळाडूंना शनिवारी निरोप देण्यात आला. त्यावेळी क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी राज्याच्या क्रीडाक्षेत्रातील पीछेहाटीस विविध खेळांच्या संघटनांना दोषी ठरवत चांगलेच धारेवर धरले होते.
भक्ता यांनी सांगितले की, आम्हाला एसएजीने मंजूर केलेला निधी मान्य नाही. सविस्तर चर्चेअंती धनादेश परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत ‘एसएजी’कडून आम्हाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
खेळाडूंना न्याय्य पाठबळ आवश्यक आहे, जेणेकरून ते स्पर्धेत प्रभावी ठरू शकतील आणि राज्यासाठी चांगली कामगिरी बजावतील. एसएजीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाचे पुनरावलोकन करून भरघोस निधी मंजूर करावा ही आमची मागणी आहे. दरम्यान, यासंदर्भात गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
गोवा क्रीडा प्राधिकरणाकडून खेळाडूंना मिळणारा आर्थिक निधी खूप कमी आहे. त्यामुळे खेळाडूंवर विनाकारण आर्थिक भार पडेल. आम्ही सादर केलेल्या अंदाजपत्रकाला कात्री लावण्यात आली. खेळाडूंना पूर्ण निधी मिळावा हा आमचा आग्रह आहे. क्रीडा प्राधिकरणाचा धनादेश आम्ही परत केला असला तरी त्याचा खेळाडूंच्या सहभागावर अजिबात परिणाम होणार नाही. कारण गोवा ऑलिंपिक असोसिएशनने स्वखर्चाने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना केले आहे. आता आम्हाला एसएजीच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
१. गुरुदत्त भक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील स्पर्धेसाठी ‘जीओए’ने ‘एसएजी’ला सविस्तर खर्चाचा तपशील आगाऊ दिला होता. त्यामध्ये ३ वातानुकूलित रेल्वे प्रवासाठीसाठी प्रतिखेळाडू ७२०० रुपये तिकीट खर्च होता, जेणेकरून खेळाडूंना आरामदायी प्रवास करणे शक्य होईल. मात्र प्रत्यक्षात ‘एसएजी’ने प्रतिखेळाडूस प्रवासासाठी ६००० रुपये तिकीट खर्च मंजूर केला. ज्यामुळे खेळाडूंवर अनावश्यक आर्थिक भार आला.
२. ‘एसएजी’ने स्पर्धेच्या कालावधीत प्रतिखेळाडूसाठी दैनंदिनी भत्ता व प्रवास भत्ता ५०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत खाली आणला. या खर्चातून खेळाडूंना स्पर्धेत खेळत असताना मूलभूत गरजा पूर्ण करणे खूपच कठीण असल्याचे ‘जीओए’ला वाटते.
३. भक्ता यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दिल्या जाणाऱ्या किटमध्ये एक ट्रॅकसूट, दोन टी-शर्ट, एक किटबॅग, एक जोडी शूज आणि सॉक्स यांचा समावेश असतो, ज्याची एकूण किंमत अंदाजे १०,१०० रुपये इतकी होते. प्रत्यक्षात ‘एसएजी’ने किट भत्ता खूपच कमी करताना प्रत्येकी ३००० रुपये केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.