

नुकतेच दिवंगत झालेले माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांचा फोंड्यात उत्तराधिकारी कोण, हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. गरिबीतून वर येऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेणार्या रविंना तसा पर्याय सापडणे कठीणच. रवि हे एक वेगळेच रसायन होते. तसे रसायन फोंड्यात सोडा गोव्यातसुद्धा परत तयार होणे जवळजवळ अशक्यच. पण शेवटी ‘शो मस्ट गो ऑन’ या तत्त्वाप्रमाणे पर्याय हा शोधावाच लागतो आणि पोटनिवडणुकीद्वारा हा पर्याय शोधला जाणार आहे.
रविपुत्र रितेश वा रॉय यांना बिनविरोध निवडून आणावे असा एक प्रवाह होता. पण आता अनेक इच्छुकांनी बाशिंग बांधायची तयारी सुरू केली असल्यामुळे तो प्रवाह कालबाह्य ठरला आहे. त्यामुळे आता रविंचा उत्तराधिकारी कोण होऊ शकतो, हा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे. यात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपची उमेदवारी.
सध्या या उमेदवारीकरता रविपुत्र व फोंडा पालिकेचे नगरसेवक तथा दक्षिण गोवा भाजपचे सचिव विश्वनाथ दळवी हे दावेदार आहेत. मगो पक्ष आणि भंडारी समाज यांनी रितेशांवर बोट ठेवले आहे, तर भाजपचे मूळ कार्यकर्ते दळव्यांना उमेदवारी द्यावी म्हणून आग्रह करत आहेत. पण प्रश्न आहे तो लोकांना काय पाहिजे, हा!
मुख्य म्हणजे फोंडा हा भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता. गेल्या वेळी केवळ रविंच्या ‘करिष्मा’मुळे हा मतदारसंघ भाजपला मिळू शकला. फोंड्यात भाजपची पाच साडेपाच हजार मते आहेत. पण ती जिंकायला पुरेशी नाहीत. मागच्यावेळी रविंना उमेदवारी दिल्यामुळे मूळ भाजप कार्यकर्ते नाराज होते. त्यांनी पडद्याआडून रविंविरोधात कामसुद्धा केले होते. पण रवि धुरंधर राजकारणी असल्यामुळे या राजकारणाला पुरून उरले.
पण तरीही त्यांचे नुकसान झालेच. नेहमी नऊ-साडेनऊ हजारच्या घरात असणारे रवि साडेसात हजाराकडे पोहोचून केवळ ७७ मतांनी काठावर पास झाले होते. लक्षात घ्या २०१२साली निवडणूक हरूनसुद्धा रविंना मते पडली होती ९४५०. याचा अर्थ गेल्यावेळी रविंच्या मतांत तब्बल दोन हजारांची घट झाली. सांगायचा मुद्दा म्हणजे रितेश यांना भाजपची उमेदवारी दिल्यास त्या गेमची पुनरावृत्ती होऊ शकते. तशी तयारीही सुरू झाली आहे.
परवा भाजपचा एक मूळ कार्यकर्ता हेच सांगत होता. पहिल्यांदा रवि आता त्यांचा मुलगा. मग भाजपला ‘अच्छे दिन’ येण्याकरता ज्यांनी कष्ट केले त्या मूळ भाजपवाल्यांना उमेदवारी कधी मिळायची? हा त्याचा सवाल होता. दुसर्या बाजूला विश्वनाथ दळवी हे मूळ भाजपचे तसेच संघाचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपमध्ये बंडाळी होण्याची शक्यता कमी असली तरी ते फक्त भाजपच्या मतांवर निवडून येऊ शकणार नाहीत हेही तेवढेच खरे. त्याकरता त्यांना स्वतःच्या दोन-तीन हजार मतांची तयारी करावी लागणार हे निश्चित आहे.
एक मात्र खरे, की भाजप हा वस्तुनिष्ठ पक्ष आहे. तो भावनेपेक्षा उमेदवाराच्या ‘विनेबिलेटी’ला किंमत देत असतो हेही सर्वज्ञात आहे. फोडा हा रवि कॉंग्रेसमध्ये असताना कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जायचा. म्हणूनच तर ते या मतदारसंघातून चार वेळा निवडून येऊ शकले. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांना सरासरी साडेनऊ हजार मते पडायचीच.
रविंनी कॉंग्रेस सोडल्यानंतर गेल्यावेळी कॉंग्रेसच्या राजेश वेरेकरा ना मिळाली फक्त ६,८४० मते म्हणजे जवळजवळ तीन हजार कमी. २०१७साली जेव्हा राजेश वेरेकर अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते तेव्हा त्यांना साडेचार हजाराच्या आसपास मते मिळाली होती. पण कॉंग्रेसमध्ये गेल्यावर त्यांची फक्त दोन हजारच मते वाढू शकली.
पण मग कॉंग्रेसची रविंना मिळणारी ती तीन हजार मते कुठे गेली, हा प्रश्न उपस्थित होतोच. यातील बहुतेक मते मगोच्या डॉ. केतन भाटीकरांना गेली, असा राजकीय विश्लेषकांचा होरा आहे. आता यावेळी ही भाटीकर रिंगणात उतरणार असल्यामुळे याचीच पुनरावृत्ती होते की काय हे बघावे लागेल. भाटीकर हे गेली निवडणूक फक्त ७७ मतांनी हरले होते.
हरल्यानंतरही ते सक्रिय होते हे कुणीही नाकबूल करणार नाही. पण गेल्यावेळी ते मगोचे उमेदवार होते. यावेळी मगो भाजपची युती असल्यामुळे आणि मगोने भाजपला पाठिंबा देणार म्हणून जाहीर केल्यामुळे भाटीकराना बहुधा अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे लागणार असे दिसते आहे आणि त्यामुळे फरक पडू शकतो.
कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी सध्या फोंड्यात स्थिती दिसते आहे. मतदारांचा कानोसा घेतल्यावरसुद्धा परिस्थिती स्पष्ट होताना दिसत नाही. त्यामुळे रविंचा उत्तराधिकारी कोण याचे उत्तर अजून तरी अंधारात आहे एवढे निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.