
अॅड. सूरज मळीक
म्हादई नदी ही गोव्यातील जैवविविधता आणि समाज जीवनाची जीवनरेषा आहे. इथल्या असंख्य गावातील वायंगण शेती, भाजीचे मळे, कुळागरे व भाटांचे पालनपोषण ही नदी करत आलेली आहे. नदीतील गोड्या पाण्याबरोबर मान्सूनच्या मुसळधार पावसाळ्यात वाहून आलेल्या सुपीक गाळाने येथील कृषी संपदेला समृद्ध केले.
हिवाळ्याच्या दिवसांत नदीच्या पाण्याचा प्रवाह क्षीण होऊ लागला की उस्त्यापासून गांज्यापर्यंत म्हादई नदीच्या काठावर वसलेल्या असंख्य गावांमध्ये नदीच्या पात्रातील गाळ एकत्र करून पारंपरिक पुरण शेती केली जायची. डिसेंबर महिन्याच्या सुमारास लागवडीला प्रारंभ व्हायचा आणि उन्हाळ्यातील मे महिन्यापर्यंत अंदाजे सहा महिन्यांचा त्याचा काळ असायचा.
सह्याद्रीच्या खोऱ्यात जेव्हा जमीन नांगरून भात लागवड करण्याचे ज्ञान रुजू झाले नव्हते तेव्हा येथील लोकमानसाने नदीच्या पात्रातील गाळ आणि पाल्यापाचोळ्यांचे थरावर थर रचून नदीच्या पात्रातच पुरण शेती विकसीत केली. पुरण म्हणजे पारंपरिक पद्धतीने नदीपात्रात भर टाकून केली जाणारी शेती.
नदीच्या पाण्याचा प्रवाह संथ झाल्याचे पाहून नदीतील पाणी आटून मोकळ्या झालेल्या जमिनीला पाण्याच्या दिशेने धड बांधली जायची. येथील मोठमोठे दगड बाजूला करून चढउतार असलेल्या जमिनीला सपाट केले जायचे. काही लोक एकत्र जमून नदीच्या उताराच्या भागाला दगडी बांध घालायचे. त्यामुळे वाहत्या पाण्याचा प्रवाह आपोआप नियंत्रणात यायचा.
व्यवस्थित नीट केलेल्या जमिनीवर विविध झाडाझुडपांच्या पानांचा थर रचून त्यावर सुपीक गाळ टाकला जायचा. या गाळाला ‘पुशारे’ असे म्हणतात. यामध्ये पाने, माती, रेती व लहान दगडांचे मिश्रण असते. या सुपीक गाळात शेतासाठी उपयुक्त असलेले खत नैसर्गिकरीत्या उपलब्ध असते त्यामुळे कुठलेही वेगळे खत न वापरता गाईगुरांचे शेण घातल्याने ही भात शेती पौष्टिक घटकांनी समृद्ध असायची.
येथे जमीन नांगरावी लागत नाही तर भर घालून सरळ जमीन उपलब्ध करावी लागते. त्यामुळे हे काम भरपूर कष्टाचे असते. आपल्या परिवारातील लोकांसोबत शेजाऱ्यांची मदत लाभल्याशिवाय हे काम करणे कठीणच. घरातील महिला व पुरुष बांबूपासून बनवलेल्या टोपल्या माथ्यावर घेऊन ‘पुशारे’ भरून आणायचे.
शेताला चहूबाजूने कुंपण बांधण्याची ही पद्धत तर अतिशय वेगळी आणि कल्पकतेचे दर्शन घडवणारी आहे. शेताच्या बाजूने वाकवून त्याला आतून खांब लावून आधार दिला जायचा. पूर्वी दोन दोन खांब त्रिकोणी उभे करून त्यावरून एक सरळ खांब घातला जायचा.
संपूर्ण कुंपण बांधण्यासाठी वापरला जाणारा दोरसुद्धा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने बनवला जायचा. फळसी नावाची वेल आपल्या आजूबाजूला खूप प्रमाणात आढळते. वेलीचे लहान दोर काढून काही दिवस त्यांना पाण्यात ठेवले जाते.
असे केल्याने दोर अजून घट्ट बनतात आणि ते तुटणार नाहीत याची खात्री पटते. या लाकडाच्या रचनेत नदिपात्रातील शेरणीबरोबर इतर झुडपांच्या फांद्यांचा उपयोग केला जायचा. बाहेरून कुठल्याही जनावरांना त्याची चाहूल लागू नये इतके दाट कुंपण बनवले जायचे.
बियांची पेरणी करून दोन महिन्याभरात जेव्हा शेत हिरवेगार दिसू लावायचे तेव्हा ते दृश्य अतिशय आकर्षक दिसायचे. कारण शेत उमलून येण्यापर्यंत त्याचे कुंपण सुकून काळपट रंग धारण करायचे. त्यामुळे हिरव्या शेताला काळ्या कुंपणाने वेढलेले हे दृश्य जेव्हा एका बाजूला असलेल्या पाण्यात प्रतिबिंबित होते तेव्हा ते मनाला लुभावणारे असते. आपल्याकडे शेती करण्यासाठी जमीन नाही म्हणून पाणी आटल्याची संधी साधून केलेली त्या जमिनीचा हेतुपुरस्सर उपयोग करून पारंपरिक नैसर्गिक शेती त्यांनी केली.
हे शेत चौकोनी आयताकार असते. त्यातील पाणी सर्वत्र सामान प्रमाणात पुरवण्यासाठी शेताचे चौकोनी भाग केले जायचे. त्याला कुणगे म्हणतात.
यासाठीसुद्धा मातीचा वापर न करता कुळागरातील केळीच्या गब्यांचा उपयोग केला जायचा. केळीच्या नळीसारख्या या गब्यांमध्ये ठेवल्याने दोन भागातील पाणी एकमेकांत मिसळत नव्हते त्यामुळे सर्वत्र शेतात एकसारखेच पाणी असायचे. कुजल्यावर हे गबे मातीत घट्ट बसतात.
उन्हाळ्यात भाताला कणसे येतात तेव्हा त्याला अतिशय अल्प पाण्याची गरज असते. त्यावेळी जर पाण्याची पातळी वाढली तर शेतात साचलेल्या पाण्यात ते कुजून जातात. त्यामुळे हवामान व इतर नैसर्गिक घटनांचा अंदाज घेऊन मान्सूनपूर्व पाऊस येण्यापूर्वीच कापणी करावी लागते. उन्हाळ्यात आपोआप हे पाणी सुकते आणि भाताची भरपूर पैदास होते. पूर्णपणे पिकलेल्या शेताचा रंग पोपटी पिवळा होतो.
‘भाताच्या आशाचे आणि न्हयतल्या माशाचे नाव घेवन पावत नजो’ शेती करत असताना अशी एक म्हण प्रचलित होती. पुरण शेतीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बियांची लागवड केली जायची याची नोद कोणी करूच शकत नाही.
त्याचबरोबर पुरण शेती नदीच्या पात्रात केली जात असल्याने या म्हणीमध्ये शेतीसोबत नदीतील माशांचाही तुलनात्मक उल्लेख केलेला आढळतो. भाताच्या प्रजातीप्रमाणे या गोड्या पाण्यातील माशांची सगळी नावेही कुणी घेऊ शकत नाही असा या म्हणीचा अर्थ आहे.
यावरून आपल्याला येथील लोकजीवनाचा कृषी संस्कृतीशी निगडित असलेल्या नात्यासोबत येथील म्हादई नदीतील पाण्यात नानाविध प्रजातींच्या माशांची पैदास होते याची प्रचिती येते. नीमगो, पाटणी, दोंगरे, नवान्न, सुट्टी, दामगो, बेळो, चुडय, कोरगुट आदी भातांचे विविध प्रकारांची लागवड केली जायची. तर वाळय, मोळये, पिट्टोळ, शिगुर, मरल, दाणय, शेंगाळी, काडय यांसारख्या चविष्ट माशांचा आपल्या जेवणात समावेश करून ते तृप्त व्हायचे.
एकेकाळी सत्तरीतील, उस्ते, सोनाळ, सावर्डे, वांते, गांजे या सारख्या २५हून अधिक गावांमध्ये केली जाणारी पुरण शेती आज इतिहासजमा झालेली आहे. नदी पात्रात ठिकठिकाणी वसंत बंधारे उभारल्याने नदीतील पाण्याची पातळी वाढली. पुरण शेतीद्वारे आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसाठी मोठी समस्या निर्माण झाली.
या वर्षी सत्तरीतील शिर सावर्डे या गावामध्ये जवळपास वीस वर्षांच्या काळानंतर पुन्हा एकदा पुरण शेती ग्रामस्थांनी केली. गावातील कृष्णा सावंत यांनी त्यांच्या कुटुंबाच्या आणि शेजाऱ्यांच्या मदतीने हा प्रयोग यशस्वी केला. पावसापूर्वी या भाताची कापणी केली. नाहीतर अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले असते. शेती केलेल्या या भागाला ‘लोढीत’ असे नाव आहे.
लोढ म्हणजे काय? तर नदी जेव्हा वळसा घेऊन पुढे येथे तेव्हा काही वेळा तिचा प्रवाह गतिमान होतो. एकेकाळी तर पाण्याचा लोढ आला आणि भरपूर ग्रामस्थांची पुरण शेती वाहून गेली अशी घटनाही ऐकायला मिळते.
हा भाग गावातील बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असल्याने इथे हा पुराण शेती करून गावकऱ्यांना त्या पौष्टिक अन्नाचा लाभ घेता आला. नदीच्या कुशीत वास्तव्य करत असल्याने येथील लोकमानसाला विविध पक्ष्यांची ओळख झाली. कुवाके त्याच्या कुवाक कुवाक करणाऱ्या आवाजामुळे नावारूपास आले तर शेरका त्यांच्या भरपूर प्रमाणात एकत्र येण्याच्या स्वभावामुळे ओळखली जातात.
आशा गोष्टी शेतात काम करताना आजही ऐकायला मिळतात. दुऱ्याची कोंड, येरणाची कोंड या सावर्डे गावातील डोहांची नावे आहेत. मुत्रो गुणो, गोठण, लोढीत यांसारखी नावे आज पुरण शेती बरोबर विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत.
सरकारी दफ्तरात पुरण शेतीची अधिकृत नोंदणी झाली नसल्याने वसंत बंधारे बांधताना दिली गेलेली आश्वासने पोकळ ठरली. तत्कालीन जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्याला पुरणशेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे योग्य रीतीने पुनर्वसन करावे म्हणून निवेदने दिली होती. परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही केली गेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.