Indian Super League: एफसी गोवास आगळ्या विक्रमाची नामी संधी! बलाढ्य मोहन बागानविरुद्ध कोलकत्यात भिडणार
FC Goa Aims for Record Goal Streak Against Mohun Bagan in ISL
पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या साखळी टप्प्यातील सर्व सामन्यांत गोल नोंदविण्याचा पराक्रम एकाही संघाने बजावलेला नाही. एफसी गोवा संघाला सर्व २४ साखळी सामन्यांत गोल नोंदविण्याच्या विक्रमाची नामी संधी आहे, पण त्यासाठी त्यांना शनिवारी (ता. ८) कोलकत्यात बलाढ्य मोहन बागानचा बचाव भेदावा लागेल.
मोहन बागानने २३ सामन्यांतून ५३ गुण नोंदवत अगोदरच अग्रस्थानासह ‘लीग शिल्ड’चा मान मिळविला आहे. तेवढ्याच सामन्यांतून ४८ गुण नोंदविलेला एफसी गोवा संघ द्वितीय स्थानी आहे. हे दोन्ही संघ करंडकासाठी थेट उपांत्य फेरीत दाखल झालेले आहेत, त्यामुळे शनिवारी त्यांच्यात विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर होणारा सामना औपचारिक आहे, मात्र एफसी गोवाने गोल केल्यास लढत संस्मरणीय ठरेल.
सलग २३ साखळी सामन्यांत गोल करणारा एफसी गोवा आयएसएल स्पर्धेतील पहिला संघ आहे. संघाच्या या कामगिरीविषयी मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ म्हणाले, की ‘‘प्रत्येक सामन्यात गोल करणे ही अर्थातच कठीण बाब आहे. (साखळी) स्पर्धेतील प्रत्येक सामन्यांत एखाद्या संघाने गोल केल्याचे मला काही आठवत नाही. कोलकत्यात आम्ही गोल केल्यास निश्चितच विजय मिळवू, त्याचवेळी मोहन बागानने स्पर्धेत सर्वांत कमी (१६) गोल स्वीकारले आहेत याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.’’ एफसी गोवाने (FC Goa) स्पर्धेत आठ क्लीन शीट्स राखल्या आहेत, ही एकप्रकारे विजयी कामगिरीच आहे, असेही ५६ वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकाने नमूद केले.
मैदानावर उतरण्यापूर्वी..
स्पर्धेत आतापर्यंत मोहन बागानचे १६, तर एफसी गोवाचे १४ विजय
गोल नोंदविणाऱ्या संघात मोहन बागान (४५) अव्वल, तर एफसी गोवा (४३) द्वितीय
मागील ५ लढतीत एफसी गोवाचे सलग विजय, तर मोहन बागानचे ४ विजय व १ बरोबरी
यंदा स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात फातोर्डा येथे २० डिसेंबर रोजी एफसी गोवाची मोहन बागानवर २-१ फरकाने मात
एकमेकांविरुद्धच्या ९ सामन्यांत मोहन बागानचे ५, तर एफसी गोवाचे ३ विजय, १ बरोबरी
उपांत्य फेरीसाठी सर्व खेळाडूंची आवश्यकता
आयएसएल स्पर्धेत द्वितीय स्थान निश्चित झाल्यानंतर मार्केझ यांनी मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध जिंकलेल्या मागील लढतीत नवोदित आणि कमी वेळ खेळलेल्या खेळाडूंना संधी दिली. मोहन बागानविरुद्ध अनुभवी आणि नवोदितांचे मिश्रण करण्याचे त्यांनी संकेत दिले. मात्र उपांत्य फेरीतील लढतींसाठी सर्व खेळाडू उपलब्ध असतील याकडे कटाक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले. या कारणास्तव स्पर्धेत तीन यलो कार्ड मिळालेला आयुष छेत्री याला कोलकत्यास जाणाऱ्या संघात जागा मिळालेली नाही. जय गुप्ता, तसेच ब्रायसन फर्नांडिस पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे मार्केझ यांनी संघ निवडीत धोका पत्करलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

