
पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत ‘शिल्ड’ जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एफसी गोवास रविवारी रात्री जबर धक्का बसला. सलग बारा लढती अपराजित राहिल्यानंतर त्यांना पराभवास सामोरे जावे लागले, त्यामुळे गुणतक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली.
जमशेदपूर येथील जेआरटी टाटा क्रीडा संकुल मैदानावर झालेल्या लढतीत जमशेदपूर एफसीने ३-१ फरकाने सफाईदार विजय नोंदविला. हावी सिव्हेरियो याचे दोन गोल निर्णायक ठरले. जमशेदपूर एफसीचे ३४ गुण झाले आणि खलिद जमिल यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने दुसऱ्या क्रमांकापर्यंत प्रगती साधली. त्यांचा हा १८ सामन्यांतील अकरावा विजय ठरला. मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवास (FC Goa) तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे १८ सामन्यांनंतर ३३ गुणांसह ते तिसऱ्या स्थानी घसरले. अव्वल स्थानी असलेल्या मोहन बागान एफसीचे ४३ गुण असून त्यांना ‘शिल्ड’ पटकावण्याची नामी संधी आहे.
जमशेदपूर एफसीच्या प्रारंभापासूनच्या आक्रमक खेळासमोर एफसी गोवाचा बचाव भेदरला. सुरवातीस काही फटके हुकल्यानंतर जमशेदपूर एफसीने लक्ष्य साधले. लाझार किर्कोविक याने ३४व्या मिनिटास बॉक्सबाहेरून मारलेल्या डाव्या पायाच्या ताकदवान फटक्यावर यजमान संघाला आघाडी मिळवून दिली. ३७व्या मिनिटास एफसी गोवाचा गोलरक्षक ऋतिक तिवारी चेंडू व्यवस्थित अडवू शकला नाही, चेंडू हातून निसटला आणि त्याचा लाभ उठवत हावी सिव्हेरियो याने अगदी जवळून जमशेदपूरच्या खाती आणखी एका गोलची भर टाकली. ४५+१व्या मिनिटास आयुष छेत्री याने दूरवरून मारलेल्या शानदार फटक्यावर एफसी गोवाची पिछाडी १-३ अशी कमी झाली.
६८व्या मिनिटास सिव्हेरियो याने सेटपिसेसवरील हेडिंगवर जमशेदपूरची आघाडी ३-१ अशी मजबूत केल्यानंतर एफसी गोवास सामन्यात पुनरागमन करणे शक्य झाले नाही. प्रशिक्षक मार्केझ यांनी आर्मांदो सादिकू, साहिल ताव्होरा, जय गुप्ता, महंमद यासीर व मुहम्मद नेमिल या बदली खेळाडूंना पाचारण केले, पण त्याला परिणाम जमशेदपूर एफसीच्या वर्चस्वावर झाला नाही. एफसी गोवाचा पुढील सामना सहा फेब्रुवारी रोजी फातोर्डा येथे ओडिशा एफसीविरुद्ध होईल. जमशेदपूर एफसीसमोर नऊ फेब्रुवारीस बंगळूर एफसीचे आव्हान असेल.
मोसमात जमशेदपूरचा एफसी गोवावर लागोपाठ दुसरा विजय
पहिल्या टप्प्यातही फातोर्डा येथे २-१ फरकाने बाजी
एकंदरीत १५ आयएसएल सामन्यांत जमशेदपूर एफसीचे एफसी गोवावर ६ विजय, ८ पराभव
सलग १२ लढतीत ८ विजय व ४ बरोबरी नोंदविल्यानंतर एफसी गोवाचा पहिला पराभव
यंदा आयएसएलमध्ये अवे लढतीतही एफसी गोवा पहिल्यांदाच पराभूत, यापूर्वी ८ लढतीत ४ विजय व ४ बरोबरी
जमशेदपूर एफसी यंदा सलग ६ सामने घरच्या मैदानावर अपराजित (५ विजय, १ बरोबरी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.