पणजी, (क्रीडा प्रतिनिधी): एफसी गोवा आणि चेन्नयीन एफसी यांच्यात आज (दि. २४ ऑक्टोबर) रोजी एक महत्वाचा सामना रंगणार आहे. जवाहरलाल नेहरु इनडोअर स्टेडियम चेन्नई इथे संध्याकाळी ७:३० वाजता इंडियन सुपर लीगचा हा मुकाबला खेळला जाईल.
एफसी गोवासाठी या खेळ हंगामाची सुरूवात काहीशी खराब असली तरीही खेळाडू फुटबॉलच्या खेळात बदल घडवण्याचा सराव करतायत तर दुसऱ्या बाजूला चेन्नयीन एफसी त्यांची मजबूत घोडदौड सुरु ठेवण्यावर भर देतेय.
इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवापाशी परिस्थिती बदलण्याची क्षमता निश्चितच असल्याचा विश्वास व्यक्त करताना सुसूत्र आणि सातत्यपूर्ण खेळाची गरज मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केली आहे.
एफसी गोवा संघाला मागील लढतीत मुंबई सिटीकडून पराभव पत्करावा लागला. त्या लढतीत आपला संघ सलगपणे चांगले खेळण्यास कमी पडला आणि त्यामुळे पराभूत झाल्याचे मार्केझ म्हणालेत. स्पर्धेतील पाचही सामन्यांत जवळपास हीच स्थिती होती. फक्त एक लढत जिंकलेल्या एफसी गोवाच्या खात्यात फक्त पाच गुण आहेत.
अनुभवी ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीन संघ (Chennaiyin FC) प्रत्येक सामन्यागणिक प्रभावी खेळ करताना दिसत आहे. चारपैकी दोन लढतीत विजय, तसेच एका सामन्यात बरोबरी यामुळे त्यांचे सात गुण आहेत. चेन्नईयीनने मागील लढतीत गुवाहाटी येथे पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना नॉर्थईस्ट युनायटेडला हरविले होते.
एफसी गोवा आणि चेन्नयीन एफसी यांच्यामधला मुकाबला पाहायचं झालं तर एफसी गोवाच्या संघाचं पारडं बरंच भारी आहे. एफसी गोवा आई चेन्नयीन एफसी यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सात सामन्यांपैकी एफसी गोवाच्या संघाने सहा सामने जिंकले आहेत आणि उल्लेखनीय बाब म्हणजे यामधले तीन सामने सलग जिंकण्यात एफसी गोवाला यश मिळालंय. एफसी गोवाने आत्तापर्यंत खुल्या खेळात आणि सेट पीसमध्ये दमदार कामगिरी बजावली आहे.
आयएसएल स्पर्धेत एकमेकांविरुद्ध २६ सामने
एफसी गोवाचे १५, तर चेन्नईयीनचे ९ विजय, २ बरोबरी
एफसी गोवाचे चेन्नईयीनविरुद्ध ५४ गोल
गतमोसमातील तिन्ही आयएसएल लढतीत एफसी गोवा विजयी (३-०, ४-१, २-१)
चेन्नईयीन एफसीविरुद्ध २०२३-२४ मोसमातील चार लढतीत एफसी गोवाने (FC Goa) विजयी वर्चस्व राखले होते. आयएसएल(ISL)मधील प्ले-ऑफसह तीन लढतीत, तसेच ड्युरँड कप स्पर्धेतील एका सामन्यात एफसी गोवाने चेन्नई संघाला हरविले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.