
पणजी: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सलग तिसऱ्या वर्षी गोव्याचे क्रीडापटू अपयशी ठरले. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी स्पर्धेत पुन्हा एकदा एकाच ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. २०१८ पासून स्पर्धेत गोव्याने सात स्पर्धांत फक्त तीनच सुवर्णपदके जिंकली आहेत.
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याचा सहभाग केवळ औपचारिक ठरत आहे. गोवा क्रीडा प्राधिकरण आणि संबंधित खेळांच्या राज्यस्तरीय संघटना यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका क्रीडापटूंना बसत असल्याचे प्राधिकरणाच्या एका ज्येष्ठ प्रशिक्षकाने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
हा प्रशिक्षक तक्रारीच्या सूरात म्हणाला, की ‘‘गोव्यात ऑलिंपिक दर्जांच्या खेळांना कमी महत्त्व मिळत आहे. शालेय पातळीवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नगण्य असलेल्या नवख्या खेळांना प्राधान्य दिले जाते.
या खेळांतील पदके गृहित धरली जात नाहीत. एकंदरीत राज्यात क्रीडा संस्कृतीचा अभाव जाणवत आहे. क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षकांना आवश्यक सुविधा पुरविल्या जात नाही, त्यामुळे प्रशिक्षणाचा दर्जाही घसरत चालला आहे.’’
यंदा बिहारमध्ये झालेल्या सातव्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला योगासनात फक्त एक ब्राँझपदक मिळाले. २०२४ मध्ये तमिळनाडूत झालेल्या स्पर्धेतही योगासनातच ब्राँझपदक मिळाले होते. २०२३ साली मध्य प्रदेशमधील स्पर्धेत गोव्याने एकमेव ब्राँझपदक वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले होते.
गोवा क्रीडा प्राधिकरण व क्रीडामंत्री राज्यात खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन करण्यास इच्छुक आहे, मात्र स्पर्धांत्मक पातळीवर राज्यातील क्रीडापटू खूपच पिछाडीवर असल्याचे तीन वर्षांतील कामगिरीने जाणवते. यंदा बिहारमध्ये १४ खेळांत गोव्याचे ६० क्रीडापटू सहभागी झाले होते, योगासनातील एकमेव ब्राँझ वगळता इतरांसाठी स्पर्धा सहभागापुरतीच ठरली.
गोव्याने २०१८ ते २०२५ या कालावधीत सात खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये एकूण ४३ पदके जिंकली आहेत. यामध्ये तीन सुवर्ण, १७ रौप्य व २३ ब्राँझपदकांचा समावेश आहे. २०१९ मध्ये आठ रौप्य व नऊ ब्राँझ मिळून एकूण १७ पदके मिळाली होती, २०२० मध्ये आसाममधील स्पर्धेत तीन रौप्य व नऊ ब्राँझ मिळून १२ पदके मिळाली. त्यानंतर पदकांची संख्या घसरत गेली. सलग तीन वर्षे गोव्याला तळाच्या ३१व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याला पहिले सुवर्णपदक जलतरणात मिळाले. २०१८ साली दिल्लीत झालेल्या शुभारंभी स्पर्धेत जलतरणपटू झेवियर डिसोझा याने पुरुष गटातील १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यानंतर २०२२ मध्ये हरियानात झालेल्या स्पर्धेत गोव्याला योगासनात दोन सुवर्णपदके मिळाली. तेव्हा नऊ वर्षांची असलेल्या निरल वाडेकर हिने १८ वर्षांखालील महिला गटातील आर्टिस्टिक योगासनात सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम साधला होता, तसेच गोव्याच्या महिला योगासन संघालाही सुवर्णपदक मिळाले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.