मडगाव: सांताक्रूझ सोसायटी ऑफ पोइटोमाड्डो-कुंकळ्ळी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या पहिल्या आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत काणकोण स्पोर्टस क्लबने दिकारपाले स्पोर्टस क्लबवर 3-0 अशा फरकाने विजय मिळवला.
दरम्यान, यावेळी कुंकळ्ळीचे आमदार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव उपस्थित होते. त्यांनी विजयी संघाचे अभिनंदन करुन फुटबॉलचा दर्जा उंचावण्याची गरज असल्याचे सांगितले. ‘‘फुटबॉल गोमंतकीयांच्या रक्तात आहे, त्यामुळे या क्षेत्रात तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांना यासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे,’’ असेही त्यांनी नमूद केले.
फादर डॉमनिक सावियो रॉड्रिग्ज, कुंकळ्ळी नगरपालिकेचे अध्यक्ष लँड्री मास्करेन्हास, माजी आमदार आरेसियो डिसोझा, सांताक्रूझ सोसायटी ऑफ पोइटोमाड्डोचे अध्यक्ष रायमुंडो डिसोझा, सचिव मारियो वाझ, खजिनदार सावियो डिसोझा यांचीही यावेळी उपस्थिती होती.
‘‘प्रभाग स्तरीय किंवा ग्रामपातळीवरील स्पर्धांचे आयोजन केल्यास आपल्या खेळाचे रक्षण होण्यास मदत होते. सध्याच्या परिस्थितीत फुटबॉलचा दर्जा घसरला आहे. फुटबॉलचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे,’’ असे युरी आलेमाव म्हणाले. ‘‘क्रीडा अधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून आपल्या तरुणांना सर्व सोयी-सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांना फुटबॉल खेळण्याकडे आकर्षित करण्यासाठी पाउले उचलावीत. यामुळे संबंधित क्रीडापटूला मदत तर होईलच, शिवाय राज्याचा आणि देशाचा अभिमानही वाढेल,’’ असे आलेमाव यांनी पुढे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.