

पणजी: एफसी गोवा संघ बरोबरीचा एक गुण प्राप्त करण्याच्या दिशेने असताना त्यांना सामन्याच्या भरपाई वेळेत जबरदस्त झटका बसला. प्रतिहल्ल्यावर बदली खेळाडू सोहम वर्षनेय याने केलेल्या शानदार गोलमुळे बंगळूर एफसीने २-१ अशा निसटत्या विजयासह इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात पूर्ण तीन गुणांची कमाई केली.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शुक्रवारी झालेला सामना रंगतदार ठरला. बोर्हा मार्टिनेझ याने १२व्या मिनिटास बंगळूर एफसीसाठी गोल केल्यानंतर लगेच १७व्या मिनिटास फ्रान्चू याने एफसी गोवास बरोबरी साधून दिली.
त्याचा हा स्पर्धेतील वैयक्तिक दुसरा गोल ठरला. १-१ हाच गोलफरक कायम राहण्याची शक्यता असताना ९०+३ व्या मिनिटास आशिक कुरुनियान याच्या असिस्टवर सोहमच्या गोलमुळे बंगळूरने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. एफसी गोवा संघाचा या गोलला आक्षेप होता. प्रतिस्पर्धी खेळाडू ऑफसाईड असल्याचा त्यांचा दावा होता, पण अखेरीस सामन्याचा निकाल काही बदलला नाही, त्यामुळे घरच्या मैदानावर एफसी गोवाला सलग दोन बरोबरीनंतर पहिला पराभव पत्करावा लागला.
बंगळूर एफसीचे आता तीन विजय व एका बरोबरीसह चार लढतीतून १० गुण झाले आहेत. त्यांनी आता तिसरा क्रमांक मिळविला आहे. दोन बरोबरी व एका विजयानंतर पराभूत झालेल्या एफसी गोवाचे चार लढतीतून पाच गुण कायम राहिले असून ते सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचा पुढील सामना २१ नोव्हेंबर रोजी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होईल.
दृष्टिक्षेपात...
एफसी गोवा २०२६-२७ मधील आयएसएलमध्ये फातोर्ड्यातील ३ लढतीत विजयाविना
फातोर्डा येथे बंगळूर एफसीचा सलग दुसरा विजय, ४ एप्रिल २०२६ रोजी एफसी गोवावर २-० अशी मात
एफसी गोवाविरुद्धच्या २३ लढतीत बंगळूर एफसीचे आता १० विजय
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.