Bits Pilani: 'ती' विद्यार्थिनी होती डिप्रेशनमध्ये? ‘बिट्स पिलानी’ मध्ये 14 महिन्‍यांत 6 जणांचा मृत्यू; न्‍यायालयीन चौकशीची होतेय मागणी

Bits Pilani Student Death: इलेक्ट्रॉनिक्स ॲण्‍ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात वैष्णवी शिकत होती. काल रात्री तिने आपल्‍या हॉस्‍टेलच्‍या रुममध्‍ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
Bits Pilani Student Death
Bits Pilani Student DeathDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव/वास्‍को: ‘‘आम्ही आमच्‍या विद्यार्थ्यांची सर्व काळजी घेतो’’ असा वारंवार दावा करणारी बिट्स पिलानी ही शैक्षणिक संस्‍था विद्यार्थ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून देत असल्‍याचे वैष्णवी जितेश (२०) या विद्यार्थिनीने केलेल्या आत्महत्येमुळे पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

सांकवाळ-झुवारीनगर (वास्‍को) येथील या शैक्षणिक संस्‍थेत गेल्‍या चौदा महिन्‍यांत सहा विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे. वैष्णवी ही एका वर्षापूर्वी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. याची पूर्ण कल्पना असतानाही बिट्स पिलानीच्या समुपदेशन केंद्रातील एकाही समुपदेशकाने कधी विचारपूस केली नाही हे उघड झाले आहे. या सर्व घटनांची न्‍यायालयीन समिती स्‍थापन करून चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

वैष्णवी ही मूळ बंगळूर येथील असून तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यावर तिचे वडील जितेश हे दुपारी गोव्यात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत वैष्णवीच्‍या मृतदेहाची चिकित्सा करण्‍यात आली. यावेळी या विभागाचे प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांनी ‘बिट्सच्या समुपदेशकांशी आपल्याला बोलायला पाहिजे’ असे सांगितल्यावर ‘या विद्यार्थिनीचे बिट्समध्ये कधी समुपदेशन केलेच नाही’ असे धक्कादायक उत्तर त्यांना व्यवस्थापनाकडून मिळाले.

इलेक्ट्रॉनिक्स ॲण्‍ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात वैष्णवी शिकत होती. काल रात्री तिने आपल्‍या हॉस्‍टेलच्‍या रुममध्‍ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्‍महत्‍येचे नेमके कारण समजू शकले नाही. वेर्णा पोलिसांना रात्री उशिरा फोन आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्‍हणून हे प्रकरण नोंद केले असून चौकशीला सुरुवात केली आहे.

जिल्‍हाधिकारी स्‍तरावर चौकशी : ॲग्‍ना क्‍लिटस

या घटनेची जिल्‍हाधिकारी स्‍तरावर चौकशी सुरू करण्‍यात आल्‍याची माहिती दक्षिण गोव्‍याच्‍या जिल्‍हाधिकारी ॲग्‍ना क्‍लिटस यांनी दिली. ‘बिट्‌स पिलानी’तील विद्यार्थ्यांच्‍या वाढत्‍या आत्‍महत्‍यांची दखल घेऊन प्रशासनाने नेमलेल्‍या समितीने या संस्‍थेची यापूर्वी तपासणी केली होती. त्‍यानंतर काही उपाययोजना अमलात आणण्‍याच्‍या सूचना संस्‍थेला करण्‍यात आल्‍या होत्‍या. या सूचनांची अंमलबजावणी करण्‍यात आली आहे असे त्‍यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात बिट्समधील समुपदेशन केंद्र हे असून नसल्‍यासारखे आहे हे आता स्पष्ट झाले आहे.

पंख्‍याला चादर बांधून ......

रविवारी रात्री वैष्णवी आपल्या खोलीचे दार उघडत नसल्याचे तिच्‍या मित्र-मैत्रिणींना कळताच त्‍यांनी कॅम्पसमधील एका कर्मचाऱ्याच्या सहकार्याने दार उघडले असता वैष्णवी पंख्‍याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली.

Bits Pilani Student Death
BITS Pilani: सहावा बळी! "आता आश्वासनं नको, न्यायालयीन चौकशी हवी", बिट्स पिलानीतील मृत्यूच्या सत्रावरून पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल

परीक्षेचा ताण नव्‍हता : हळर्णकर

वैष्णवीचे वडील जितेश यांनी सांगितले की, एक वर्षापूर्वी आपली मुलगी डिप्रेशनमध्ये गेली होती. बिट्स पिलानीने तिचा ताबा आमच्‍याकडे दिला होता. त्यानंतर तिच्यावर उपचारही सुरू झाले होते. नंतर या वर्षीच्या सेमिस्टरसाठी ती पुन्हा कॅम्पसमध्ये आली. परंतु तिच्‍याकडे कोणीच गांभीर्याने पाहिले नाही.

‘बिट्‌स पिलानी’चे जनसंपर्क अधिकारी अर्जुन हळर्णकर यांनी सांगितले की, सध्‍या संस्‍थे‍त कुठल्‍याही प्रकारच्‍या परीक्षा सुरू नाहीत. त्‍यामुळे परीक्षेच्‍या तणावाखाली येऊन वैष्‍णवीने आत्‍महत्‍या केली असे म्‍हणता येणार नाही.

Bits Pilani Student Death
BITS Pilani Bomb Threat: बिट्स पिलानीला पुन्हा मिळाली बॉम्बची धमकी, विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून काढले बाहेर

मागच्‍या वर्षी ती काही कारणांमुळे तणावाखाली आली होती. त्‍यानंतर तिच्‍यावर उपचार सुरू झाले होते. ती मानसिकदृष्‍ट्या सक्षम असल्‍याचे प्रमाणपत्र डॉक्‍टरांकडून सादर करण्‍यात आल्‍याने तिला पुन्‍हा हॉस्‍टेलमध्‍ये ॲडमिट करून घेतले होते. मात्र या विद्यार्थिनीने मानसिक आधारासाठी बिट्‌सच्‍या समुपदेशन केंद्राकडे कधीही संपर्क साधला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com