
मिलिंद म्हाडगुत
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ या ओळी आठवायचे कारण म्हणजे परवा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेले वक्तव्य. ‘जसे कर्म तसे फळ’ या गीतेतल्या संदेशाचा उल्लेख करून त्यांनी आमदार गोविंद गावडे यांना अप्रत्यक्षरीत्या टोला हाणला. तसे पाहायला गेल्यास गोविंद हे सुदिनांचे जुने कार्यकर्ते. १९९९साली हेच गोविंद सुदिनांच्या प्रचारात सक्रिय होते. नंतर नेमके काय झाले हे माहीत नाही, पण गोविंदांनी सुदिनांची साथ सोडून रवि नाईकांच्या गटात प्रवेश केला.
जिल्हा पंचायतीच्या उमेदवारीवरून सुदिन व गोविंद यांच्यात बिनसले असे त्यावेळी बोलले जात होते. कोणत्याही कारणाने का असेना पण दोघांत वितुष्ट निर्माण झाले एवढे खरे. नंतर गोविंदांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. २००७, २०१२साली पराभव तर २०१७ व २०२२ साली विजय असा त्यांचा राजकीय कारकिर्दीचा आलेख विस्तारत गेला. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत त्यांचे प्रतिस्पर्धी होते ते ढवळीकरच! पहिल्यांदा मडकईमध्ये सुदिन तर नंतर तीन वेळा प्रियोळमध्ये दीपक. पण सुदिन - गोविंद यांच्यातले म्हणा वा ढवळीकर बंधू व गोविंद यांच्यातले म्हणा, असलेले वैमनस्य राजकीय कुंपणे ओलांडून वैयक्तिक स्तरावर पोहोचले होते यात शंकाच नाही!
विशेष म्हणजे ज्यांना गोविंद आपले राजकीय गुरु मानतात त्या रविंनी आपल्या कोणत्याही राजकीय विरोधकाशी केव्हाच वैयक्तिक पंगा घेतला नाही, हे इथे लक्षात घ्यायला हवे. पण गोविंदानी हे लक्षात न घेता ही मर्यादा ओलांडली. त्यातूनच मग तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांसमोर सुदिन यांना अपशब्द वापरणे, मगोला माधवरावांच्या गोठ्यात बांधलेला पक्ष म्हणणे, अशा प्रकारचे प्रसंग घडायला लागले.
गोविंदांचा तो स्वभाव असे म्हटले तरी राजकारणात शिरल्यानंतर बऱ्याच गोष्टींना खास करून आक्रमक बोलण्याला मुरड घालावी लागते हेही तेवढेच खरे आहे. लोकप्रतिनिधी झाल्यावर तुमचा प्रत्येक शब्द तोलूनमापून बोलावा लागतो, हे कधीच विसरता कामा नये. त्यामुळे मनात काही असले तरी ते उघड करता येत नाही आणि करता कामाही नये. याबाबतीत गोविंदांनी त्यांचे राजकीय गुरू रविंचा कित्ता गिरविला असता तर ते त्यांना जास्त लाभदायक ठरले असते. पण हा कित्ता ते गिरवू न शकल्यामुळे त्यांचे मंत्रिपद गेले हेही उघडच आहे. आता त्यांचे मंत्रिपद गेल्यामुळे सुदिनांना गीतेतल्या त्या श्लोकाची आठवण येणे साहजिकच आहे.
काही का असेना या निमित्ताने का होईना पण सुदिनांना हा संदेश आठवला ते एकापरी बरेच झाले. गीतेतल्या ज्ञानाची आज समाजाला खरी गरज आहे. पण तरीही आज लोक व खास करून राजकारणी हा अमूल्य संदेश विसरतात. म्हणूनच तर सत्ता मिळाली की सत्तेचा दुरुपयोग सर्रास केला जातो. सत्ता ही क्षणभंगुर असते याचा विसर आजच्या राजकारण्यांना पडायला लागला आहे. पूर्वी भाऊसाहेब बांदोडकर वा मनोहर पर्रीकरांसारख्या राजकारण्यांनी सत्तेचा वापर सामान्यांच्या भल्यासाठी केला.
पण आज सत्तेचा आधार घेऊन अनेक कुकर्मे होताना दिसत आहेत. मात्र या कुकर्माचे पडसाद नंतर उमटू शकतात हे लोक विसरायला लागले आहेत. कोणाचे चांगले करता येत नसेल तर वाईट तरी करू नये, हे सूत्रही लोकांच्या आठवणींपलीकडे जायला लागले आहे. हा मंत्र फक्त गीतेचा नसून सद्गुरू वामनराव पै यांनी आपल्या जीवन विद्येतही हा मंत्र अधोरेखित केला आहे. प्रत्येक माणसाच्या पुण्य पापाची पेढी असते, आणि तुमचे प्रत्येक कर्माची नोंद या पेढीत होत असते असे ‘जीवन विद्या’ सांगते.
जर तुमचे पुण्य पापापेक्षा अधिक असेल तर तुम्हांला त्याचा उर्वरित जीवनात लाभ होऊ शकतो. अन्यथा तुमच्या कर्माचे फळ तुम्हांला तुमच्या हयातीतच मिळत असते, असा संदेशही ‘जीवन विद्या’ देते. हा संदेश गीतेच्या ज्ञानाशी मिळताजुळता असून याद्वारे कै. वामनराव पै यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला होता. काहींना हा संदेश म्हणजे एक मिथ्य वाटत असले तरी अनेक उदाहरणांवरून या संदेशात बरेच तथ्य असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भातला ’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा जीवनविद्येचा संदेशही बरेच काही सांगून जातो.
आता गोव्याच्या राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या संदेशाला स्पर्श केल्यामुळे त्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यांच्या बोलण्याचा केंद्रबिंदू गोविंद गावडे आहे, हे उघड असले तरी गावडेंपुरता हा विषय मर्यादित नाही, हेही तेवढेच खरे आहे. म्हणूनच या संदेशाचे आचरण प्रत्येक माणसाने करण्याचे बघितले पाहिजे यात शंकाच नाही. नाहीतर त्याचे परिणाम सार्वजनिक वा खाजगी जीवनात भोगावे लागणार हे अटळ आहे. आता हे जाणून जेव्हा हा संदेश लोक - खास करून आजचे राजकारणी - गांभीर्याने घेतील तोच समाजाच्या व राष्ट्राच्या दृष्टीने खरा ‘सुदिन’ ठरू शकेल हेच खरे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.