संपादकीय: कुठे हरवला टिळकांचा विचार?

Lokmanya Tilak: स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्यामागे एक धगधगता, पवित्र विचार होता.
Lokmanya Tilak
Lokmanya TilakDainik Gomantak
Published on
Updated on

आमोद कुलकर्णी

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली, तेव्हा त्यामागे एक धगधगता, पवित्र विचार होता. पारतंत्र्यात पिचलेल्या समाजाने एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, प्रबोधनाची ज्योत पेटून राष्ट्रीय चारित्र्य घडावे. पण आज गल्लीबोळांतील चौकांत डोकावून पाहिले, तर टिळकांच्या त्या उदात्त विचारांची राखरांगोळी झालेली दिसते.

गणेशोत्सवाचा जन्म लोकजागृतीसाठी झाला, त्याचे रूपांतर आज निव्वळ बीभत्स प्रदर्शन, अमानुष उपद्रव आणि विकृत गोंधळात झाले आहे. उत्सवातील गर्दी ही लोकसंस्कृतीची ताकद असू शकते, पण त्या गर्दीला जेव्हा कर्णकर्कश, छातीचे ठोके चुकवणाऱ्या विकृत गोंगाटाचे ग्रहण लागते, तेव्हा ती भक्ती उरत नाही; ती सरळ सरळ सामाजिक दहशत बनते.

Lokmanya Tilak
Goa Onion Price: कांदा पुन्हा रडवू लागला! पणजी बाजारात किलोमागे 70 रुपये, फलोत्पादन महामंडळाकडून 58 रुपयांत विक्री

लाखोंची उधळपट्टी करून लावलेल्या त्या अवाढव्य डीजे सिस्टीम्स, डोळे आंधळे करणारे विषारी लेझर झोत आणि त्या तालावर बेभान होऊन अंगविक्षेप करणारी तरुणाई, हे चित्र डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. एका बाजूला रुग्णालयात जगण्याची धडपड करणारे रुग्ण, घरात कान दाबून थरथरणारी लहान मुले व वृद्ध, आणि अभ्यासासाठी एकाग्रता शोधणारे विद्यार्थी या सर्वांच्या जगण्याच्या हक्कावर हा उन्मादी दणदणाट पाय देऊन उभा आहे. देव असा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने प्रसन्न होतो, हा भ्रम समाजाच्या डोक्यात भरवला कोणी?

याहीपेक्षा विदारक वास्तव आपल्या पुढच्या पिढीचे आहे. घरात पाच इंची स्क्रीनच्या विळख्यात कोवळे बालपण आधीच होरपळत आहे. मैदानी खेळ, माणसांचा जिव्हाळा आणि वाचनाची गोडी हरवून बसलेली ही मुले बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्यासमोर हाच हिडीस गोंधळ ‘संस्कृती’ म्हणून पेश केला जातो. पालकांनी आपल्या सोयीसाठी मुलांच्या हातात दिलेला मोबाईलचा विस्तव आणि मंडळांनी चौकात चालवलेला हा मानसिक गोंगाट, दोन्ही मिळून पुढच्या पिढीला बौद्धिक दिवाळखोरीकडे ढकलत आहेत.

विशेष म्हणजे, दुसरीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि तिचा राजभाषा म्हणून सन्मान व्हावा यासाठी व्यासपीठांवर छाती बडवणारे नेते आणि संस्थांचे कार्यकर्ते याच उत्सवांत काय करतात? मंडळांच्या मंडपांत कोणत्या भाषेचे संवर्धन चालू असते? तिथे घुमतात ती केवळ बेसूर, अश्लील आणि अर्थहीन हिंदी-विदेशी गाणी. जर भाषेचा एवढाच अभिमान असेल, तर गणेशोत्सवासारख्या महामंचावरून मायमराठीच्या समृद्ध साहित्याचा गजर का होत नाही? चौकात संतांचे अभंग, मराठी साहित्यातील अभिजात नाट्यछटा, पोवाडे आणि वैचारिक व्याख्याने ऐकू का येत नाहीत? केवळ राजकीय आंदोलने आणि घोषणाबाजी करून भाषा टिकत नसते; ती लोकसंस्कृतीच्या जगण्यात रुजवावी लागते.

Lokmanya Tilak
Goa Road Accidents: गोव्यात 'वीकएंड' ठरतोय जीवघेणा! ऑगस्टमध्ये 226 अपघात, 20 सप्टेंबरपर्यंत 188 जणांचा मृत्यू

वास्तविक पाहता, ज्या गजाननाची आपण पूजा करतो, त्याच्या प्रत्येक अंगरूपातच जगण्याचे सर्वोच्च तत्त्वज्ञान सामावलेले आहे. गणपतीचे ते बारीक, तीक्ष्ण डोळे आपल्याला सांगतात, ‘वरवरच्या आभासी झगमगाटाला भुलू नका, प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म, सखोल अवलोकन करा.’ त्याचे ते सुपासारखे अथांग कान शिकवतात,‘कमी बोला, पण समाजाचे अश्रू, दुःख आणि ज्ञान शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता ठेवा.’

त्याचे विशाल मस्तक अथांग ज्ञानाचे प्रतीक आहे, तर त्याचे लहान तोंड कमी आणि तोलून-मापून बोलण्याचा संदेश देते. त्याचे लंबोदर जगातील कटू-गोड पचवून शांत राहण्याची शिकवण देते. बाप्पाच्या या रूपाचा अंश जरी आपण स्वतःमध्ये उतरवला, तर आजच्या स्क्रीनच्या आहारी गेलेल्या पिढीला खरी एकाग्रता सापडेल आणि समाजातील हा कर्कश थयथयाट क्षणात थबकेल.

Lokmanya Tilak
Goa Politics: 'गोवा रक्षण यात्रेने फरक पडणार नाही'; 2027नंतरही भाजपचेच सरकार येणार, विश्वजीत राणेंचा दावा

धावपळीच्या, ताणतणावाच्या जीवनात अस्वस्थ मनांना खरी गरज आक्रस्ताळेपणाची नाही, तर अंतर्मुख करणाऱ्या शांततेची आहे. चौकातील विकृत तालांपेक्षा घराघरांत आणि मंडळांत सात्विक, लयबद्ध ‘गणपती अथर्वशीर्ष’ गुंजले, तर त्या उच्चारांमधील नादब्रह्म मेंदूला खरी मानसिक शांती आणि एकाग्रता देईल. खरी भक्ती ही कृतीत उतरावी लागते. डीजेवर लाखो रुपये उधळण्यापेक्षा मंडळांनी विधायक कामांसाठी तिजोरी उघडावी.

दर्शनाला येणाऱ्या भाविकांनीही सुकणाऱ्या हारांचा आणि नासणाऱ्या फळांचा ढीग करण्यापेक्षा वह्या, पुस्तके, पेन आणि शैक्षणिक साहित्य बाप्पाच्या चरणी अर्पण करावे. यामुळे मंदिराबाहेरील कचरा तर टळेलच, पण एका वंचित लेकराच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. मंडळांनी केवळ दहा दिवसांचा देखावा न करता कायमस्वरूपी अभ्यासिका, ग्रंथालये सुरू करावीत, नव्या लेखकांच्या साहित्याला हक्काचे व्यासपीठ द्यावे. मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांसाठी मैदानी खेळांच्या व वक्तृत्व स्पर्धा भरवाव्यात, आणि तोच अवाढव्य पैसा दुर्धर रुग्णांच्या औषधोपचारासाठी, रक्तदान शिबिरांसाठी व पर्यावरणस्नेही उपक्रमांसाठी वापरावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com