Goa Opinion: गोव्यात हजारो देवळे आहेत, पण मानवतेला 'आदर्श' वाटणारे मंदिर कोणते आहे?

Impact of religion on Goan society: गोवा मुक्त झाला तेव्हा आधुनिक गोवा उभारण्याचे एक नवे व्रत आपण स्वीकारलेले होते. त्यानंतर अधिकृत शिक्षणाची कास आपण धरली.
Goa Temple
TempleDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याविषयीचे माझे मत हळूहळू बदलत चालले आहे.सुशिक्षित समाज व आधुनिक विचारसरणी म्हणून मी नेहमीच गोव्याला शेष भारताच्या वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. परंतु देवळांमध्ये जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. धर्माचा पगडा वाढत चालला आहे. या धर्माने अंधश्रद्धा निर्माण केल्या. जातीचे बंध आणखी घट्ट होत आहेत.

येथे देवळांमध्ये-मठांमध्ये, सनातन्यांच्या गोटात जाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शिरगाव जत्रेत चेंगराचेंगरीत माणसे मरण पावतात. तेथे एक नवीन गोष्ट समजते, वर्षागणिक धोंडांची संख्या ५००हून अधिक वाढत चालली आहे. माणसे कधी नव्हे एवढी श्रद्धावान झालीच शिवाय कर्मकांडांच्या आहारी गेली... आबालवृद्धांपासून कोणीही धोंड होऊ शकतो. महिनाभर ते संपूर्णत: ईश्वर भक्तीत रममाण होतात, परंतु त्यानंतर काय?

गोव्यात देवळे आणि मठांचा सुकाळ झाला आहे. जितके श्रद्धावान अधिक तेवढी देवळे आणि तेवढे मठ! तेथे व्रतवैकल्ये चालूच आहेत आणि श्रद्धावान महिनोंमहिने तेथे कर्मकांडे करीत असतात की प्रश्न पडावा, त्यांना काही कामधंदा आहे की नाही? एक महिना कर्मकांड?

कोणालाही वाटेल हे लोक कामच करीत नाहीत का? यांचे जर उद्योग, व्यवसाय असतील तर महिनाभर ते बंद ठेवून त्यांना चालेल काय? की ते सरकारी सेवक आहेत? सरकारी नोकऱ्या त्यांना हव्या असतात कामच न करण्यासाठी!

सध्या ‘धोंड’ हा प्रकार काय आहे, यावर समाजकार्यकर्त्या नमन सावंत धावस्कर यांनी अत्यंत स्फोटक लेख लिहिला आहे. ‘‘धोंड हे आपले रक्षक आहेत, असा संस्कार मागच्या पिढीने आमच्यावर केला, पण पुढे ही परिस्थिती बदललेली दिसली. मुलींनी जत्रेला जाणेच कमी केले...अन् ती मस्ती, ढकलाढकली, कोपर मारणे, नको तिथे हात लावणे, गर्दीचा फायदा घेऊन हे करताना चोरी करणे अशा घटना घडू लागल्या. त्यात धोंड मंडळी अग्रेसर आहेत, हेही लक्षात आले.

त्यामुळे रक्षक म्हणून आम्ही ज्या विश्‍वासाने धोंडांकडे पाहात होतो, तो विश्‍वास नवीन धोंडांनी गमावला आहे. काही धोंड मानासाठी धावतात. पालखी बाहेर येते तेव्हा झुंडीच्या झुंडी अंगावर येतात...’’ हे भयंकर आहे. शिवाय आता सत्यशोधन समितीचा अहवाल सादर झाला आहे. त्यात मंदिर समिती, सरकारी अधिकारी साऱ्यांनाच हलगर्जी, बेजबाबदारपणासाठी दोष दिला आहे. लोकांचाही दोष आहे. देवळांच्या व्यवस्था, आपली तथाकथित श्रद्धा अशा पद्धतीने चव्हाट्यावर आली. गोव्यातल्या श्रद्धा-भावनेच्या चिंधड्या उडाल्या... या जत्रांचा धर्माशी किती संबंध आहे, माहीत नाही, परंतु तसा तो असेल तर आमचे सामाजिक नेते त्यावर विचार करणार आहेत की नाही?

विज्ञानाची वाढ झाल्याने जीवनातून धर्माचे प्राबल्य कमी होईल. माणसे आधुनिक बनतील असा विचार १९व्या शतकाच्या शेवटी सर्व विचारवंतांनी बाळगला होता; परंतु भारतच नव्हे तर संपूर्ण युरोप सध्या उजवीकडे झुकू लागला आहे.

भारतातील काही वैज्ञानिक आता लवकरच परंपरागत श्रद्धा मरणार असल्याचे मत बाळगून होते. बहुतांश विचारवंत धर्म ही प्रतिगामी शक्ती असल्याचे मानीत असत; पण धर्माला प्रतिगामी शक्ती मानणे पुरेसे नाही. धर्म हा नेहमीच पाप-पुण्याच्या कल्पना सांगतो. नीती-अनीतीचे धडे देतो व तत्त्वज्ञान सांगत असतो.

धर्म ही कालौघात मृतप्राय ठरलेली शक्ती आहे, सर्व विकासाला अडथळा करणारी शक्ती आहे, म्हणून ज्ञानाच्या व औद्योगिकीकरणाच्या प्रसाराने ती आपोआप मरेल. परंतु धर्म आणि तज्जन्य जुनाटपणा यांच्याविरुद्ध प्रदीर्घ पद्धतशीर लढा द्यावा लागतो. जाहीररीत्या धर्माची चिरफाड करण्याची सवय सध्या विचारवंतांनी सोडूनच दिलेली आहे. विज्ञाननिष्ठ मन निर्माण करण्याचा प्रयत्न सोडणे धोक्याचेच आहे.

धर्म म्हणजे काय? ‘धर्म’ हा शब्द अनेक अर्थानी वापरला जातो. आपल्या प्राचीन वाङ्मयात ‘धर्म’ हा शब्द विविध प्रकारे वापरलेला आहे. वस्तूंचे नैसर्गिक गुणधर्म हा जसा ‘धर्म’ शब्दाचा एक अर्थ आहे, त्याचप्रमाणे जीवनातील अंतिम न्याय, शुद्ध न्याय हाही ‘धर्म’ शब्दाचा अर्थ आहे.

सर्व समाजाचे धारण व्हावे, सर्वांचे कल्याण व्हावे, त्यासाठी म्हणून जे आचरण आपण करतो, तेही धर्म या नावाने संबोधले गेले आहे. याखेरीज ‘धर्म’ शब्दाचा अध्यात्म हा एक अर्थ आहे. सृष्टीतील अंतिम सत्याविषयी वेगवेगळ्या संतांच्या वेगवेगळ्या श्रद्धा असतात. पण सृष्टीपलीकडच्या कोणत्याही सर्वसत्ताधीश तत्त्वावर संतांची श्रद्धा असते. हे तत्त्व परममंगल, न्यायी व दयाळू असते, वत्सल असते.

‘धर्म’ या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे तोच समाजामध्ये सर्वत्र अनुभवाला येत असतो. हा धर्म म्हणजे एखाद्या समाजात प्रतिष्ठा पावलेल्या, स्थिर झालेल्या सामाजिक परंपरांचा बनलेला असतो. या परंपरा समाजरचनेच्या असतात. अर्थव्यवहाराच्या असतात. सामाजिक चालीरितींच्या असतात. त्यात प्रतिष्ठित श्रद्धा व कायदे येतात.

उपासना व समजुती येतात. हा जो धर्माचा सार्वजनिक जीवनातील पसारा असतो तो मुळातच दोन दृष्टींनी सदोष असतो. एक म्हणजे ज्या काळाच्या, अर्थव्यवस्थेला व समाजाला अनुसरून ही पद्धत निर्माण झालेली असते, तो काळ बदलला की ती पद्धत समाजाची शत्रू होते, हेच आपण समजून घेत नाही. जी आई जन्मलेल्या मुलाला स्तनपान देत नाही ती आई मुलाची शत्रू असते हे पहिले सत्य; पण आई वर्षभराच्यानंतरही दुधाशिवाय इतर काही पिऊ देत नाही तीही मुलाची शत्रू असते... जे एकेकाळी हिताचे असते ते तो काळ बदलला की अहिताचे होऊन जाते.

पण परंपरा एकदा प्रतिष्ठित झाली, त्या परंपरेविषयी ममत्व निर्माण झाले, म्हणजे त्या ममत्वाच्या पोटी समाजाची शत्रू झालेली ही चौकट आपण सर्व शक्तिनिशी जतन करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी धर्म हा आपल्याच कक्षेतील प्रजेचा विकास अडवून ठेवणारा व स्वतःच्या अपत्यांचा शत्रू झालेला असतो.

सामाजिक जडणघडणीच्या दृष्टीने मौलिक बाब म्हणजे काही परंपरा मूलत:च अन्यायी असतात. एकाच्या हितासाठी दुसऱ्याचा बळी देणाऱ्या. या परंपरा शोषकांनी आपल्या स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात. त्या निर्माण झाल्या, तेव्हा हानिकारकच होत्या व जोपर्यंत टिकल्या, तोपर्यंत हानीच करीत राहिल्या.

सामाजिक अन्याय हाच येथे परंपरेचा आधार असतो, तेथे ती परंपरा कालबाह्य झाली म्हणून दूषित होत नाही; मुळातच ती दूषित असते; परंतु हे विषसुद्धा परंपरेने प्रेमाचे अधिष्ठान बनविलेले असते. अभिमानाचा विषय बनविलेले असते. कारण अशा परंपरांत अनेकांचे घर जळत असते, तर काहींना शेक लागून त्यांची थंडी निवारण होत असते. हे ‘काही’ चतुर भ्रमजाल निर्माण करणारे असतात. वेसणीला नथ आणि बेडीला गोणपाटल्या मानण्यास शिकवणारे असतात.

आपल्या कालमर्यादा संपून गेल्यानंतर कोणताही धर्म एक सामाजिक घटना म्हणून या दोन्ही दृष्टींनी सदोष झालेला असतो. धर्म या नावाने अशावेळी सामाजिक जीवनात जो पसारा वावरत असतो, त्याचे रूप सामाजिक कचऱ्याचे व घाणीचे असते. हा सर्व धर्मांचे पूट चढलेला, परलोकाचे नयनरम्य वेश परिधान केलेला सार्वजनिक कचरा असतो.

त्या घाणीचे संत हे सर्वात मोठे शत्रू असतात. कारण संतांची प्रेरणा दयेची, करुणेची, मूलभूत न्यायाची असावी लागते. या वातावरणात जो या सामाजिक अर्थाने खराखुरा धार्मिक असतो, तो समाजातील सर्व चालिरितींचा, प्रथांचा संरक्षक असतो. कोणताही खराखुरा संत या अर्थाने धार्मिक असत नाही. संतांना सामाजिक अन्याय संपवता आला पाहिजे. त्यासाठी ते धार्मिक चालिरितींच्या विरुद्ध बंड करून उठलेले असतात.

श्रद्धा व सहिष्णुता या तत्त्वांमुळे धर्मात उदारता निर्माण होते. सहिष्णुतेचा अर्थ परिपूर्ण होण्यासाठी श्रद्धेची गरज असते. ती श्रद्धा म्हणजे माझ्या विचारातील काही भाग चुकीचा असू शकेल, तो मी दुरुस्त करण्यास तयार आहे, या भूमिकेला सहिष्णुता असे म्हणतात. खरी सहिष्णुता आत्मचिंतनाला प्रवृत्त करते.

Mangesh Temple Goa | Mahashivratri 2024
Mangesh Temple Goa | Mahashivratri 2024Dainik Gomantak

हे आत्मचिंतन करू न पाहणाऱ्या सनातन्यांशी गांधीजींनी सतत संघर्ष केला. गांधीजींनी ‘राष्ट्र’ व राष्ट्रवाद ही संकल्पना समानता व धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद या तत्त्वावर उभी केली तर इतरांच्या व्याख्या ‘धर्मा’वर आधारित होत्या. गांधीजी स्वतःही तत्त्वत: धर्मनिरपेक्ष होते व ख्रिस्ती धर्मातल्या आध्यात्मिक आणि नीती कल्पनांचा गांधीजींवर प्रभाव होता.

गांधीजींनी सतत मांडले की लोक आणि देव देशासमोर समान आहेत. ते म्हणायचे, मी जरी गाईची पूजा करीत असलो तरी, प्रत्येकाने अशी पूजा केली पाहिजे, गोमातेवर श्रद्धा ठेवली पाहिजे, असा आग्रह चुकीचा आहे. गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेली हिंसाही त्यांनी खपवून घेतली नाही. हिंदू बहुसंख्य असल्याने धार्मिक सद्‌भाव राखण्याची जबाबदारी हिंदूंवर जास्त आहे, असेही ते मानायचे.

Goa Temple
Lairai Jatra Stampede: ‘त्या’ अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी शिरगाव दुर्घटनेचा अहवाल दडपल्याची चर्चा, ड्रोनचा वापर केला नसल्याचा आरोप

दुसऱ्या बाजूला हिंदू राष्ट्र संकल्पना मांडणाऱ्यांनी जातव्यवस्था मान्य केली होती, वरिष्ठ जातींचे प्रभुत्वही मान्य केले होते. सत्ता आणि हिंसा यांची जातव्यवस्था निर्माण होण्यामागची मूलभूत भूमिकाही मान्य केली होती. पण जातीय असमानतेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले होते.

गांधीजींनी मात्र वसाहतवादाविरुद्ध लढताना सामाजिक, जातीय स्तरातल्या सर्व लोकांना घेऊन ते पुढे गेले. जरी या स्तरांमध्ये परस्पर विरोधाभास होता तरी अशा चळवळी गांधींनी उभारल्या. प्रत्येक गांधीवादी उद्रेक हा समाजातल्या एकेका व्यक्तीचे प्रतिनिधित्व करीत होता. आपण एक गोष्ट मान्य करायला हवी की गांधी हे अत्यंत पक्के समर्पित हिंदू होते. ते अत्यंत श्रद्धावान हिंदू होते. परंतु त्यांनी अनिष्ट चालिरिती, परंपरा, रुढी याविरुद्ध तीव्र लढा दिला. त्यांनी अस्पृश्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी विविधांगी प्रयत्न केले. सनातन्यांना त्यांनी जबरदस्त आव्हान दिले.

Goa Temple
Goa Temples: गोव्यातील मंदिरे! 'माझानिया' अर्थात मंदिरांचे मूळ संस्थापक आणि ‘गावकरी

धर्माची जोपासना करणे म्हणजे त्याच रुढी, अन्याय चालू ठेवणे असे आजही सनातन्यांना वाटते. आजचे संत आणि मठ देवळांमधल्या प्रथांवर बोलत नाहीत. जत्रांमध्ये होणाऱ्या ‘हिंसे’विरोधात भूमिका घेत नाहीत. वास्तविक जुनाट प्रथा म्हणजे हिंसाच असते. हिंदू धर्माला त्या गालबोट लावतात. धर्मात सभ्यता, मानवतावाद, प्रतिष्ठा, न्याय या तत्त्वांना महत्त्व असले पाहिजे.

देवळे वाईट आहेत आणि त्या सर्वांनीच मानवतेला काळीमा फासला आहे, असे मी कधीच म्हणणार नाही. संत गजानन महाराजांनी तयार केलेले ‘शेगाव मॉडेल’ हे त्यादृष्टीने आदर्श आहे. गोव्यात हजारो देवळे आहेत. गोव्याएवढे श्रद्धावान कुठेही नाहीत. शेजारील महाराष्ट्रालाही आपण मागे टाकले आहे. शिवाय वर्षागणिक त्यात सारखी भर पडत चालली आहे. परंतु राज्यात कुठेही असे मानवतेला आदर्श वाटणारे मंदिर आपण उभारू शकलो नाही, ही मनाला वाटणारी मोठी खंत आहे.

(या लेखात नरहर कुरुंदकर यांच्या अनेक लेखांतील उतारे वापरलेले आहेत.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com