Opinion: उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे जीवन संपववण्याचे प्रमाण का वाढले आहे? पालकांनो सतर्क व्हा..

Depression Among Students: एका पाठोपाठ अशा होणाऱ्या या आत्महत्या पालकांना हाच सतर्क होण्याचा संदेश देत आहेत. आता या संदेशातून शिकायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवायला हवे.
Bits Pilani Rishi Nair
Bits Pilani Rishi NairDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

नुकतीच ‘बिट्स पिलानी’ संस्थेतील आणखी एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त वाचून बसलेला हादरा ओसरेपर्यंत गाझियाबादमध्ये तीन लहानग्या, सख्ख्या बहिणींनी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून केलेली आत्महत्येची बातमी झळकली.

एखादी गेम कोवळ्या मुलींना आत्महत्या करण्यास भाग पाडते, हे अनाकलनीय आहे. आपण कशाच्या प्रभावाखली आहोत आणि काय करत आहोत, हे न कळण्याचे त्यांचे वय होते. पण, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतात, तेव्हा त्यांना माहीत असते आपण काय करत आहोत व त्याचे परिणाम काय होणार आहेत.

‘बिट्स पिलानी’ ही देशातील एक नामवंत शिक्षणसंस्था. या संस्थेतील आत्महत्येचे हे सहावे प्रकरण. या संस्थेत प्रवेश मिळण्याकरता धडपड करणारे कितीतरी विद्यार्थी व त्यांचे पालक सापडतात.

चांगले गुण मिळालेल्यांनाच या संस्थेत प्रवेश मिळत असतो. म्हणजे ‘क्रीम ऑफ टाऊन’ असे ज्या विद्यार्थ्यांना आपण म्हणतो ते विद्यार्थी या संस्थेत सापडत असतात. असे असूनसुद्धा या संस्थेत १४ महिन्यांत सहा आत्महत्या का व्हाव्यात, हा प्रश्न पडतो.

ही समस्या फक्त ‘बिट्स पिलानी’ पुरती मर्यादित नाही. एकूणच उच्च शिक्षण क्षेत्रात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातही आयआयटी शाखेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक कॉलेजांमध्ये प्रथम आलेले या क्षेत्रात येतात. एकाच वर्गात दहा विद्यार्थी आपापल्या कॉलेजमध्ये पहिले आलेले असले, तरी आता एकच कुणीतरी पहिला येणार हे स्वाभाविक आहे.

त्यामुळे, इथे मन व अहंकार दुखावला जाण्याची शक्यता जास्त आहे. शैक्षणिक खर्चासाठी घेतलेले कर्ज हीसुद्धा एक बाजू आहे. इथे कमी मार्क मिळवणे याचा परिणाम अनेक ‘अर्थां’नी जाणवतो. खास करून सीएसआयएस किंवा काही खास व्याजमुक्त कर्जयोजना या बहुतांशी गुणवत्तेकडे जोडलेल्या असतात.

तिथे बॅकलॉग परवडत नाही. यातून ताण येणे स्वाभाविक आहे. पण, प्रत्येक ताण असलेला विद्यार्थी काही आत्महत्या करत नाही. तरीही हे लोण आता सगळीकडे पोहोचलेले दिसत आहे. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गहन होत चालला आहे. आणि विद्यार्थ्यांत निर्माण होत चाललेले ‘डिप्रेशन’ हे या समस्येचे खरे मूळ आहे.

‘डिप्रेशन’ म्हणजे काय तर नकारात्मक वृत्ती. आयुष्याकडे नकारात्मकदृष्ट्या बघितल्यावर डिप्रेशन यायला लागले. मग ही उमलती फुले ज्यांच्यासमोर उभे आयुष्य आहे ती या डिप्रेशनची शिकार का बनतात, हा प्रश्न उपस्थित होतो.

सगळे काही चांगले असूनसुद्धा यांच्यात नकारात्मक वृत्ती कशी काय भिनते याचेही आश्चर्य वाटायला लागते. पण आढावा घेतल्यास याला पालकांचे अतिलाड, सामाजिक घटक, वाढत चाललेली चैनीची साधने, विद्यार्थ्यांमध्ये असलेला ‘फायटिंग स्पिरिट’चा अभाव यांसारख्या अनेक बाबी जबाबदार असल्याचे दिसून येते.

आजचे पालक आपल्या मुलांना काही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र धडपडत असतात. त्यामुळे मुलेही मग आपले सगळे काही चांगले होणार असे गृहीत धरून बसतात. आणि मग कधी मनासारखे झाले नाही, की चडफडायला लागतात.

आयुष्य हे नेहमीच काही ‘फुलांचा गुच्छ’ नसते; कधीकधी काट्यांवरूनही चालावे लागते. पण याची जाणीव नसलेले किंवा तशी मनाची तयारी न ठेवणारे मग विपरीत प्रसंग आले, की खचतात आणि हळूहळू ‘डिप्रेशन’चे शिकार बनायला लागतात.

त्याचबरोबर चैनीच्या साधनांचा अतिवापरही मनाला कमकुवत बनवायला लागला आहे. मोबाइल हे याचे जितेजागते उदाहरण. ‘जिथे जाशील तिथे तू माझा सांगाती’ अशी मोबाइलबाबत हल्लीच्या युवकांची धारणा बनायाला लागली आहे. कधीही बघा युवकांच्या हातात मोबाइल असतोच. एखाद्या वेळी जेवण नसले तरी चालेल पण मोबाइल हवाच अशी युवकांची मनोवृत्ती बनायला

लागली आहे. पण मोबाइल जेवढा बरा तेवढा घातकही असतो. मोबाइलच्या अतिवापरामुळे माणसाची विचारशक्ती मंदावायला लागते आणि यातूनच मग नकारार्थी प्रवृत्ती जन्माला यायला लागते.

Bits Pilani Rishi Nair
Bits Pilani: गोव्यातील बिट्सचे विद्यार्थीच 'का' तणावाखाली येतात? 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू प्रकरणावरून आपचा सवाल

आजच्या युवा पिढीला मागेल ती वस्तू मिळत असल्यामुळे ‘दिल मांगे मोअर’ अशी त्यांची स्थिती होत चालली आहे. आणि यामुळेच अनेक युवक आज ‘डिप्रेशना’ची वाट चालताना दिसायला लागले आहेत. सगळे ’रेडीमेड’ मिळत असल्यामुळे त्यांच्यातील लढण्याची प्रवृत्तीही लोप पावायला लागली आहे.

आता यावर समुपदेशन हा एक उपाय वापरला जातो. पण ही तात्पुरती मलमपट्टी झाली. मनाची शक्ती वाढवून सकारात्मक वृत्तीचे बी रुजविणे महत्त्वाचे. ही वृत्ती केवळ तरुण वयातच नव्हे तर आयुष्यभर कामाला येऊ शकते.

Bits Pilani Rishi Nair
Bits Pilani Student Death: 4 महिने चौकशी रखडलेलीच! बिट्स पिलानी ऋषी नायर मृत्यू प्रकरण; फॉरेन्सिक रिपोर्ट प्रलंबित

त्यातून मनाची उत्तम मशागतही होऊ शकते. याकरता पालकांनी मुलांना मागेल ते देण्यापेक्षा त्यांना आयुष्याला भिडण्याचे शिक्षण द्यायला हवे. येणाऱ्या संभाव्य उतारचढावांना तोंड देण्याची शक्ती त्यांच्यात निर्माण केली पाहिजे. आणि असे झाले तर ‘डिप्रेशन’ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही.

‘बिट्स पिलानी’मध्ये एका पाठोपाठ अशा होणाऱ्या या आत्महत्या पालकांना हाच सतर्क होण्याचा संदेश देत आहेत. आता या संदेशातून शिकायचे की नाही हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. पण आणखी उशीर होण्यापेक्षा या आत्महत्यांचा बोध घेऊन पालकांनी व पाल्यांनी योग्य मार्ग स्वीकारला तर राज्यात वाढत चाललेले आत्महत्येचे प्रमाण कमी होऊ शकेल एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com