

वाघाचे दर्शन, हा एक दुर्लभ योग मानला जातो. काही वर्षांपूर्वी देशातील पर्यावरण पत्रकारांचा चमू उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात गेला होता. १९७३मध्ये देशात सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्प राबविण्यात आला ते अभयारण्य. आम्ही या प्रकल्पाच्या एक सदस्य सुनीता नारायण यांच्याबरोबर त्या उद्यानाच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी मुक्काम केला. त्यावेळी उद्यानाच्या मध्यवर्ती भागात मुक्काम करण्यास मान्यता असे.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. पर्यटनाच्या नावाखाली तेथे मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू झाली. बेकायदेशीर बांधकामे करण्यात येऊ लागली. त्या निर्णयानंतर भ्रष्ट राजकारणी व नोकरशहा यांच्यातील अशिष्ट संगनमत संवेदनशील भागातील वन्यपशूंना धोका निर्माण करीत असल्याचे उघडकीस आले. हे भूभाग वन्यपशूंना अनिर्बंध फिरण्यासाठी असल्याने मानवी हस्तक्षेप रोखणे महत्त्वाचे असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.
परंतु या निर्णयापूर्वी आम्ही जीम कॉर्बेटला भेट दिली होती आणि या अंतर्गत भागात फिरूनही आम्हांला वाघ दिसला नव्हता. मात्र, महाराष्ट्राच्या चंद्रपूर भागात असलेल्या ताडोबा राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीत व्याघ्रदर्शन हमखास होते, याची माहिती उपलब्ध झाली.
त्यामुळे गेली काही वर्षे तेथे जाण्याची हुरहुर लागली होती. तेथे पूर्ण वाढलेल्या वाघांची संख्या अंदाजे १०० आहे. १९५५मध्ये स्थापन केलेल्या या व्याघ्र राखीव उद्यानात त्यांच्या बछड्यांची संख्याही लक्षणीय आहे; परंतु व्याघ्र गणतीत केवळ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची संख्या मोजतात.
१२०० चौ.मी. क्षेत्रात वसलेल्या या उद्यानात कोरडी पानझडी वने, बांबूची दाट झाडी आहे. विशेषतः उन्हाळ्यात तेथे मोठ्या प्रमाणात पानगळ होते. यंदा तर बांबूची वने अत्यंत कोरडी बनून तुटून पडली होती. दर ४० वर्षांनंतर या बांबूंचे अस्तित्व संपुष्टात येते व त्यानंतर पावसात नवी वने तयार होणार आहेत.
या दाट बांबू वनामुळे रानामध्ये गारवा निर्माण होतो व वाघांना ते फायदेशीर ठरते. या वनात साग, साल, तेंदू व पळस यांसारखी महत्त्वाची झाडे प्रामुख्याने आहेत, जी इतर जनावरांसाठी, विशेषतः हरणे, सांबर व बिबट्यांच्या अस्तित्वासाठीही महत्त्वाची आहेत.
त्यामुळे त्यांचे जीवन बहरून गेल्याचे दृश्य दिसते. हरणे व सांबर यांचे तांडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसतात, की वाघांनी आपले आवडीचे क्षेत्र म्हणून ताडोबा का निवडले, याचा प्रत्यय आला. आतमध्ये असलेला भला मोठा तलाव, अनेक पाणवठे व धरणाच्या पाण्यातून निर्माण झालेली खाडी यांच्यावरही ही वन्यसृष्टी तगली आहे.
विशेषतः धरणाचे ‘बॅकवॉटर’ हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहेच, शिवाय मगरींचे अस्तित्व त्यांनी जोपासले व वाघांनीही या तलावाला पसंती दिली आहे. उन्हाळ्यात वाघ आपल्या बछड्यांसह या पाण्यात खेळत असलेले दृश्य पर्यटकांनी अनेकदा टिपले आहे. वाघ पाहणे म्हणजे केवळ वाघाचे दर्शन घेणे नसते, तर जंगल पाहणे; त्यातील इतर श्वापदे निरखणे; झाडे, निसर्ग, पक्षी, त्यांचे सहचर, तेथील वातावरण व पर्यावरण यांचा एकत्रित आनंद घेणे असते.
१० वर्षांपूर्वी मी जेव्हा कॉर्बेटमध्ये गेलो, तेव्हा तेथे बहरलेली सृष्टी आम्हांला वेगळीच अनुभूती देऊन गेली. तेथे हत्तींचे कळप आम्ही पाहिले व त्याबरोबरच हरणांचे आणि इतर प्राण्यांचे अस्तित्व डोळ्यांना सुखावणारे होते.
हे रानही उष्णकटिबंधातील पानगळीचे आहे. असे मोठे उंच वृक्ष, सभोवताली त्यांची सतत गळणारी पाने, त्यांच्यामधून काढलेला मातीचा रस्ता, पाल्यापाचोळ्याचा आवाज व कान देऊन ऐकणारे आमच्यासारखे पर्यटक, मधूनच दर्शन देणारे बिबटे, पिल्ले पाठीवर घेतलेले एखादे अस्वल, धावत जाणारे, परंतु मधूनच थांबून आमच्याकडे चकित होऊन पाहणारे -अशा अनेक गमती-जमती आहेत.
कॉर्बेटमध्ये मला अजूनही जाणवते ते - एक भला मोठा हत्तींचा कळप व त्यांचे एक पिल्लू. हे पिल्लू कोणत्या तरी कारणाने मागे राहिले व जंगल सफरींच्या जीपमुळे त्याला वाट काढता येईना. तेव्हा त्यांच्यातील भला मोठा पालक - हत्ती मागे आला व त्याने आमच्याकडे एक असा कटाक्ष फेकला, की आम्ही थिजून राहिलो.
त्या पिल्लालाही स्फुरण आले व ते आपले शेपूट उंचावत दुडुदुडु धावत धावत कळपात मिसळले. लागलीच त्याला त्याच्या आईने आपल्या पायात घेऊन दटावले. त्यानंतर हा भला मोठा हत्ती शांतपणे माघारी वळून पुन्हा कळपासमोर धीरोदात्तपणे चालायला लागला. ते दृश्य मी अजून विसरलेलो नाही आणि हत्तींचा विषय येतो, तेव्हा माझ्या नजरेसमोर ते दृश्य पुन्हा पुन्हा येते.
जीम कॉर्बेट यांनीही आपल्या जीवनाचा बराचसा काळ उत्तराखंडमध्ये - ब्रिटिश भारतातील संयुक्त प्रांतात सारला. नैनितालमधील गुर्नेहाउसमध्ये उन्हाळ्यात त्यांचा मुक्काम असे व हिवाळ्यात ‘कालाघुंशी’ बंगल्यात ते वास्तव्य करीत. तेथेही आम्ही दोनवेळा जाऊन आलो. कुमाऊ प्रदेशात त्यांनी शिकारी, निसर्गप्रेमी व नंतर पर्यावरणप्रेमी म्हणून जीवन व्यतीत केले.
कुमाऊ जमातीशी त्यांचे घनिष्ठ संबंध इतके, की ते वाघांपासून त्यांना संरक्षण देत असल्याने त्यांनी त्यांचा जिव्हाळा - प्रेम प्राप्त केले. १८८५मधील जन्मापासून जीम कॉर्बेट ७० वर्षे या भागात राहिले व नंतर त्यांनी केनियात स्थायिक होणे पसंत केले.
या अरण्याला त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. जीम कॉर्बेट यांनी मूलतः वन्य प्राण्यांवर सहा पुस्तके लिहिली, त्यात भारतातील जंगलांचा सखोल अभ्यास तर आहेच, शिवाय वाघांचे अस्तित्व व त्यांचे बारकावे अत्यंत सूक्ष्मपणे टिपले आहेत. जीम कॉर्बेट आपल्या हयातीत ताडोबा येथे आले होते का, याचा तपशील उपलब्ध नाही; परंतु त्यांनी उत्तराखंडमध्ये बरेच काम केले.
त्यांच्या काळात म्हणजे २०व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात हजारोंच्या संख्येने वाघ असावेत, असा कयास आहे; परंतु त्यानंतर शिकार व वनांची पडझड यांमुळे वाघांची संख्या कमालीची घटली असून २०२२च्या सर्वेक्षणानुसार भारतात सध्या ३,६८२ वाघ आहेत.
‘जीम कॉर्बेट’मध्ये त्यांची संख्या २५० ते ३१९ आहे. ‘ताडोबा’त त्यांची संख्या १०० ते ११५ आहे. परंतु १९००च्या सुरुवातीला एका अंदाजानुसार ४० हजार ते ५० हजार वाघ होते. भारतात सध्या जगातील ७५ टक्के वाघ वास्तव्य करतात. त्याचे श्रेय ‘व्याघ्र प्रकल्पाला’ जाते. त्यातून २००६मध्ये असलेली वाघांची संख्या १,४११ वरून आता चार हजारांच्या आसपास पोहोचली आहे.
व्याघ्र प्रकल्पांमुळे वाघांची संख्या दुप्पट झाली, यात तथ्य आहेच. आज भारतात ५८ व्याघ्र आरक्षित जंगले आहेत. वाघांची संख्या मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यांची विष्ठा, पायांचे ठसे व आता कॅमेरे लावून त्यांची सूक्ष्म गणती हाती घेतली जाते, ज्यात भारताच्या कामगिरीची जागतिक दखल घेतली गेली आहे.
त्यामुळे भारत सरकार व न्यायालयेही त्यांच्या अस्तित्वाबद्दल सजग बनली आहेत. राजे-महाराजांचा विकृत छंद, ब्रिटिश अधिकाऱ्यांना खूश ठेवण्याची पद्धत, तेथपासून इंदिरा गांधी यांच्या काळात सुरू झालेली पर्यावरण मोहीम, त्यांनी वन्य प्राण्यांपासून अंदमानमधील आदिवासींच्या पुरातन जीवन पद्धतीचे संरक्षण करण्यासाठी योजलेले कठोर उपाय व आताच्या सरकारनेही व्याघ्र प्रकल्पाला दिलेले महत्त्व यांनी व्याघ्र संवर्धन तसेच जंगलांचे अस्तित्व अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यातूनच १९७३मध्ये व्याघ्र प्रकल्पांतर्गत नऊ वने आरक्षित करण्यात आली व २०२५मध्ये त्यांची संख्या ५८ बनली. दुर्दैवाने, उपाय योजूनही वाघांची हत्या व जंगलांवरील अतिक्रमणे थांबलेली नाहीत.
२०२५मध्ये सर्वाधिक वाघ मारले गेले, त्यांची संख्या होती १६६. २०२४मध्ये ही संख्या होती १२६. मध्य प्रदेशापाठोपाठ (५५) महाराष्ट्रात (३८) सर्वाधिक व्याघ्र हत्या नोंदविण्यात आल्या आहेत. त्यात वाघांची शिकार, हे एक महत्त्वाचे कारण आहेच; परंतु वाघांच्या आपल्या प्रदेशासाठीच्या लढाया, वनांचा नाश ही काही कारणे आहेत. आम्ही ताडोबातील मार्गदर्शकांना त्याबद्दलच विचारत होतो, तेव्हा स्वाभाविकच त्यांनी वाघांच्या आपापसांत होणाऱ्या लढाया हे एक नैसर्गिक कारण दिले.
त्याचा प्रत्यय याच जंगल सफारीत आम्हांला आला. ‘कॉलरवाली’ नावाची वाघीण आपल्या तीन किंचित वाढलेल्या बछड्यांना घेऊन अचानक सुरक्षित स्थानी निघून गेली. त्याचे एक कारण म्हणजे, या वाघिणीला एका नवीन वाघाचे अस्तित्व जंगलात जाणवले. दुसऱ्याच्या इलाक्यात घुसणारे वाघ सर्वप्रथम बछड्यांना मारून टाकतात.
बछडे जवळ असेपर्यंत माद्या वाघांना आपल्याजवळ येऊ देत नाहीत. त्यामुळे त्यांचे बछडे मारून टाकणे, हा एक महत्त्वाचा उद्योग संभोगोत्सुक वाघांना असतो. बछडे हिरावले जातात. माद्या पुन्हा वाफेवर येतात. हीच गोष्ट हरणांच्या बाबतीत होते. अनेकवेळा ‘डिस्कव्हरी’सारख्या वाहिनीवर आपण वाघ किंवा इतर वन्यप्राणी हरिणीच्या छोट्या पिल्लांची हत्या करतानाचे दृश्य पाहतो.
हरिणी त्या प्रकाराचा शोक करतात, त्यांच्या डोळ्यांमधील आसवे व उसासे कॅमेरा नेमकेपणाने टिपत असतात; परंतु निसर्गाचा नियमच असा, की त्या लागलीच वाफेवर येतात. नवीन जीवन तयार करण्याची नैसर्गिक ओढ त्यातूनच उत्पन्न होते व या हरिणी लागलीच वाफेवर येतात.
शिकारी होत असतातच; परंतु प्रामुख्याने वाघ आपल्या इलाक्याबाहेर पडतात, तेव्हा त्यांचे अस्तित्व धोक्यात सापडते. शेतकरी त्यांची हत्या करतात. त्यांची गुरे मारून टाकण्याचे प्रकार घडतात, तेव्हा तर शेतकऱ्यांनी ठरवून वाघांच्या हत्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विजेचा धक्का लागून, विषबाधा होऊन वाघ मरण पावण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे.
वाघ माणसांवर हल्ला करतात, तेव्हा तर स्थानिकांमध्ये राग उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. भारतात तर ती चिंतेचीच बाब बनली आहे; कारण एका बाजूला लोकसंख्या वाढीमुळे जंगलांवर होणारी मानवी आक्रमणे वाढली व दुसऱ्या बाजूला वाघांची संख्या वाढतेय, शिवाय सहज भक्ष्य सापडत असल्यामुळे गेल्या १०-१५ वर्षांत मध्यवर्ती - कोअर भागापेक्षा सभोवतालच्या प्रदेशात - म्हणजेच बफर भागात वाघांचा संचार वाढला.
परिणामी महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात जेथे ‘ताडोबा’चे अस्तित्व आहे, तेथे जरूर काही चिंताजनक घटना नोंदविलेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये २०२२-२३मध्ये १११ जण वाघांच्या हल्ल्यात मरण पावले. त्याचाच एक भाग म्हणून वाढलेल्या वाघांचे अन्य भागांत स्थलांतर करण्याचे प्रकार सुरू झाले व गेल्याच वर्षी ताडोबातून दोन वाघांना सह्याद्रीत आणून सोडण्यात आले.
सुंदरवन येथील वाघांचे हल्ले तर कुप्रसिद्ध आहेत. वाघ नदीतून पोहत येऊन मच्छीमारांवर हल्ले करू शकतात, हे तेथे पहिल्यांदा शाबीत झाले. त्यामुळे मच्छीमारांनी आपल्या डोक्याच्या मागेही मानवी मुखवटा धारण करावा, असे प्रकार सुरू झाले; परंतु वाघांच्या अस्तित्वाची चिंता वाहताना मानवी हानीबद्दल फारशी फिकीर करायची नाही, असा वनखात्याचा दृष्टिकोन असतो अशी जी टीका केली जाते, त्यात तथ्य नसते.
राज्य सरकार अशा कुटुंबीयांना भरघोस नुकसानभरपाई देत असतेच, परंतु अशा रक्तपिपासू वाघांना पकडून त्यांना अन्य ठिकाणी सोडणे वगैरे उपाय योजले जातात. तसे उपाय कठीण असले तरी मध्यवर्ती व्याघ्र प्रकल्पातून लोकांचे अस्तित्व नगण्य राखण्यात आता सरकारला यश लाभले आहे.
ताडोबा वनक्षेत्राच्या मध्यवर्ती भागातून आता संपूर्णतः लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. प्रत्येक कुटुंबातील प्रमुखाला १५ लाख रुपये, शिवाय पाच एकर जमीन व इतर मदत देण्यात येते. त्यात कुटुंबाच्या हिताचा प्राधान्यक्रमाने विचार केला जातो. ताडोबा हे घनदाट अरण्य आहे व तेथे पर्यटन वगळता इतर उद्योगही नाहीत.
नागपूरहून १०० कि.मी. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांनाही कोअर भागातून सवलतींचा लाभ घेऊन स्थलांतर करण्यावाचून पर्याय नव्हता. त्यातील खुबी अशी, की तेथील बहुतांश लोक, महिलाही आता वाघ सफरीत गुंतल्या आहेत. अनेक तरुणी जंगल मार्गदर्शनाचे काम करतात. त्यातील अनेकांनी वनखात्याचे अभ्यासक्रमही पूर्ण केले आहेत.
त्या जीप चालविण्यापासून पर्यटन क्षेत्रात अनेक कल्पक कामेही करतात. त्यातील एक आहेत शहनाज बेग - ज्यांना महत्त्वपूर्ण पुरस्कारही प्राप्त झाला आहे. पश्चिम भारतातील सर्वोत्कृष्ट वन मार्गदर्शक म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या हरहुन्नरी शहनाज या येथील तरुणींसाठी पराकोटीच्या आदर्श आहेत. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन ७०-८० तरुणी येथे जंगल संवर्धनाचे कार्य करण्यात गुंतल्या आहेत.
गोव्याचाही एक माणूस जंगल पर्यटन संवर्धनात गुंतलाय, ते आहेत जगविख्यात आर्किटेक्ट डीन डिक्रूझ. देशातील प्रमुख अभयारण्यात जंगल अनुरूप कुटिरे तयार करण्याचे काम त्यांना दिले जाते. तेही आम्हांला नागपूर विमानतळावर भेटले. गोव्यात मात्र सरकारने त्यांना काळ्या यादीत टाकले आहे. कारण ते पर्यावरणवादी आहेत.
‘ताडोबा’मध्ये आम्ही चार दिवस मुक्काम केला व त्यात कोअर आणि बफरमध्ये आम्ही प्रत्येकी दोन सफरी अनुभवल्या. पहिल्याच सकाळी दोन तासांत तीन वाघांचे दर्शन, हा आमच्यासाठी निश्चितच एक अनोखा, विस्मयकारक अनुभव होता. त्यातील एक वाघ तर आमच्या जीपसमोरून ऐटीत पावले टाकत पुढच्या रानात निघून गेला.
‘कॉलरवाली’लाही आम्हांला पाहता आले व ‘शंभू’ नावाचा वाघ आमच्या अस्तित्वाची फारशी दखल न घेता आमच्या पुढून निघून गेलेला आम्हांला पाहता आला. वाघांची संख्या बफर भागात वाढली आहे, याचा हा अनुभव होता. तेही आता पर्यटकांविषयी भीती बाळगत नाहीत. कारण अनेकजण याच पर्यटन काळात म्हणजे २०-२५ वर्षांत जन्माला आले आणि लहानपणापासून हा मानवी ‘हस्तक्षेप’ पाहत आले आहेत.
वाघांसह इतर जनावरेही पर्यटक आपल्याला कोणतीही इजा करणार नाहीत, याची खात्री बाळगत असल्याने ते बेदरकारपणे वावरतात. इतर पर्यटक आम्हांला सांगत होते, की त्यांनी ‘कॉलरवाली’ला तिच्या तीन बछड्यांसह पाहिले.
एका तळ्याच्या काठावर अनेक सफारी जीप तासभर निमूटपणे बसून वाघांची वाट पाहत होत्या. वाघ येतो, तेव्हा पक्षी चीत्कार करतात. इतर प्राण्यांना तो सावधगिरीचा इशारा असतो. माकड तर हरणांचे इतके दोस्त बनले आहेत, की विशिष्ट चीत्कार करून ते सतत हरणांना सावध करीत असतात. पर्यटक मार्गदर्शकांनाही आता हे इशारे समजू लागले आहेत. ते मग जीप थांबवून वाट पाहतात. बऱ्याचवेळा त्यांचे वाट पाहणे फलद्रूप ठरते. बऱ्याच वेळा त्यातून काही निष्पन्नही होत नाही...
परंतु हे वाट पाहणे म्हणजेच जंगल अनुभवणे असते.
जंगलातील नीरव शांतता. तळ्यात डुंबणारे एक विशिष्ट प्रकारचे जंगली बदक... जे पाण्यात खोलवर डुबकी मारून दुसरीकडून बाहेर येतात. त्याला नेहमीच मासा सापडतो, असे नव्हे. परंतु त्याचे खोलवर डुबकी मारणे, बाहेर येऊन पंख फैलावून ते सुकविणे; पुन्हा पाण्यात डुबकी...
हा प्रकारही वाघाच्या अस्तित्वासारखाच वेगळा जीवनानुभव असतो. परमोच्च सुखाचा, आंतरिक शांततेचा तो एक सखोल मानवी जीवनानुभव असतो. काहीजण याला ‘जंगल वाचणे’ म्हणतात. हे ‘वाचणे’ जीवन समृद्ध बनविते. मुळात वाघांचे संवर्धन हा जरी सध्या ‘पॉलिटिकली करेक्ट’ चळवळीचा भाग असला, तरी आमच्या नेत्यांना त्यांच्या अस्तित्वाचा तिटकाराच आहे.
मानवी प्रगतीचा भाग म्हणून ते जंगलांवर अतिक्रमण करतात. एकगठ्ठा मतांसाठी अशा अतिक्रमणांचे समर्थन करतात व ‘व्याघ्र क्षेत्राचा’ तर दुस्वास सार्वत्रिक बनला आहे. हे नेते मानवाचे खरे शत्रूच असतात. म्हणूनच ‘ताडोबा’नंतर मला ‘सुंदरवन’ला भेट देण्याची ओढ लागली आहे...
प्रत्यक्षात जंगले व वाघ वाचविणे, हा भविष्यातील आपल्या पिढ्यांच्याच संवर्धनाचा विचार असतो. वाघ नसेल तर हरणे नसतील व मानवी अस्तित्वालाही सुरुंग लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.