

मधू य. ना. गावकर
चिंबलमधील प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ व ‘प्रशासन स्तंभ’ हे वादग्रस्त प्रकल्प रद्द करण्यासाठी कष्टकरी समाजाने गांधीवादी तत्त्वाने सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर ४४व्या दिवशी यश मिळाले. गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळाने ‘युनिटी मॉल’ तर राज्य प्रशासन विभागाने ‘प्रशासन स्तंभ’ स्थलांतरित केले जातील अशी लेखी हमीपत्रे सोमवारी सायंकाळी उपोषणकर्त्यांना दिली.
चिंबलची जीवनधारा म्हणजे तोयार तलाव. सरकार म्हणते युवकांना नोकऱ्या मिळून बेरोजगारी नष्ट होणार, तिथला भूमिपुत्र म्हणतो प्रकल्प उभारल्यास तळ्याच्या परिसरात प्रदूषण होऊन जैविक संपदा नष्ट होऊन शेतकरी उद्ध्वस्त होणार.
कारण प्रकल्प परिसरात तिथले शेतकरी पावसाळ्यात भेंडी, भोपळा, दोडकी, काकडी, टरबूज, मुळा, नाचणी, वरी, कुळीथ, उडीद पीक घेऊन ते पणजी, रायबंदर, कालापूर बाजारात विकून आपला संसार चालवतात.
शिवाय खालच्या खाजन, सरदवांयगण शेतातील भात आणि भाजीपाल्याला टिकवण्यास लागणारे तोयार तळ्याचे पाणी नष्ट होऊन गरीब शेतकरी कुटुंबे संकटात सापडणार, हे खरे खोटे जाणून घेण्यासाठी बसच्या प्रवासाने चिंबल गाव गाठला.
तिथे गेलो तेव्हा आंदोलन सुरू होते आणि त्या ठिकाणी गोविंद शिरोडकर यांची भेट घेण्यासाठी गावात चौकशी केली. त्यांच्या पाच-सहा जणांच्या घोळक्याने मला कदंबा पठारावर येणाऱ्या युनिटीमॉल ठिकाणी जाण्यास सांगितले. गोविंद त्या जागी गावकऱ्यासोबत उपोषणास बसला आहे, माघारी फिरून परत प्रवासाने युनिटीमॉल जागेकडे थांबलो.
उपोषणास युवक, वृद्ध आणि शेतात काम करून घाम गाळीत पोटाची खळगी भरणाऱ्या बळीराजाच्या कन्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करीत होत्या. गोविंदाची नजर माझ्यावर पडताच त्यांचे डोळे भरून त्या पाण्याने मला तळ्याकडे जाण्याचा आणि परिसर पाहण्याचा सांगावा दिला.
दोन-तीन मिनिटे आम्ही मौन पाळून एकमेकांकडे पाहतच होतो. पर्यावरणीय काम करताना त्यांची माझी अनेकदा भेट झाली होती. त्यांनी उपोषणाठिकाणी बसण्यास जागा दिली. त्यावर मी म्हटले, ‘‘मला युनिटीमॉलचा परिसर आणि तोयार तळ्याचा परिसर पाहायचा आहे.’’ ते जरा स्तंभित झाले. एव्हाना अकरा वाजत आले होते, सूर्याची किरणे आग ओकीत होती.
यावेळेस एकट्या दोघांनी जंगलात जाणे धोक्याचे असल्याने त्यांनी आनंद कुंकळकर, माधव कुंकळकर, मोहन कुंकळकर, महेश कुंकळकर यांना साथीला घेऊन आमची तोयार तळ्याची आणि युनिटी मॉल परिसराच्या बाहेरील परिसराची जंगल यात्रा सुरू झाली.
आम्ही जंगल फिरताना उताराने खाली आणि चढावाने वर, जाणे-येणे करीत तलाव आणि युनिटीमॉल खालचा जंगल परिसर फिरत असताना डुक्कर, साळींदर, काटांडर यांची विष्ठा झाडाखाली आणि उघड्या जागी दिसली. गार, सरडा, सरपटणारे प्राणी आम्हांला दर्शन देत त्यांचे काम करीत होते.
झुडपात असलेल्या वारुळावर ओहोळाच्या कडेवरील दगडांच्या खाचांत नागसर्प, धामण, घोणस, मांडोळ, फुरसे, रक्तमांडोळ, उडणारे पासका, हरयाळी प्राण्यांच्या काती पाहून सावधपणे पुढे जाणे आम्ही पसंत केले.
तलावाच्या वरच्या भागातील परिसर पाहताना मोर, कवडा, बोंचुडी, कोकीळ, भारद्वाज पक्ष्यांचे दर्शन घडत होते. ‘हिवाळ्यात चाळीस-पंचेचाळीस जातींचे पक्षी मासळी खाण्यास तळ्यावर येतात’, असे सोबती म्हणाले. तळ्याच्या परिघात पाच, सहा घारी गिरट्या घालून सावज शोधत होत्या. दुसऱ्या बाजूने जंगल झुडपात कावळ्यांच्या जमावाची ओरड चालू होती.
इतक्यात निळ्या अंगाचा, लालभडक डोके, लांब चोचीचा सुतार तळ्यातील पाण्यात झेप घेऊन मासळी पकडून पसार झाला. काळा पाणबुडा पाण्यातून वर येऊन आम्हाला पाहताच दूरवर पळत जाऊन पंख फडकवू लागला. चार-पाच बगळे एक पाय वर करून सावलीत ध्यानस्थ उभे होते. तळ्यात कासव मोठ्या प्रमाणात वावरतात. देखळा, खेकडे, थिगूर, पिठ्ठोळ, कडूखखा, वाळेर, गोडी मासळी मोठ्या प्रमाणात आहे.
तळ्याच्या उत्तर, पूर्व, दक्षिण परिसरातून पठारावरील पावसाचे पाणी उतारावरून वाहत खाली येत तळ्यात साठते. त्यात उत्तर बाजूच्या ‘युनिटी मॉल’च्या परिसरातून बराच मोठा ओहोळ वाहत तळ्यात पावसाचे पाणी घेऊन येतो.
या ओहोळाचे मुख लहान होते ते मुख पूर्वजांनी भगीरथ प्रयत्नाने मोठे करून ओहोळातून वाहून येणारे पावसाचे पाणी मुखातून तलावात सोडले आहे. हे त्यांचे काम पाहून वरच्या जंगलात फिरण्यास जात असताना बाभ्री, बांबु, गेळ,कणेर, चुरण, करवंद, शमी, उरफाटी काठी, निवडुंग बोर, झुडपांचे काटे लागून हातापायाचे रक्त येऊ लागले. भेसड, फातरफळ, मिटकळ, हासळ, करवंद अशा रामनमेव्याने आम्हाला ऊर्जा दिली.
घोटींग झाडांच्या फळांचा आस्वाद घेतला. कुमयो, गेळ, सावर, पंगारा, खैर, पळस, खर्वत, बिबा भिलमाड, दाभण, कुडा, अर्जून, सातीण, मोय, जांभूळ, बकुळी, आवाळी, उसकी, या औषधी झाडांवर दावा, घोडशेरा अमृतवाल, गोडवाल,चानीवाल, गुंजीवाल, खोवलेवाल, पालकाणे, काळीवाल, कांगल, रान आंबाडा, रान हळद, लुत सुरण, हरकुली वनस्पतींनी त्या तलावाच्या परिसराला सजवले आहे.
चानाडा, रंजीण, शिरस, कारा अशा झाडांचे औषधी गुण त्या तळ्याच्या पाण्यात मिसळतात. तलावाच्या सभोवरील परिसराला काराचीमाण इलबिनीच्यान, बोणबायगीणी, सौंदेकर, गालाचावाडा अशा नावांनी ओळखतात. हा सारा निसर्गवंतांचा नजारा पाहताना कधी दुपारचे दोन वाजले समजलेच नाही.
आता आम्ही तोयार तलावाचा खाली पश्चिम बाजूने आलो. पूर्वजांनी तळ्याच्या खालच्या भागातून वाहणाऱ्या ओहोळातील पाण्यावर शेतातील बांधाच्या शेवटावर धाकटे तळे आणि व्हडले तळे यात पाणी साठवण्यासाठी बंधारे उभारून शेतीला पाणी पुरवण्याची व्यवस्था केलेली पाहावयास मिळते. त्या पाण्यावर सरदवांयगण आणि खाजनशेतात गोमंतकीय भात बियाणी लागवडीने चिंबल गावाला ‘सुजलाम् सुफलाम्’ बनवले होते.
हिवाळ्यात शेतात मिरची, कांदा, वांगी, वाल, रताळ, भेंडी, मळ्यांची लागवड करून त्या तळ्याचे येणारे थंड पाणी वापरून सर्वात प्रथम फुललेली भाजी पणजी, कालापूर, रायबंदर बाजारात विकून कष्टकरी आपले संसार चालवीत होते. तळ्याच्या ओहोळास इंदिरानगर घळीतून वाहणारा दुसरा ओहळ वाहत येत, शेतातील कुणगान तळ्यात पाणी साठवून ते पाणी सभोवताली शेती परिसराला पुरवून नंतर खळीतून धाकट्या तळ्यात येते.
तिथून ते खळीतून वाहत पुढे व्हडल्या तळ्यात जाऊन परिसरातील विशाल सरदवांयगण शेतीला गोडेपाणी पुरवून चिंबलच्या खार पाण्याच्या खाडीत जाते. तिथे मत्स्यधनाची पैदास करीत, खालच्या मोवाकान, घोलान पोयकडून रायबंदर भागातून पुढे जात पणजी, रायबंदर पाटो महामार्ग ओलांडून साकवाखालच्या भल्या मोठ्या मानशीतून मांडवी नदीस मिळते.
चिंबलच्या खाडीत शेवटा, काळुंदर, खरचाण, पालू, तामसा, चोणकुल, वागीं, झिंगे, खेकडे, लेप या जातीची रुचकर मासळी मिळत होती. चिंबल ओहोळाचा उगम तोयार तळ्याच्या भुयारी मुखाकडे होतो. तिथून चालत ओहोळाच्या काठाने अंदाजे दोन किमी बांधाच्या शेवटापर्यंत प्रवास केला. त्या भागात शेतकरी बांधव भाजीपाला लागवड करून त्या ओहोळाचे पाणी वापरत होते.
ओहोळाच्या काठाने खाली येताना अंदाजे एक किमी वर पोहोचल्यावर ओहोळाच्या पाण्यात सांडपाणी आणि प्लास्टिक साठलेले आहे. मुख्य रस्त्याकडून इंदिरानगरातून वाहणाऱ्या ओहोळातून जे सांडपाणी आणि प्लास्टिक वाहते, त्या कचऱ्याने ओहळ पुरून गेलेला आहे. त्यामुळे कसले रोग फैलावतील हे सांगणे फारच कठीण.
तिथून बांधावरील वाटेने लांबवर दोन तळ्याकडे जाताना खिशातील रुमाल नाकातोंडावर धरला तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, इतकी बिकट स्थिती शेतात झाली आहे.
तोयार तलावाचे पाणी पणजी, मेरशी, कालापूर आणि रायबंदरला पुरवण्यासाठी पोर्तुगीज सरकारने तळ्याच्या बांधाला सिमेंट कॉंक्रीट बांधकामाने बोगदा तयार करून तळ्याचे पाणी हौदात घेऊन ते पाणी पंपाद्वारे चार मोठ्या टाकीत भरून पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पाईपद्वारे चिंबल, मेरशी, कालापूर आणि पणजी शहरास पुरवत होते. हा प्रकल्प १९०८साली बांधला होता. असे त्यांनी सांगितले. त्या प्रकल्पाचा बोगदा, हौद, टाक्या, पंप घर आज त्या ठिकाणी पाहावयास मिळते. ‘अशा या निसर्गसंपन्न चिंबल गावावर ‘युनिटी मॉल’ नावाचे संकट आले आहे’, असे बोलत गावचे लोक त्याला विरोध करीत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.