God In Difficult Times: सुखात देवाचा विसर, दुःखात आर्त हाक; संकटांच्या काळातच का अधिक घट्ट होतं भगवंताशी नातं?

Kunti prayer to Lord Krishna: आयुष्यात आव्हाने आणि संकटेच आली नसती, तर आपण भगवंताचा असा शोध तरी घेतला असता का? नक्कीच नाही.
Kunti prayer to Lord Krishna
God In Difficult TimesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

आयुष्यात आव्हाने आणि संकटेच आली नसती, तर आपण भगवंताचा असा शोध तरी घेतला असता का? नक्कीच नाही. सुखाच्या दिवसांत जितकी प्रार्थना आपण सहजतेने करतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने कठीण प्रसंगात आपण देवाला मनापासून हाक मारतो.

महाभारताचे महायुद्ध संपले. धर्माचा विजय झाला आणि युधिष्ठिराचा राज्याभिषेक झाला. सर्व काही शांत झाल्यावर श्रीकृष्ण कुंतीचा निरोप घेण्यासाठी तिच्याकडे आले. ते तिला म्हणाले, ‘ तू माझी खरी भक्त आहेस. आयुष्यभर तू अफाट कष्ट सहन केलेस.’ असे सांगून श्रीकृष्णाने तिला हवे ते वर मागायला सांगितले. ज्या स्त्रीने जन्मापासून फक्त अन्याय, अपमान आणि दुःखाच्या झळा सोसल्या, आपल्या डोळ्यांसमोर मुलांना संकटांशी झुंजताना पाहिले, ती स्त्री अशा क्षणी नक्की काय मागेल? स्वाभाविकच सुख, शांती आणि समृद्धी! पण कुंती ही साधीसुधी स्त्री नव्हती; ती एक ज्ञानी भक्त होती.

Kunti prayer to Lord Krishna
Mandovi River Goa: मांडवीचे विराट रूप अन् तिच्या पात्रातील 'आठवे बेट' आखाडा; जकातीपासून देवालयांपर्यंतचा रंजक इतिहास

तिने श्रीकृष्णाकडे भलतेच काही मागितले; तिने मागितली सतत येणारी संकटे आणि आपत्ती! कारण एकच, संकटांच्या काळात तिचे मन सतत भगवंताच्या नामात तल्लिन राहायचे. वैधव्य, भर सभेत झालेला अपमान, वनवास, युद्ध आणि स्वकीयांचा वियोग, या प्रत्येक कठीण प्रसंगात ती श्रीकृष्णाला आर्ततेने पुकारत राहिली आणि त्याला नेहमी स्वतःसोबत अनुभवत राहिली. तिला दुःखाची हौस नव्हती, पण आता सुखाचे दिवस आले म्हणून भगवंताचा विसर पडावा, हेही तिला मान्य नव्हते.

आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर पुन्हा दुःखच कोण मागेल? असा विचार फक्त कुंतीसारखा थोर विवेक असलेला भक्तच करू शकतो. कुंतीची ही मागणी मानवाच्या एका अगदी नैसर्गिक स्वभावावर बोट ठेवते, माणूस सुखात असला की देवाला सहज विसरतो, पण जशी अडचणींची टांगती तलवार डोक्यावर येते किंवा स्वतःचा स्वार्थ/गरज निर्माण होते, तसा तो देवाला अगदी आर्ततेने आठवू लागतो.

आपण रोज देवाची पूजा करत असू, प्रार्थना करत असू किंवा नित्य नियमाने मंदिरात जात असू; पण मनात कोणतीतरी चिंता असेल किंवा काहीतरी पदरात पाडून हवे असेल, तेव्हा आपल्या प्रार्थनेत एक वेगळीच आर्तता आणि तीव्रता येते. हाच अनुभव मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातही अनेकदा घेतला आहे.

Kunti prayer to Lord Krishna
Goa Development Fund: 'गोव्याच्या विकासासाठी भरपूर निधी देऊ'; फोंड्यात शिवराजसिंह चौहान यांचे आश्वासन, 80 कोटींच्या धनादेशांचे वितरण

जेव्हा जेव्हा माझ्यावर कठीण प्रसंग येतात, तेव्हा मला कुंतीची आणि तिच्या या वराची आठवण होते. ही संकटे मला त्रास देण्यासाठी नाही, तर पुन्हा एकदा भगवंताच्या जवळ घेऊन जाण्यासाठीच आली आहेत, हा धीर मला मिळतो. मी आज ज्या अडचणींमधून जात आहे, ती माझ्या आध्यात्मिक प्रगतीची आणि आत्मशोधाची साधने आहेत, हे मला उमजते.

जर आयुष्यात आव्हाने आणि संकटेच आली नसती, तर आपण भगवंताचा असा शोध तरी घेतला असता का? नक्कीच नाही. सुखाच्या दिवसांत जितकी प्रार्थना आपण सहजतेने करतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने कठीण प्रसंगात आपण देवाला मनापासून हाक मारतो. दिवस चांगले चालू असताना आपण संसाराच्या आणि जगाच्या रहाटगाडग्यात सहज वाहवत जातो. अशा वेळी नामस्मरण किंवा पूजा म्हणजे दिवसाच्या ‘टू-डू’ लिस्टवरची आणखी एक गोष्ट बनून राहते; फक्त उरकायची म्हणून उरकलेली एक सवय! अनेकदा तर आपण इतक्या घाईत असतो की, देवापुढे हात जोडताना त्यात मन किंवा भाव काहीच नसतो. एक दिनक्रम म्हणून आपण त्यावरून पटकन पुढे निघून जातो.

पण दुःखाची मागणी करून कुंतीने या संकटांमागचे दडलेले ईश्वरी रहस्य उलगडून दाखवले. तिने कठीण काळाला केवळ त्रास किंवा कर्मभोग मानले नाही, तर ती देवाची कृपा मानली ज्याद्वारे ती भगवंताच्या जवळ राहू शकत होती. तिने दुःखाबद्दल कधीच कोणती तक्रार केली नाही, उलट ती ईश्वराला शरण गेली. संकटांना धैर्याने सामोरे जात ती हसतमुखाने आपले जुने कर्म क्षीण करत होती.

कुंतीची ही कठीण पण विचार करायला लावणारी गोष्ट मनात ठेवल्यामुळे आता भगवंताकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे. आता मी देवाला ‘हे संकट टाळ’ म्हणून साकडे घालत नाही; तर ‘संकट कितीही मोठे असू दे, त्याचा हसतमुखाने सामना करण्याचे धैर्य दे आणि या संपूर्ण प्रवासात तुझा हात माझ्या हातात राहू दे’, एवढीच प्रार्थना करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com