.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Cooch Behar Trophy 2024 Goa Vs Chhattisgarh Cricket Match
पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली, त्यामुळे त्यांचा पहिला डाव कोसळला. पाहुण्या छत्तीसगडपाशी आता एकूण सव्वादोनशे धावांची आघाडी जमा झाली असून सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पकड मजबूत केली.
स्पर्धेतील चार दिवसीय सामना सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू आहे. क गट लढतीत दुसऱ्या डावात छत्तीसगडने सलामीच्या प्रथम जाचक याच्या आक्रमक शतकाच्या बळावर दुसऱ्या दिवसअखेर २ बाद १४६ धावा केल्या. प्रथम ११७ धावांवर खेळत आहे. त्यांच्यापाशी एकूण २२५ धावांची आघाडी आहे. गोव्याच्या गोलंदाजांवर तुटून पडताना प्रथम याने ११६ चेंडूंतील खेळीत १२ चौकार व पाच षटकार मारले.
त्यापूर्वी, छत्तीसगडने सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी २२१ धावा केल्या होत्या. शुक्रवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गोव्याचा पहिला डाव बिनबाद ११ वरून उपाहारानंतर १४२ धावांत गडगडला. त्यामुळे छत्तीसगडला पहिल्या डावात ७९ धावांची आघाडी मिळाली. शमिक कामत (१५) व अनुज यादव (२५) यांनी सातव्या विकेटसाठी केलेली ३९ धावांची भागीदारी डावात सर्वोच्च ठरली. मात्र अखेरच्या चार विकेट गोव्याने अवघ्या तीन धावांत गमावल्या.
छत्तीसगडतर्फे धनंजय नायक (५-३५) व आदित्य अगरवाल (३-३०) या गोलंदाजांनी गोव्याच्या फलंदाजांना कोंडीत पकडले. यजमान संघातर्फे तिसऱ्या क्रमांकावरील दिशांक मिस्कीन याने सर्वाधिक ३५ धावा केल्या.
छत्तीसगड, पहिला डाव ः २२१
गोवा, पहिला डाव (बिनबाद ११ वरून) ः ५७.३ षटकांत सर्वबाद १४२ (आदित्य कोटा २४, शंतनू नेवगी १७, दिशांक मिस्कीन ३५, यश कसवणकर ५, निसर्ग नागवेकर १, जीवनकुमार चित्तेम १५, शमिक कामत १५, अनुज यादव २५, समर्थ राणे ०, निश्चय नाईक ०, नील नेत्रावळकर नाबाद ०, धनंजय नायक १४.३-३-३५-५, अंकितकुमार सिंग ७-२-२५-१, आदित्य अगरवाल १३-५-३०-३, विकल्प तिवारी ११-३-१७-१).
छत्तीसगड, दुसरा डाव ः ३७ षटकांत २ बाद १४६ (प्रथम जाचक नाबाद ११७, आदित्य श्रीवास्तव १०, कृष्णा टौंक नाबाद १६, समर्थ राणे ३-१-१२-०, शमिक कामत १-०-८-०, अनुज यादव १२-१-५८-१, यश कसवणकर ११-१-२७-१, नील नेत्रावळकर ५-०-२३-०, निश्चय नाईक ५-०-१७-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.