Goa Summer: गोव्याची खरी मजा उन्हाळ्यातच! तोरे, बियोंनी सजलेला बाजार, ‘पुरूमेंता’ची तयारी आणि ’रांधची कूड’

Goa Summer Season: पांढऱ्या शुभ्र कणगांच्या भल्या मोठ्या ढिगातून एखाददुसरे हलक्या जांभळ्या रंगाचे रताळे ‘मलाही यांच्यासोबत घेऊन जा’ म्हणत डोकावत असते.
Summer season vegetables market
Summer season vegetablesDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे-नायक

आता उन्हाची तीव्रता जाणवू लागलीय. पुढचे दोन महिने नकोसे होणार. सर्वांची चाल मंदावणार. उन्हाळा कितीही नकोसा वाटला तरी गोव्यात खरी मजा उन्हाळ्यातच आहे. फुला-फळांनी बहरलेला, घराघरांत ‘पुरूमेंता’ची तयारी सुरू होणारा, विविध प्रकारचे, विविध चवींचे पदार्थ खायला मिळणारा हा काळ परत वर्षभर अनुभवायला मिळत नाही. या दिवसांत भल्या सकाळी नुसती भाजी मंडईत चक्कर मारून या!

कितीतरी हंगामी फळभाज्यांनी बाजार फुललेला दिसून येईल. काटे कणगा, बियो (ओले काजू), आळसंद्याच्या कोवळ्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, सुरण, आगाशी भागातली प्रसिद्ध वांगी, गोवा वेल्हा भागातली आठ शिरांची भेंडी, गड्डे (नवलकोन), दुधीची फुलं, अळसांद्यांची पालेभाजी, रसरशीत मुळा आणि सर्वांत महत्त्वाचे उन्हाळी हंगामाची शान असणारी ‘तोरे’ (कैऱ्या) आणि आंबे कसे विसरता येतील?

पुढचे तीन चार महिने भाजी मंडईवर यांचेच राज्य. भाजी मंडईत बघावे तिथे कैरी आणि आंबेच आंबे! उन्हाळी वातावरणात बाहेर पडण्याचा कंटाळा येत असला तरी या काळात भाजी मंडईत जायला नक्कीच कंटाळा येणार नाही.

पणजी भाजी मंडईत काही खरेदी करायची नसली तरी या दिवसांत नुसती चक्कर मारून नेत्रसुख घेऊन येते. इथे आणखी एक वेगळी मजा असते. दररोज भल्या सकाळी ६.३० वाजता पणजी भाजी मंडईबाहेर रस्त्याच्याकडेला छोटासा बाजार भरतो आणि त्यात जी ताजी हंगामी भाजी मिळते त्यासाठी तर मुद्दाम जाते.

आत दिवसभर भरणाऱ्या भाजी मंडईची ही छोटीशी झलक असते. पणजीतले अनेक मान्यवरांचे भल्या सकाळी भरणाऱ्या या छोट्याशा बाजारात दर्शन होते. प्रत्येकाच्या भाजीच्या पिशवीतून डोकावणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या बघून पुढच्या काही दिवसांत यांच्या घरी काय शिजणार हे लक्षात येते.

कणगा घेतलीत म्हणजे कणगाची खीर बनवतील नाहीतर कणगांच्या करंज्यादेखील बनवू शकतील आणि हे दोन्ही बनवायला वेळ नसेल तर कणगी नुसतीच उकडून खाल्ली तरी उत्तमच. पांढऱ्या शुभ्र कणगांच्या भल्या मोठ्या ढिगातून एखाददुसरे हलक्या जांभळ्या रंगाचे रताळे ‘मलाही यांच्यासोबत घेऊन जा’ म्हणत डोकावत असते. उपासाला याच जांभळ्या रताळ्याचा तुपात परतून बनवलेला ‘खीस’ काय सुंदर लागतो!

मग तुम्हांला तो गोड खायचा असेल तर त्यात साखर घालून, शिजवून खाऊ शकता. पण गोड अजिबात नको असेल तर तुपात जिरे-मिरचीची फोडणी करून रताळ्याचा ‘खीस’ परतून घेतला आणि त्यात थोडेसे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून बघा. अहाहा! काय बेस्ट लागतो! गोमंतकीय मंडळींना शेंगदाणे आवडणार नाहीत; त्याऐवजी घरात असलेले मूठभर काजू थोडेसे कुटून घातले तरी चालतील. खादाड माणसाची लक्षणे अशीच असतात. एखादा जिन्नस समोर दिसला की लगेच त्यापासून कोणता पदार्थ बनू शकतो याचाच विचार डोक्यात घोळू लागतो.

Summer season vegetables market
Goan bread: पोर्तुगीज गेले मात्र 'पोदेर' इथल्या मातीत रुजून गेलाय; घराघरांत हक्काची जागा मिळवलेल्या 'पावाची' खरपूस गोष्ट

गोमंतकीय स्वयंपाकघरात कितीतरी आगळ्यावेगळ्या पदार्थांच्या पाककृती दडलेल्या आहेत. उन्हाळ्यात स्वयंपाकघरात रांधताना जीव नकोसा होतो हे सत्य असले तरी स्वयंपाक करण्यात सर्वांत जास्त मजा याच काळात येते. कारण या काळात हाताशी इतके वेगवेगळे जिन्नस असतात की स्वयंपाक करताना छान वाटते.

शाकाहारी असो की मासळीचा स्वयंपाक, कैरी घालून केलेले वेगवेगळ्या चवीचे पदार्थ, मग ते कैरी घालून केलेल्या ‘सुंगटाच्या हुमण’मध्ये कैरीची उतरलेली चव आणि आंबटपणा अफलातून लागतो. कैऱ्या घालून केलेले ताज्या ‘गालमोचे सुके’, ‘तिसऱ्यांचं दबदबीत’ हे सगळे चव काढून खाल्ले जाणारे पदार्थ एरव्हीही बनवले जातात.

Summer season vegetables market
Goan Poi: ‘पोळी नाही दिली?’ असे विचारताच पोदेराने गोलाकार पाव काढून हातावर ठेवला; गोव्याचे पारंपरिक देणे

पण ताज्या करकरीत कैरीचे लोणचे, कैरी घालून केलेले आंबट वरण, कैरीची चटणी, चैत्रातली कैरीची डाळ आणि सर्रास सर्वांचे आवडते कैरीचे पन्हे न बनवता उन्हाळा सुकर होणारच नाही. हा तर पन्हे पिण्याचा हक्काचा काळ. या साऱ्या पदार्थांच्या नुसत्या आठवणींनी उन्हाची तीव्रता कमी झाल्यासारखी वाटली.

पुढचे दोन महिने आपल्याला या रणरणत्या उन्हात काढायचेत तर मग या साऱ्या हंगामी फळांनी, भाज्यांनी आपण ते अधिक रुचकर-चविष्ट बनवूया. उन्हाळी स्वयंपाकघराची आणि भाजी मंडईची ही छोटीशी झलक होती. उन्हाळी पदार्थांचे खूप मोठे भांडार आहे. घरातील ज्येष्ठ महिलांशी गप्पा मारा, त्यांच्या पोतडीतून असंख्य पाककृती तुम्हांला मिळतील!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com