Goan bread: पोर्तुगीज गेले मात्र 'पोदेर' इथल्या मातीत रुजून गेलाय; घराघरांत हक्काची जागा मिळवलेल्या 'पावाची' खरपूस गोष्ट

Goan Food: भट्टीमधून काढलेला, खरपूस भाजलेला पाव खाण्याचा अनुभव काय सुंदर असतो! गरमपणा, खरपूसपणा आणि खाताना त्याचा कुरकुरीतपणा हे सगळे एकावेळी अनुभवायला मिळते.
traditional Goan bread
Traditional bread-making in Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे-नायक

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत पाव हा इतका रुजला आहे की तो इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनून गेला आहे. सायकलवरून सकाळ संध्याकाळ येणारा पोदेर आणि त्या पार्श्वभूमीवर ‘पाँ पाँ’ असा वाजणारा हॉर्न हे सारेदेखील इथल्या वातावरणात एकरूप झाले आहे. पोदेर आला हे कुणाला सांगावे लागत नाही.

‘पाँ पाँ’ वाजणारा हॉर्न पोदेर आल्याची वर्दी देतो. इथल्या लोकांना ‘पोदेर’ म्हणजे कोण हे काही सांगायची गरज नाही. ‘पोदेर’ हा मूळ शब्द ‘पोदेरीया’ या पोर्तुगीज शब्दावरून प्रचलित झाला असावा. पोर्तुगीज गेले मात्र पोदेर इथल्या मातीत रुजून गेलाय. सकाळी उठण्यासाठी घड्याळाला गजर लावावा लागत नाही. पोदेराच्या सायकलचा हॉर्नच आपोआप उठवतो. सकाळचा चहा ते रात्रीचे जेवण असा दिवसभर या ना त्या कारणाने पाव तुम्हांला सोबत करत असतो. गोव्यात आणखी एक छान गोष्ट आहे ती म्हणजे पाव आणायला पायपीटही करावी लागत नाही.

अगदी दारात, तुमच्या घरात पोदेर गरम गरम पाव देऊन जातो. पोदेरसुद्धा इथल्या लोकजीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहेत. त्यांनादेखील चारशे वर्षांची परंपरा आहे. इथल्या अनेक लोकगीतांमध्ये पोदेरांचा उल्लेख आहे. पर्वरी भागात ‘सुकूर’ नावाच्या गावात चर्चच्या माध्यमातून ‘पोदेरांचे फेस्त’ साजरे केले जाते. पूर्ण गोव्यातून अनेक पोदेर मुद्दाम या फेस्तामध्ये भाग घेतात. पावाचे असंख्य प्रकार इथे बघायला मिळतात म्हणून या फेस्ताला भरपूर गर्दी होते. गोव्यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या फेस्त होत असतात पण त्यात ‘पोदेरांचे फेस्त’ हे अनेकांचे आकर्षण ठरते. वेगवेगळ्या प्रकारचे पाव खाण्यासाठी जत्रेला जाणे हेच किती छान.

पणजीतून सांताक्रूझ नावाच्या छोट्याशा गावात जाताना छोटेसे मैदान लागते त्यानंतर चर्च ओलांडले की नाकाला मंद सुवासाची जाणीव होऊ लागते. जवळपास बेकरी असल्याचे हे लक्षण आहे हेही लक्षात येते. बेकरीमध्ये काहीतरी खरपूस भाजले जातेय हे एव्हाना नाकाला समजून जाते.

असेच एकदा त्या रस्त्यावरून जात असताना खरपूस वासाची जाणीव होताच, मुद्दाम थांबून रस्त्यालगत असलेल्या बेकरीत आम्ही शिरलो. एका छोट्याशा घराच्या एका खोलीतली ही बेकरी मी बघतच राहिले. ती खोली बेकरीमधील भट्टीच्या उष्णतेने धगधगीत झाली होती. ही पारंपरिक बेकरी होती. अतिशय साधीसुधी. कोणताही फापटपसारा नसलेली. गोव्यात अशा पारंपरिक पद्धतीने चालणाऱ्या अनेक बेकऱ्या आहेत. त्यातील काहींनी आता कात टाकून नवे रूप घेतलेय तर काही बेकऱ्या बाहेरचे लोक चालवत आहेत.

ताळगाव बेकरीतील आंटी काम करणाऱ्या कामगाराला शांतपणे सूचना करत असतात. एका मोठ्या ट्रेमध्ये कणकेसारख्या भिजवलेल्या गोळ्यातून अतिशय जलदपणे हाताने छोटे छोटे गोळे करून ते आणि एका छोट्या ट्रेमध्ये ठेवणे सुरू असते. आणखी एकजण ते ट्रे उघड्या तोंडाच्या मातीच्या भट्टीमध्ये सरकवतो. तापलेल्या भट्टीत फुलून येणारे मऊ, लुसलुशीत पाव फुलून येत असताना त्याच्या सुवासाच्या घमघमाटाने तोंडातील लाळग्रंथी आपले काम सुरू करतात.

अचानक पोटात भुकेची जाणीव होते. हे असे तिथे गेल्यावर नेहमी घडते. आंटी भट्टीमधले फुलून आलेल्या गरम गरम पावांचे ट्रे उतरवून घेऊन, त्यातून झटपटपणे पावाची लादी वेगळी करून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना गरम गरम पाव देत होत्या. असा भट्टीमधून काढलेला, खरपूस भाजलेला पाव खाण्याचा अनुभव काय सुंदर असतो! गरमपणा, खरपूसपणा आणि खाताना त्याचा कुरकुरीतपणा हे सगळे एकावेळी अनुभवायला मिळते. आम्हांला असा पाव खाण्याचा अनुभव इतका आवडला की आमचे रस्त्यालगत गाडी लावून, हाताला चटके बसतील इतके गरम गरम पाव अधाश्यासारखे खाणे हे सवयीचे झाले.

traditional Goan bread
World Food Day: अभिमान! 'गोवन' अन्नपदार्थांचा टपाल खात्याकडून गौरव

पोर्तुगिजांनी जवळ जवळ साडेचारशे वर्षे इथे राज्य केले. साहजिकच इथल्या समाजजीवनावर, राहणीमानावर आणि इथल्या खाद्यसंस्कृतीवर त्यांचा मोठा प्रभाव दिसून येतो. पोर्तुगिजांनी भारताला आणि गोव्याला एक महत्त्वाच्या पदार्थाची ओळख करून दिली तो म्हणजे ‘पाव’ (ब्रेड). देशातली पहिली बेकरी गोव्यात सुरू झाली. आज इथे घराघरांत पावाने हक्काची जागा मिळवली असली तरी हा प्रवास इतका सोप्पा नव्हता.

या पावाचाच आधार घेऊन पोर्तुगिजांनी धर्मांतर घडवून आणले होते. त्यामुळे आपण पाव खाल्ला तर ख्रिश्चन होणार या भीतीने हिंदू समाज पावाला हात लावायलादेखील तयार नव्हता. हळूहळू समाजाने अनेक गोष्टी स्वीकारल्या. आता मात्र सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण पावाशिवाय होतच नाही. मग ते कॅथलिक असोत की हिंदू असोत.

traditional Goan bread
Goan Food Culture: गोव्याचा पाव, शेजारील राज्यातही खातोय भाव! म्हापसा बाजारपेठेतून मुंबई, बंगळुरुसह अन्य शहरांत पुरवठा

गोव्यात येण्यापूर्वी पावाचे दोनच प्रकार माहीत होते. एक स्लाइस ब्रेड आणि दुसरा लादी पाव. पण इथे आल्यावर मात्र पावाचे इतके खुसखुशीत, लुसलुशीत, कुरकुरीत आणि मऊसूत प्रकार खायला मिळाले की ते खाण्यासाठी दिवससुद्धा कमी पडेल. कुठल्या प्रकारच्या भाजीबरोबर कोणत्या प्रकारचा पाव खायचा हेही ठरलेले असते. सकाळी नाश्त्याला कुरकुरीत ‘उंडे’ हवेत. ‘रोस ऑम्लेट’, ‘चिकन शाकुती’सोबत मऊ लुसलुशीत पाव किंवा कात्रीचा पाव हवा. संध्याकाळी चहासोबत कुरकुरीत ‘काकणा’ (बांगडीच्या आकाराचे गोल कुरकुरीत पाव) आणि रात्री जेवणात पौष्टिक पोळी. पावाचे इतके वैविध्यपूर्ण प्रकार गोवा सोडून अन्य राज्यात कधीच बघायला मिळाले नाहीत. गोमंतकीय एकवेळ पाण्याशिवाय जगू शकतील पण मासळीशिवाय जगू शकणार नाहीत असे म्हटले जाते. तसेच काहीसे या पावाबद्दलही म्हणता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com