Super Cup 2025: गतविजेत्या FC गोवाची सुपर कपमध्ये मुसंडी! मुंबई सिटीला नमविले, अंतिम फेरीत पडणार ईस्ट बंगालशी गाठ

FC Goa Final: पंजाब एफसीसाठी एकमात्र गोल डॅनियल रमिरेझ याने ३४व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर नोंदविला. ईस्ट बंगालने ही स्पर्धा २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
FC Goa Match
FC Goa Match Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गतविजेत्या एफसी गोवाने सुपर कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. नशिबाची साथ मिळालेल्या या संघाने उपांत्य लढतीत गुरुवारी रात्री मुंबई सिटी एफसीला २-१ असे निसटते हरविले. विजेतेपदासाठी रविवारी (ता. ७) त्यांची गाठ आता ईस्ट बंगालशी पडेल.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी उपांत्य फेरीतील दोन्ही सामने झाले. माजी विजेत्या ईस्ट बंगालनेही अंतिम फेरी गाठताना पंजाब एफसीवर ३-१ फरकाने सहज मात केली. त्यांच्यासाठी महंमद बाशिम राशीद याने १२व्या, केविन सिबिल्ले याने ४५+३ व्या, तर साऊल क्रेस्पो याने ७१व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

पंजाब एफसीसाठी एकमात्र गोल डॅनियल रमिरेझ याने ३४व्या मिनिटास पेनल्टी फटक्यावर नोंदविला. ईस्ट बंगालने ही स्पर्धा २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती, तर एफसी गोवाने दोन वेळा (२०१९, २०२४-२५) विजेतेपद पटकावले आहे.

एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळविण्याची संधी असल्याने रविवारी होणारा अंतिम सामना महत्त्वाचा असेल. विजेतेपद राखणारा पहिला संघ हा मान एफसी गोवास मिळू शकतो.

सामन्याच्या पूर्वार्धात तीन मिनिटांत दोन गोल केलेला एफसी गोवा संघ नंतर आघाडी राखण्यात नशिबवान ठरला. २०व्या मिनिटास ब्रायसन फर्नांडिस व २३व्या मिनिटास स्पॅनिश डेव्हिड तिमोर यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे एफसी गोवा विश्रांतीला २-० असा आघाडीवर होता. दुसऱ्या गोलच्या वेळेस तिमोर याच्या डाव्या पायाच्या फटक्यावर मुंबई सिटीचा गोलरक्षक फुर्बा लाचेंपा याला अडवलेल्या चेंडूवर ताबा राखता आला नाही, परिणामी सोप्या गोलमुळे एफसी गोवाची आघाडी वाढली.

उत्तरार्धात मुंबई सिटीने जोरदार खेळ करून एफसी गोवावर दबाव टाकला. गोलरक्षक ऋत्विक तिवारी याने गोलक्षेत्रात मुंबई सिटीच्या होर्गे परेरा दियाझ याला अनावश्यकपणे पाडले. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर मुंबई सिटीला गोल करण्याची नामी संधी होती,

परंतु अनुभवी लाल्लियानझुआला छांगटे याने ५२व्या मिनिटास फटका गोलपोस्टबाहेर मारल्याने मुंबईतील संघाचे मोठे नुकसान झाले. ५९व्या मिनिटास ब्रँडन फर्नांडिसने प्रेक्षणीय गोल करून मुंबई सिटीची पिछाडी १-२ अशी कमी झाली.

७०व्या मिनिटास मुंबई सिटीने जवळपास बरोबरी साधली होती, परंतु ऋत्विक तिवारीच्या दक्षतेमुळे एफसी गोवाची आघाडी अबाधित राहिली. होर्गे परेरा दियाझ याचा सणसणीत फटका तिवारीने वेळीच रोखला.

त्यापूर्वी तिवारीने होर्गे ओर्तिझ याचा प्रयत्न उधळून लावला होता. एफसी गोवाचा हुकमी बचावपटू संदेश झिंगन दुखापतीमुळे खेळू शकला नाही, त्याची अनुपस्थितीत एफसी गोवास उत्तरार्धात प्रकर्षाने जाणवली.

FC Goa Match
Super Cup 2025: गतविजेते FC Goa आव्हानास सज्ज, मुंबई सिटीविरुद्ध फातोर्ड्यात सुपर कप उपांत्य लढत; पंजाबची ईस्ट बंगालशी गाठ

मुंबई सिटीविरुद्धचा उपांत्य सामना सुरू होण्यापूर्वी एफसी गोवा संघास झटका बसला. संघाच्या लाईन-अप वेळेस रेफरी प्रतीक मोंडल यांनी स्पॅनिश स्ट्रायकर इकेर ग्वॉर्रोचेना याला अयोग्य वर्तनाबद्दल ‘टनेल’मध्येच रेड कार्ड दाखविले. संघ मैदानात जात असताना गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना संघ ऐनवेळी बदलावा लागला.

FC Goa Match
Super Cup 2025 : धडाकेबाज एफसी गोवा उपांत्य फेरीत, सुपर कप फुटबॉलमध्ये गतविजेत्यांचा इंटर काशी संघावर 3 गोलने विजय

कर्णधार ग्वॉर्रोचेना याची जागा बदली खेळाडू हावियर सिव्हेरियो याने घेतली आणि नव्याने ‘स्टार्टिंग लाईन-अप’ द्यावी लागली. निलंबनामुळे ग्वॉर्रोचेना अंतिम लढतीत खेळू शकणार नाही. अगोदरच्या उपांत्य लढतीत पंजाब एफसीविरुद्ध पूर्वार्धाच्या भरपाई वेळेत सामना अधिकाऱ्यांसमोर अशोभनीय वर्तन केल्याबद्दल ईस्ट बंगालचे प्रशिक्षक ऑस्कर ब्रुझाँ यांना रेड कार्ड दाखविण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com