अग्रलेख: एकाच संस्थेत वारंवार मृत्यू होत आहेत! पालक, व्यवस्थापन आणि समुपदेशक यांची एकत्रित बैठक अपरिहार्य आहे..
‘सर सलामत तो पगडी पचास’ या म्हणीत जीवनाचे मूलभूत तत्त्व सामावले आहे. प्राण सुरक्षित असतील तर मान-अपमान, यश-अपयश, पद-प्रतिष्ठा पुन्हा मिळवता येते; पण जीव गेला की सर्वच संपते. आजच्या स्पर्धात्मक शिक्षणव्यवस्थेत मात्र हे तत्त्व जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी विसरले जात आहे.
सांकवाळ येथील ‘बिट्स पिलानी कॅम्पस’मध्ये गेल्या तेरा महिन्यांत सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, त्यात आत्महत्यांचे प्रमाण अधिक आहे. ही केवळ आकडेवारी नसून, व्यवस्थेने आणि समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गंभीर वेळ येऊन ठेपल्याचा संकेत आहे. प्रश्न केवळ दोषारोपांचा नसून, विद्यार्थ्यांचे जीवन सुरक्षित ठेवण्यात आपण कुठे कमी पडलो, याचा शोध घेण्याचा आहे. वर्षापासून नैराश्याच्या समस्येने त्रस्त झालेल्या वैष्णवी जितेश या विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येमुळे गोव्यात खळबळ उडाली आहे.
बिट्स पिलानी ही भारतातील एक नामांकित व स्वायत्त उच्च शिक्षण संस्था. अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान व व्यवस्थापन क्षेत्रात या संस्थेने देशाला अनेक नामवंत अभियंते, संशोधक, उद्योजक आणि प्रशासक दिले आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ऍमेझॉनसारख्या जागतिक कंपन्यांत बिट्सचे माजी विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत. राजस्थान, हैदराबाद, दुबई आणि गोवा असे चार कॅम्पस असलेल्या या संस्थेचा सांकवाळ कॅम्पस मात्र विद्यार्थ्यांच्या मृत्यूंमुळे सध्या देशभर चर्चेत आहे. बिट्सची शिक्षणपद्धत अत्यंत कठीण मानली जाते.
प्रवेशासाठी मोठा खर्च करावा लागतो आणि अभ्यासक्रमाचा ताणही प्रचंड असतो. सध्या सांकवाळ कॅम्पसमध्ये सुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अनेकांना हा ताण पेलवत नाही आणि त्यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. काही प्रकरणांत अमली पदार्थांच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे आरोपही झाले; मात्र ते सिद्ध झालेले नाहीत.
सप्टेंबरमध्ये ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर ताण व्यवस्थापन, समुपदेशक नियुक्ती आणि सरकारी समिती नेमण्याचे निर्णय घेण्यात आले. तरीही वैष्णवी जितेशचा बळी गेला हे अधिकच अस्वस्थ करणारे आहे. वैष्णवी नैराश्यामध्ये होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते, याची माहिती असतानाही समुपदेशन केंद्रातील कोणत्याही समुपदेशकाने तिला वैयक्तिक पातळीवर संपर्क साधला नाही, असा गंभीर आरोप होत आहे.
या आरोपांची सत्यता तपासली जाणे आवश्यक असले, तरी एक गोष्ट निर्विवाद आहे, केवळ गोवा कॅम्पसमध्येच सातत्याने बळी जात असतील तर काहीतरी चुकते आहे. ओम प्रियान सिंग, अथर्व देसाई, कृष्णा कासेरा, कुशाग्र जैन, ऋषी नायर आणि आता वैष्णवी जितेश ही मृत्यूची श्रुंखला थांबवावीच लागेल. सप्टेंबरमधील घटनेनंतर कॅम्पसने प्रत्यक्षात काय उपाय केले? सरकारी समितीचा अहवाल कुठे आहे? यापूर्वीच्या मृत्यूंचे अहवाल का जाहीर झाले नाहीत?
या प्रश्नांची उत्तरे शोधली असता, कागदोपत्री उपाय आणि जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती अधिक दिसते. सद्य:स्थितीत व्यवस्थापनावर टीका होणे स्वाभाविक असले तरी या घटनांसाठी केवळ संस्थेलाच जबाबदार धरून प्रश्न सुटणार नाही. जबाबदारीचे धागेदोरे व्यवस्थापनाइतकेच पालकांपर्यंतही पोहोचतात. दबाव सर्वत्र असतो, पण एकाच संस्थेत वारंवार मृत्यू होत आहेत. आता पालक, व्यवस्थापन आणि समुपदेशक यांची एकत्रित बैठक अपरिहार्य आहे.
ताणतणाव व्यवस्थापनावर खुलेपणाने चर्चा करणे, प्रशिक्षित समुपदेशकांची नेमणूक करणे आणि जुन्या घटनांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. कोणतेही मूल आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी नैराश्यात जाते; त्यामागे काही प्रसंग, अपयश किंवा मानसिक संघर्ष असतो. त्या टप्प्यावर मदतीचा हात मिळाला, तर अनेक प्राण वाचू शकतात. बिट्सच्या कॅम्पसमध्ये पालकांना प्रवेशास कठोर मर्यादा असताना, संस्थेनेही काही अंशी पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. समुपदेशन आणि अभ्यास समिती अशा दुहेरी पातळीवर काम झाल्यास शोकांतिका टाळता येऊ शकतात.
समितीत मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांचा सहभाग असावा. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची जबाबदारी केवळ संस्थांवर सोपवून पालक मोकळे होऊ शकत नाहीत. अपेक्षांचे ओझे, स्पर्धेचा ताण आणि अपयशाची भीती यांची तीव्रता पालकांनीही समजून घेतली पाहिजे. उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी क्षेत्रात सर्वाधिक आत्महत्या या अलीकडच्या काळात झाल्या आहेत.
केवळ उच्च शिक्षण क्षेत्रातच आत्महत्या होतात हा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात, देशभरात सर्वाधिक प्रमाण दहावी (२४.६%), आठवी(१८.६%) आणि बारावी(१७.५%) असे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आहे. या घटनांकडे केवळ आकडेवारी म्हणून पाहण्याऐवजी, त्यातून धडे घेऊन ठोस दिशा ठरवणे अत्यावश्यक आहे. पालक, व्यवस्थापन आणि समाज या तिन्ही घटकांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारली नाही तर प्रत्येक नवीन आत्महत्या ही एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाची साक्ष ठरत राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

