
Goa Beats Nagaland: रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत गोव्याने 'प्लेट चॅम्पियनशिप' जिंकली. सोमवारी (27 जानेवारी) सोविमा येथे झालेल्या अंतिम सामन्यात गोव्याने नागालँडचा तब्बल 362 धावांनी पराभव केला. दुसऱ्या डावात कर्णधार दर्शन मिसाळने 48 धावांत 5 विकेट्स घेतल्या. स्नेहल कवठणकरला सामनावीर आणि मालिकावीर (प्लेट ग्रुप) म्हणून सन्मानित करण्यात आले. पुढील हंगामासाठी दोन्ही संघांना एलिट विभागात बढती देण्यात आली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी गोव्याकडून स्नेहल आणि कश्यप जोडीने अफलातून फलंदाजी केली. स्नेहलने द्विशतकी दणका दिला. दोघांनीही नागालँडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
गोव्याने (Goa) 578 धावांचे लक्ष्य ठेवून आपला डाव घोषित केला होता. याच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या नागालँडला शेवटच्या दिवशी 215 धावा करता आल्या. नागालँडच्या फलंदाजांना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. गोव्याकडून कर्णधार दर्शन मिसाळ नागालँडच्या फलंदाजांवर भारी पडला. दर्शनने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवली दिली. त्याने 48 धावांत 5 विकेट्स घेतल्या. नागालँडचा कर्णधार आर. जोनाथन (86) आणि हेम छेत्री (55) यांना उर्वरित फलंदाजांकडून साथ मिळाली नाही.
दरम्यान, गोव्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुयश प्रभुदेसाई (56), स्नेहल कवठणकर (63) आणि कश्यप बकले (नाबाद 79) यांच्या अर्धशतकांमुळे पाहुण्या संघाने पहिल्या डावात 276 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात नागालँडच्या गोलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला होता. त्यांनी आपल्या घातक गोलंदाजीने गोव्याच्या स्टार फलंदाजांचा समाचार घेतला होता.
42 धावांत तीन गोव्याच्या तीन विकेट्स घेतल्यानंतर यजमान संघाला सामन्यात परतल्यासारखे वाटत होते. याचदरम्यान स्नेहल (नाबाद 202) आणि बकले (161) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी 278 धावांच्या भागीदारीमुळे नागालँडच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या. दर्शन आणि स्नेहलने पाचव्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी करुन यजमान संघाला विजयापासून खूप दूर ठेवले.
गोव्याने आपला दुसरा डाव 7 बाद 517 धावांवर घोषित केला आणि चौथ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी नागालँडच्या सहा फलंदाजांना बाद केले. पाचव्या दिवसाचा खेळ केवळ औपचारिकता ठरला कारण गोव्याने दुपारच्या जेवणानंतर लगेचच विजय मिळवला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.