Madhavrao Kamat: 'सकाळी केबिनमध्ये प्रवेश करणारे सर संध्याकाळी शेवटचा विद्यार्थी घरी गेल्यावरच कॅम्पस सोडायचे'; माधवराव कामत

Madhavrao Kamat Birthday: गोव्याच्या शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या वास्कोच्या एमईएस कॉलेजचे निवृत्त प्राचार्य माधवराव कामत यांचा वाढदिन.
Madhavrao Kamat
Madhavrao KamatDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गोव्याच्या शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या वास्कोच्या एमईएस कॉलेजचे निवृत्त प्राचार्य माधवराव कामत यांचा वाढदिन. यंदा ते ९१ वर्षाचे होत आहेत. गोव्याच्या शिक्षण क्षेत्राचा इतिहास लिहिल्यास त्यात कामत सरांचे नाव ठळक अक्षरांत लिहावे लागेल यात शंकाच नाही.

१९७१ साली जेव्हा वास्कोत एमईएस संस्थेतर्फे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा या संस्थेचे अध्यक्ष वसंतराव जोशी ऊर्फ अण्णा यांनी बेळगावच्या आरपीडी कॉलेजात शिकविणार्‍या माधव कामत यांना प्राचार्य म्हणून नियुक्त करण्याचे ठरवले.

खरं तर त्यावेळी कामत सरांच्या मागे तशी मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नव्हती. पण अण्णांनी त्यांच्यातले सुप्त गुण हेरले होते. म्हणून विरोध होऊनसुद्धा ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

आणि अशा रीतीने नव्याने सुरू झालेल्या एमईएस महाविद्यालयाची सूत्रे कामत सरांच्या हातात आली. पण समोर मोठे आव्हान होते. एका नव्या महाविद्यालयाला आकार देणे म्हणजे खायचे काम नव्हते.

त्यावेळी महाविद्यालयाचे वर्ग वास्कोच्या जोशी इमारतीत भरविले जात असत. १९७५साली संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालय सुरू झाल्यानंतर सकाळी महाविद्यालय तर संध्याकाळी उच्च माध्यमिक अशी कसरत सुरू झाली. जागा मर्यादित, खाली ऑटो सर्विस, शहरात मध्यवर्ती असल्यामुळे वाहनांचे आवाज अशा अनेक अडचणींना त्यावेळी तोंड द्यावे लागत असे.

नंतर १९८५साली दाबोली- जुवारी नगर येथे महाविद्यालयाचे स्थलांतर करण्यात आले. त्यावेळी हा परिसर अगदी निर्जन होता. पण कामतसरांची अविचल निष्ठा व जिद्दीमुळे या परिसराचा हळूहळू कायापालट होऊ लागला.

सकाळी आठ वाजता बॅग घेऊन आपल्या केबिनमध्ये प्रवेश करणारे सर संध्याकाळी शेवटचा विद्यार्थी घरी गेला आहे याची खात्री करूनच कॅम्पस सोडत असत. कॉलेज हेच त्यांनी आपले जीवन बनविले होते आणि त्यांच्या या परिश्रमाचे फळ आज विस्तृत झालेल्या एमईएस शैक्षणिक ’हब’च्या रूपात बघायला मिळत आहे.

सरांची सर्वात मोठी खासियत म्हणजे अनुशासन व माणुसकी यांची घातलेली मोट. शिस्त जोपासत असताना त्यांनी माणुसकीही सांभाळली आणि वेळोवेळी आपल्या सहअध्यायींना, विद्यार्थ्यांना प्रोत्साहनही देत राहिले.

म्हणून तर त्यांच्या मुशीतून तयार झालेले अनेक शिक्षक, विद्यार्थी राज्याच्या राजकारण, कला, साहित्य, चित्रपट अशा अनेक क्षेत्रांवर आपला पगडा बसवू शकले. मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री निलेश काब्राल, माजी मंत्री मिलिंद नाईक, जुझे फिलिप आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर

बहुआयामी व्यक्तिमत्त्व कै. विष्णू वाघ, सिनेकर्मी लक्ष्मीकांत शेटगावकर, अर्थतज्ज्ञ डॉ. मनोज कामत, विधिज्ञ ऍड. आत्माराम नाडकर्णी यांच्यासारख्या एमईएसच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी हे सिद्ध करून दाखविले आहे.

मी सुद्धा गोव्याच्या कला साहित्य, पत्रकारिता, चित्रपट क्षेत्राना जे योगदान देऊ शकलो त्याचे बरेचसे श्रेय ‘फक्त शिक्षक बनून राहू नका त्यापलीकडे जाऊन काहीतरी करा’ असा संदेश देणार्‍या आणि त्याप्रमाणे आचरण करणार्‍या आमचे प्राचार्य कामत यांना जाते यात शंकाच नाही!

Madhavrao Kamat
Opinion: ‘मी खूप थकलेय... मला माफ करा हो'! संपूर्ण भारताचाच गंभीर प्रश्‍न बनलेला विषय; विद्यार्थ्यांचे बळी

त्यांचा करिश्माच तसा असायचा. म्हणूनच तर गेल्या वर्षी दिवंगत झालेले मडगावचे हरिश्चंद्र नागवेकर हे मडगावच्या कॉलेजमध्ये नोकरी मिळत असूनसुद्धा केवळ कामतसरांमुळे मडगाव ते दाबोली प्रवास करीत शेवटपर्यंत एमईएसमध्ये राहिले.

फिजिक्स डिपार्टमेंटचे डॉ. नरहरी जंबगी गोवा विद्यापीठामध्ये नोकरी मिळत असूनसुद्धा कामत सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळावे म्हणून एवढी मोठी संधी सोडून शेवटपर्यंत एमईएसच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिकवीत राहिले. दिनेश कामत, पुजारी, नायरी, श्रीवल्लभ कामत, कै. क्लारा रोचा यांसारखे अनेक प्रभावी शिक्षक कामतसरांच्या काळात घडले.

Madhavrao Kamat
Opinion: 'लायब्ररिअन म्हणाला, आमच्याकडे कोकणी भाषेची फक्त 900 पुस्तकं आहेत'! विचारांच्या बाजारपेठेत

‘वर्गावर नियंत्रण ठेवा, शिकवणे आपोआप परिणामकारक होईल’ हा त्यांचा मूलमंत्र अनेक शिक्षकांना योग्य वाट दाखवून गेला. आज ते ९१ वर्षांचे झाले असले तरी त्यांचे कार्य अजूनही तेवढ्या जोमाने सुरू आहे. कितीतरी प्राचार्य आले आणि गेले पण सरांच्या स्थानाला कोणीही हात लावू शकलेला नाही. त्यांचे कार्य आजही मागच्या पानावरून पुढे सुरूच आहे.

या दीपस्तंभाच्या प्रकाशात आजही अनेक युवा शिक्षकांच्या नावा किनार्‍याला लागलेल्या दिसताहेत. म्हणूनच गोव्याच्या या आघाडीच्या शिक्षणतज्ज्ञाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा शतक महोत्सव साजरा करण्याचे भाग्य आम्हांला लाभो हीच त्या दयाघनाकडे प्रार्थना.

यूं तो लाख हस्ती देखे हमने

पर कामत सरजी तुमसा नही देखा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com