Puran Sheti Goa: भीमगडच्या उंच डोंगरातून उगम पावणारी 'म्हादई', सुपीक गाळाच्या मुलायम वाफ्यात होणारी पारंपरिक 'पुरणशेती'

Puran Sheti: म्हादईच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू, दगड, गोटे यांचा उपसा होत असल्याने, म्हादईचे पात्र खोल होऊन तिचे तट कोसळून ती रुंदावत आहे. त्यामुळे, पुरणशेतीच्या जागा नष्ट झाल्या.
Puran Sheti Goa
Traditional Farming Practise GoaDainik Gomantak
Published on
Updated on

खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात देगाव या गावात उंच डोंगरात गोव्याची जीवनदायिनी म्हादईचा उगम होतो. तिच्या परिघातील डोंगरावरून वाहणाऱ्या ओहळ आणि उपनद्यांचे पाणी आपल्या प्रवाहात घेत ती तिच्या काठावरील भीमगड अरण्यातील इतर गावांना पाणी देते.

डोंगरघळी ओलांडून गोव्याच्या सीमेवरील अजब सौंदर्याने नटलेल्या कृष्णपूर गावातील पिस्त्याच्या कोणीकडून पानशीरा ओहोळाचे पाणी घेऊन ती अभयारण्यात प्रवेशते. तिच्याच नावे ख्यात असलेल्या हिरव्यागार अभयारण्यातून प्रवास करताना दऱ्या डोंगरातून वाहणारे ओहळ आणि उपनद्यांचे पाणी आपल्यात सामावून घेते.

पुढे उस्ते गावात कळसा नदीचे पाणी घेऊन संगम साधते. मसोर्डे भागात कोत्राच्या उपनदीचे पाणी घेऊन पुढे जाता जाता कुडचे, सोनाळ, सावर्डे, वेळगे, बाराजण, खोतोडे, धामसे आणि भिरोंडे या तिच्या काठावरील गावांतील कुळागर, बागायती, मरड शेती आणि अजब पुरणशेतीला पाणी पुरवते.

गुळेलीच्या रगाडा नदीचे पाणी घेऊन पुढे खांडेपार नदीचे पाणी सोनारबाग ठिकाणी आपल्या प्रवाहात घेऊन संगमाने मांडवी होते. त्यापुढील लांबचा पल्ला गाठत मिरामार येथे अरबी समुद्रास मिळते. तीच मांडवी समुद्राचे खारे पाणी गांजे गावापर्यंत वर नेते. त्यामुळे डिचोली, फोंडा, तिसवाडी आणि बार्देश या तालुक्यांना खाऱ्या आणि गोड्या पाण्याचा लाभ होतो.

सत्तरी आणि धारबांदोडा दोन तालुके म्हादईच्या गोड पाण्यावर अवलंबून आहेत. सत्तरी तालुक्यात म्हादई तीन ऋतूंच्या तीन रूपांत पाहावयास मिळते. पावसाळ्यात ती रौद्र अवतारात पाहावयास मिळते. त्यावेळी विद्वान म्हणणाऱ्या माणसाचा भित्रेपणा कळतो.

उन्हाळ्यात तिचे पात्र कोरडे होते, त्यावेळी माणूस तिच्या पात्रात थंडाव्यासाठी पाण्याचा शोध घेतो. हिवाळ्यात तिचे पात्र संथ व शांत होते. रुपेरी पाण्याच्या खुळखुळ आवाजात हसत नाचत वाहते तेव्हा ती आपल्या अंगावर पुरणशेतीची हिरवी झालर चढविण्यास सत्तरीच्या भूमिपुत्राला आपल्या पात्रात पुरणशेती करण्यास बोलावते.

तिची साद ऐकून तिथला भूमिपुत्र घराकडील कुदळ, खोरे, टोपली, कोयता घेऊन हिवाळ्यातील थंडीत आपल्या मुलाबाळांना घेऊन पुरण शेतीच्या तयारीस लागतो. तिच्या रुंद पात्रातील गुळगुळीत, काळे, सफेद, लाल, दगडधोंडे, गोटे एकत्र करून त्यांचे चौकोनी वाफे बनवले जातात.

वाफे बनवल्याने त्यात पाणी भरून राहते. नंतर पुरण शेतीच्या सभोवार लांब-ओंडके जमिनीत पुरून त्यात झुडपांच्या फांद्या भरून गच्च आणि उंच कुंपण उभारले जाते. चौकोनी वाफ्यात पाला-पाचोळा घालून त्यावर पावसाळ्यात प्रवाहाबरोबर वाहत आलेला सुपीक गाळ घालून मुलायम वाफा तयार केला जातो.

साधारण पंधरा दिवसानंतर त्या वाफ्यात दामगो, बेळो, शिट्टो, खोचरी ही गोमंतकीय बियाण्यांची पेरणी केली जाते. त्या भात बियाण्याचे रोप वीस, पंचवीस दिवसांनी उपटून तयार केलेल्या पुरणशेतीत त्याची लागवड करायची असते.

ही सुरुवात जानेवारी फेब्रुवारीत होते. या शेतीला खताची गरज लागत नाही. तिच्या पात्रातील नैसर्गिक पाण्याच्या ओलाव्याने ती वाढते. लागवड केलेल्या हिरव्या भाताच्या रोपणीतील खुरपण एक महिना गेल्यावर काढतात. पुढील एप्रिल महिन्यात पौर्णिमेला भाताच्या रोपातून कणस बाहेर पडते. कणस आल्यावर भूमिपुत्र लगबगीने पुरणशेतीत उंच लाकडी माळा उभारतो.

माळ्याला गवत, झाडांच्या फांद्या, सुपारीची झावळे, वापरून शाकारणी केली जाते. पुरणशेतीतील माळा फारच सुंदर दिसतो. त्या उभारलेल्या माळ्यावरून डुक्कर, मुंगूस, पाळीव जनावरे यांना रात्रीचे हाकलून लावत रक्षण करतो. अन्यथा शेती नष्ट होण्याची भीती असते.

डुक्कर कणसे खातात, मुंगूस उंदरांना पकडण्यास टपलेले असते, ते इकडे तिकडे पळून पीक जमीनदोस्त करते, त्याचप्रकारे शेकरूंचा भाताला धोका असतो. माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांनाही ऋतूचक्राची यथार्थ माहिती असते. पक्ष्यांना कोणत्या ऋतूत, कोणत्या महिन्यात, कुठल्या जागी आपल्यास अन्न मिळेल, हे ज्ञान निसर्गानेच दिले आहे.

दक्षिणायन सुरू झाले म्हणजे परदेशातून हजारो मैल पार करून पक्षी अन्नासाठी भारतात वेगवेगळ्या ठिकाणची भातशेती, तलाव, सरोवरे, पाणवठा अशा जागी घरटी बांधून राहतात, शेकरू पक्षी मोठ्या जमावाने पुरणशेतीच्या आसपास असणाऱ्या झाडांवर घरटी बांधून राहतात.

सकाळ, संध्याकाळ नित्यक्रमाने कणसावर बसून भाताचे दाणे खातात. शिवाय आपल्या पिलांना दाणे भरविण्यास कणसे कापून नेतात. ते स्वातंत्र्य त्या मुक्यांना ईश्वराने दिले आहे, हे खरे; पण त्यांना हाकलले नाही तर भूमिपुत्राला कणसे नसलेले रोपाचे सुके गवत डोक्यावर घेऊन घरी जावे लागेल. म्हणून त्याला महिना दीड महिना रात्रंदिवस पिकाची राखण करावी लागते.

मे महिन्यात पुरणशेती हिरवळ सोडून पिवळसर होते, तेव्हा म्हादईचे पात्र कोरडे होण्यास सुरुवात होते. तिच्या पात्रात टप्प्याटप्यांवर खोलगट जागी नैसर्गिक तलाव तयार होतात. त्या तलावांनी मत्स्यधन आश्रय घेते.

पिवळ्या शेतीचे पीक कापून भूमिपुत्र ते रोप वर्तुळाकार आकाराने मांडून ठेवतात. त्याच परिसरात जमिनीवर अंगण बनवून चार पाच बैलांच्या साहाय्याने मळणी करून धान्य बनवतो आणि कष्टाचे चीज झाले या आनंदात डोक्यावर भाताचे ओझे घेऊन हसत घरी येतो.

एखाद्या वेळी मे महिन्यात वळवाच्या पावसाने हजेरी लावल्यास, गवतासकट धान्यपीक घरी आणून माणसांद्वारे पायांनी मळणी करून धान्य घेतले जाते. नंतर भाताचे दाणे मोठ्या भांड्यात चुलीवर उकळून ते अंगणात उन्हात वाळवून कांडून सोलतात, नंतर सुपात भरून कोंडा बाहेर फेकून तांदूळ बनवतात.

Puran Sheti Goa
Puran Farming: ..पुन्हा श्रीगणेशा! म्हादईच्या पात्रातील जुनी परंपरा; 20 वर्षांनी सत्तरीत झाली पुरणशेती

म्हादईचे पाणी, आपले कष्ट आणि त्यावर पिकवलेले धान्य शिजवून व सोबत निसर्गाच्या कृपेने मिळालेल्या मासळीचे कालवण घेऊन येथील शेतकऱ्यांच्या पूर्वजांनी आनंदाने दिवस घालवले. त्यांच्याच वंशजांना आज पुरणशेती नकोशी झाली आहे.

त्यांची कुटुंबे त्या म्हादईच्या तटावरील कुडचे, सोनाळ, वेळगे, सावर्डे, बाराजण, खोतोडे, धामशे, भिरोंडे गावात आहेत. त्यांना पुरणशेतीस मुकावे लागले, याचे कारण नदीचा प्रवाह अडवण्याच्या नावाखाली म्हादई आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रात कैक ठिकाणी बंधारे उभारून कुळागर, बागायतीस पाणीपुरवठा केला जातो.

Puran Sheti Goa
Mhadei River: 'म्हादई'चा प्रवाह वळवल्यास गोव्याचे पाणी, मासेमारी संकटात! कर्नाटक, महाराष्ट्रालाही फटका; कॅप्टन धोंड यांचा इशारा

हल्लीच्या काळात म्हादईच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू, दगड, गोटे यांचा उपसा होत असल्याने, म्हादईचे पात्र खोल होऊन तिचे तट कोसळून ती रुंदावत आहे. त्यामुळे, पुरणशेतीच्या जागा नष्ट झाल्या आणि आज भूमिपुत्रांना पुरणशेतीला मुकावे लागले.

असे असले तरी या वर्षी तिच्या तटावर शिरसावर्डेत आशेचा कोंब उगवलेला पाहावयास मिळाला. भूमिपुत्राच्या भविष्याला जाग आल्याने समाधान वाटले. परत सत्तरीच्या पुरणशेतीस म्हादईच्या पात्रात संजीवनी मिळाली. उगवणाऱ्या सूर्याच्या किरणावर पसरलेले काळे ढग हळूहळू दूर होऊन ती किरणे प्रकाश देतात त्याचप्रकारे म्हादईच्या पात्रात पुरणशेती पुन्हा नव्याने सुरू झाली आहे. पुरणशेतीला जिवंत ठेवण्याचे काम कृष्णा सावंत या भूमिपुत्राने केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com