Opinion: पूर्वजांनी जपला पर्यावरणाचा समतोल, आजचा मानव मात्र स्वार्थापोटी बनलाय निसर्गाचा शत्रू

Eco-Friendly Water Structures: आपल्या पूर्वजांनी ओहोळाच्या काठाकडील झरी, तळी आणि देवराया सांभाळून त्या चांगल्या राहण्यासाठी प्रयत्न करून पर्यावरणाचा समतोल राखला होता.
Eco-Friendly Water Structures
Eco-Friendly Water StructuresDainik Gomantak
Published on
Updated on

आपल्या पूर्वजांनी ओहोळाच्या काठाकडील झरी, तळी आणि देवराया सांभाळून त्या चांगल्या राहण्यासाठी प्रयत्न करून पर्यावरणाचा समतोल राखला होता. त्यांनी भाषणातून सल्ले देऊन पर्यावरण शुद्ध करण्याचे खटाटोप केले नव्हते. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे वृक्ष, वनस्पती, पाणी आणि जीव जीवाश्म यांचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्याला बाधा पोहोचते ती वनराई नष्ट केल्यानेे, डोंगर कापणीने, काँक्रीट बांधकामांमुळे उष्णतेत वाढ झाल्याने. नैसर्गिक पाणी साठे सुकून पर्यावरणाचा समतोल बिघडतो, याची जाण माणसाला असूनसुद्धा तो स्वार्थाच्या हव्यासाने पृथ्वीच्या अंगाचे लचके तोडीत, राक्षसी विकास साधत आहे.

विज्ञान हे लवचीक आणि विनम्र असावे. मानवीय जीवनात बौद्धिक आनंद, सांस्कृतिक वैभव, मानसिक संतुलन, कृषी संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी शुद्ध पाण्याची नितांत गरज आहे. पाषाणावरील अक्षरशिल्प आणि विचारशक्ती यातला फरक पूर्वजांनी ओळखला होता. अशा विचारांनी भविष्याचा वेध घेण्याची त्यांना दूरदृष्टी होती. पाण्याची नासाडी केल्यास सारे जग विनाशाकडे ढकलले जाते, हे ओळखून त्यांनी प्रगत आणि सुसंस्कृत होण्यासाठी कृषीसंस्कृतीवर भर दिला. शेतीमुळे पृथ्वीवर पर्यावरणाचा समतोल राहतो, हे त्यांना माहीत होते.

पण, त्यांनी विकसित केलेली कृषी आज भकास अवस्थेकडे पोहोचली आहे. हिंस्र श्वापदांच्या भीतीने सदैव धास्तावलेला, निसर्ग शक्तीपुढे हतबल होऊन आहार, भय, निद्रा, मैथुन याव्यतिरिक्त कुठलाही मनोव्यापार करण्यास असमर्थ ठरलेला मनुष्य, उक्रांतीच्या प्रदीर्घ प्राणी-प्रवासात आज वाटचाल करीत आहे.

निसर्गावर मात करण्याच्या प्रयत्नात त्याला काही प्रमाणात यश मिळाले. साहित्य, क्रीडा, लोककला, दळणवळण, उत्पादन या गोष्टी मेंदूच्या जोरावर मिळवत त्यातून करमणुकीची साधने निर्माण केली. समूह जमावाने विविध मार्ग चोखाळत भवताल आणि अंतरंग हे पैलू अभ्यासण्याचा त्याने प्रयत्न चालवला आहे. या धडपडीत संकल्प आणि घटितांचा त्याला फारच उपयोग झाला.

एका बीजापोटीं, तरू कोटी

कोटी जन्म घेती सुमनें-फलें

आधी बीज एकलें

या शांताराम आठवलेंनी लिहिलेल्या अभंगात जे सांगितले आहे ते सत्य आहे. जमिनीवरील बी उष्णता आणि पाण्याच्या आधारे झाड होऊन फळ देते आणि बिया मागे सोडून जाते; त्याच बिया पुन्हा झाड होतात व फळे देतात. उजेडाचा वारसा रात्रगर्भी पेरून अस्त होणाऱ्या सूर्यासारखे, उत्पत्तीतून विलय, विलयातून पुन्हा उत्पत्ती करणारे निसर्गचक्र सुरूच राहते.

बीपासून झाड, झाडापासून फळ, फळापासून बी, असे अविरत चालणारे निसर्गचक्र पाणी, जमीन, हवा, उष्णता यांच्या साथीने सुरूच राहते. आपल्या मानवी जीवनात बौद्धिक आनंद, सांस्कृतिक वैभव आणि मानसिक संतुलन टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला जगण्यासाठी निसर्गाने दिलेले ओहळ, नद्या, सरोवरे, समुद्र, जंगल टिकवणे अत्यंत गरजेचे आहे, हे शिकत शिकत आदिमानवाने प्रगती साधली.

बागायती, कुळागरे, पुरणशेती, कुमेरी शेती, सरदवायंगण शेती, खाजनशेती फुलवली. त्यासाठी नैसर्गिक बंधारे, शेततलाव, मानस, पाट, खाण, चर, हर्न, तुम्ब या वास्तू व बांधकामे त्यांनी केली. हे सर्व पाहता त्यांचे पर्यावरणावरील प्रेम सहज लक्षांत येते. मशिनांचा शोध लागण्याआधी त्यांनी नांगर, कुदळ, कोयता, पाळ, कुर्‍हाड, पिकास, फावडा, मोट अशी हत्यारे वापरून कृषीसंस्कृती जपली. हजारो वर्षांपूर्वी लांबच लांब बांध, खळ्या, कालवे, धरणाद्वारे बागायती कुळागरे, शेतमळे त्यांनी फुलवले.

Eco-Friendly Water Structures
Goa: गोमंतकीयांनो सावधान..! माशांचे अतिसेवन किडनीला ठरू शकते मारक, संशोधनात धक्कादायक माहिती उघड

हे करताना, त्यांनी सिमेंट आणि रेतीचा उपयोग न करता चिखल, माती, दगड, चुना याचा वापर करून बांधकामे पूर्ण केलेली पाहून आश्चर्य वाटते. त्यांना विकासाचे वावडे नव्हते; पर्यावरण जसे आहे तसे राहावे याची काळजी मात्र ते घेत होते. पर्यावरणाला विकासाच्या विरुद्ध आजकाल ठेवले जाते. पर्यावरणाची चिंता व्यक्त केली, की ती करणारी व्यक्ती विकासाची विरोधक ठरवली जाते. आपल्या पूर्वजांनी ‘श्वाश्वत विकास’ किंवा ‘पर्यावरणपूरक विकास’ साधला होता, हे आपण लक्षांत घेत नाही. शेतीच्या विकासासाठी त्यांनी तयार केलेली बांधकामे शेतीला, वनस्पतींना, पशू-पक्ष्यांना, प्राण्यांना मारक नव्हती. म्हणूनच निसर्गाने टिकवून ठेवलेली ही बांधकामे जशीच्या तशी उभी असलेली आज पाहावयास मिळतात.

आपल्या सत्तरीच्या अजब जंगलात उगम पावलेल्या ओहोळांचा प्रवाह म्हादईच्या पात्राकडे धाव घेताना पाहावयास मिळतो. सत्तरीतील करंझोळ गावच्या म्हादई अभयारण्यातील डोंगरात चोरो या ठिकाणी करंझोळ-कुमठळ ओहोळांचा उगम होतो. हा प्रवाह खालच्या मैदानी भागात कारलात कोंड या ठिकाणी दुसऱ्या ओहोळाचे पाणी आपल्या प्रवाहात सामावून घेतो. या दुसऱ्या ओहोळाचा उगम करंझोळ डोंगरातील बामणगुणो ठिकाणी होतो.

अरण्यांतील वनराईला पाणी देत मुख्य ओहळ काजऱ्याकडे पोहोचतो, तेव्हा तिथे त्याला तिसरा ओहळ येऊन मिळतो आणि त्याचा प्रवाह बराच मोठा होतो. तिसऱ्या ओहोळाचा उगम सोनकेगदी भागात होतो. तो तिथला परिसर पाण्याने भिजवीत खाली येतो. मुख्य ओहळ काजऱ्याकडून खाली गोठणार येथे पोहोचतो तेव्हा त्याला ‘गोंयची आडी’ ओहोळाचे पाणी येऊन मिळते. वरच्या भागात उगम पावलेला गोंयची आडी हा ओहळ खालच्या भागात येताना मोनेकोंड धबधबा बनून वज्रासारखे पाण्याचे रूप धारण करतो.

तिथला परिसर भिजवीत वाहत खाली येतो. गोठणार करंझोळ गावाचा निरोप घेऊन तो कुमठळ, तळीकुंभ, कवाळो, परिसराला पाणी पुरवीत पुढे दऱ्यार या ठिकाणी म्हादईच्या पात्रात विलीन होतो. त्या ओहोळाच्या पाण्यावर करंझोळ आणि कुमठळ गावांच्या भूमिपुत्रांनी शेतीबागायती केली. त्या सुपीक जमिनीत इच्छाशक्ती आणि अपार कष्ट या जोरावर दिवस रात्र काम करून वायंगण शेती केली. या वायंगण शेतात दामगो, बेळो, शिट्टा, दडगो, खोचरी बियाणी पेरली. पाळलेल्या जनावरांचे शेणखत आणि जंगली पालापाचोळा यांचा वापर सेंद्रीय खत म्हणून करत भातधान्य पिकवले होते.

शिवाय मिरची, कांदा, वाल, वांगी, मुळा भाजीचे पीक घेत होते. पावसाळ्यात कुमेरी शेती करून भात, नाचणी, पाकड, राळो, कांगो, वरी, तूर, जोंधळा ही पिके घेत होते. घराशेजारच्या परसबागेत अळुगाडी, चिर्का, काटेकणगी, करांदे, मुडली, कंदमुळाचे पीक मोठ्या प्रमाणात होत होते.

आजही कुमठळ, करंझोळ गावातील कष्टकरी, सत्तरीचा भूमिपुत्र अशा धान्याची लागवड करत आहे. कमी-अधिक प्रमाणात तिथली कंदमुळे व भाजीपाला फारच रुचकर लागतो. त्या ओहोळात खेकडे, मळ्यो, काडय, वाळर, थिगुर आणि वायंगणशेतात कोंगे, शिंपले मिळत होते. आज वायंगण शेती बंद झाल्याने कोंगे, शिंपले नष्ट झाले आहेत.

Eco-Friendly Water Structures
Goa Accident: बस नसल्याने लिफ्ट घेतली अन् मद्यधुंद ट्रक चालकाने धडक दिली; महिला सुरक्षा रक्षक जागीच ठार

या गावांतील शेतकरी लोक पावसाळ्यात कणगीचे मळे मोठ्या प्रमाणात उभारतात. पूर्वी त्या ओहोळांचा काठ हिरव्या शेतीने आणि कडधान्ये फुलून जायचा. नांगरणी करताना बैलाच्या गळ्यातील घंटा, गळसराचे घुंगरू, कोगळे, थोकरी वेगवेगळ्या प्रकारे तालसुरांचे मधुर संगीत कानी पडायचे. डोक्यावर घोंगडी घेतलेला कष्टकरी शेतात, मळ्यात पावसात भिजत काम करून धान्याचे कोंब रुजवण्यास धडपडत होता. त्या ओहोळाचे पाणी, पात्रातील मासळी, शेतातील कोंगे, लावलेला भाजीपाला, फळे, पावसाळ्यातील कैक प्रकारच्या रानभाज्या खाऊन तो मोठा झाला.

ते मिळवण्यासाठी त्याने जंगली श्वापदांशी मैत्री साधली. धान्य राखण्यास शेतातील माळ्यावर बसून रात्री जागवल्या. म्हादईच्या जंगलातील शुद्ध हवेच्या श्वासाने निरोगी आयुष्य इथला कष्टकरी समाज जगला होता. मातीच्या भिंतींची कौलारू घरे, गवताने आच्छादलेले नैसर्गिक निवारे, गाईगुरांचे गोठे उभारून एकमेकांच्या विश्वासावर कष्टकरी जगले होते.भक्तीत रमून देवाचा धावा करणारा सत्तरीचा भूमिपुत्र आजही करंझोळ, कुमठळ गावात त्या ओहोळाच्या काठावर काम करताना पाहावयास मिळतो.

मधू य. ना. गावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com