Stray Cows: रोज अपघात होताहेत, गायी - वाहनचालकांचे जीव जाताहेत; भटक्या गुरांच्या समस्येबद्दल काय करता येईल? वाचा..

Stray Cows Goa: आज गावोगाव व छोट्या शहरांमध्ये रस्त्यावर भटक्या गाईंची समस्या गंभीर होत चालली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंमुळे दररोज अपघात होतात.
Stray Cattles
Stray AnimalsDainik Gomantak
Published on
Updated on

हितेंद्र श. भट

काही दिवसांपूर्वी भटक्या श्वानांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा आदेश दिला. त्या आधी दिलेल्या आपल्या निवाड्यात बदल करत भटक्या श्वानांना एका जागी बंदिस्त न ठेवता त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना परत त्याच जागी सोडावे असा आदेश दिला. यासाठी प्राणीप्रेमी संघटनांनी पुढाकार घेतला होता. भटक्या गुरांबद्दल गोप्रेमी संघटना, गोशाळा चालविणाऱ्या संस्था यांनीही अनेकदा आपल्या समस्या वृत्तपत्रांत मांडल्या होत्या. एक गोप्रेमी असल्यामुळे मला जे वाटते ते सांगण्याचा हा एक प्रयत्न.

भारतीय संस्कृतीत गाय ही माता मानली गेली आहे. प्रतीकात्मक रूपाने, गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास असतो असेही म्हटले जाते. वेदामध्ये तिला कामधेनू संबोधले असून तिचे रक्षण करणे हे धर्म, विज्ञान आणि पर्यावरण याचे एकत्रित कर्तव्य आहे. आज गावोगाव व छोट्या शहरांमध्ये रस्त्यावर भटक्या गाईंची समस्या गंभीर होत चालली आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंमुळे दररोज अपघात होतात. गाईंचे जीव जातात व वाहनचालकांचे प्राण धोक्यात येतात. कचऱ्यातून प्लास्टिक खाल्ल्याने अनेक गाईंचा मृत्यूही होतो.

आमच्या गोव्यातदेखील याच समस्या आहेत. व ह्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत :

१)गाईला केवळ ‘दूध देणारा एक प्राणी’ अशी पद्धतशीरपणे पटवून दिलेली गोष्ट आहे. देशी गाई कमी दूध देतात त्यापेक्षा विदेशी गाई (जर्सी होस्टीन) चांगल्या हे इथल्या शेतकऱ्यांना सांगितले गेले (भारतीय गोधन व संस्कृती संपवण्याचा एक पद्धतशीरपणे केलेला विदेशी कंपन्यांचा व विकसित देशांचा कट). २)गाई पाळणे, शेती करणे हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे; त्यापेक्षा सरकारी, निमसरकारी नोकरी करणे श्रेष्ठ असे लोकांचे बनलेले मत. ३) शेतजमिनीचे रूपांतरण, गावागावांत असलेली गाई चरायची कुरणे, कोमुनिदादच्या जमिनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणी व धनदांडग्यांनी काँक्रीटच्या जंगलात रूपांतरित केल्या.

४) शेते नाहीत तर मग बैल काय कामाचे; त्यांना मग कसायांना विकणे, दूध देत नसेल तर गाईचा काय उपयोग म्हणून रस्त्यावर सोडून देणे हे प्रकार सर्रास घडतात. गाई पाळायचा खर्च जास्त येतो; हिरवा चारा उपलब्ध नसणे, त्यामुळे लोकांनी घरातील लक्ष्मीला रस्त्यावर सोडले. ५) गाई पाळणे म्हणजे एक जबाबदारी; त्यापेक्षा कुत्री मांजरे पाळणे बरे असा एक समज दृढ झाल आहे. शेती नाही म्हटल्यावर गाईचे शेण, गोमूत्र कुठे टाकायचे ही एक समस्या ६)ज्यांच्याकडे जागा आहे त्यांना गाई पाळायच्या नाहीत व ज्यांची इच्छा आहे त्यांच्याकडे जागा नाही, असेही त्रांगडे आहे.

आमच्या घरी गेल्या पन्नास वर्षांपासून गाई, म्हशी आहेत. माझी आई त्यांची सगळी सेवा करते. त्या संस्कारामुळेच मलाही गोसेवा करायला आवडते. या कार्यात मार्गदर्शन घेण्यासाठी मी गोव्यातील शिकेरी, मये, वाळपई, या गोशाळांना भेटी देत असतो. ह्या गोशाळांमध्ये सुरुवातीला भटक्या गुरांना, कत्तलखान्यातून सोडवलेल्या गुरांना नेत असत.

हळूहळू सरकारने, ग्रामपंचायतींनी, महानगरपालिकांनी आपआपल्या हद्दीतील भटक्या गुरांना नेण्यासाठी काही सरकारी योजना सुरू केल्या व आता उत्तर गोव्यातील कितीतरी पंचायती आपल्या गुरांना शिकेरी गोशाळेत पाठवतात. वाटेवर अपघातात बळी पडलेल्या गुरांनाही शिकेरी गोशाळेत आणले जाते. सरकार मदत करत आहे, देणगीदार देणग्या देत आहेत; पण जागा अपुरी असल्याकारणाने सर्व सुविधा गाईंना देणे शक्य होत नाही. त्याशिवाय, गावातल्या लोकांच्या तक्रारी आहेतच!

या सर्व समस्यांवर मला वाटत असलेले उपाय करणे शक्य आहे :

१) गावागावांत असलेल्या सर्व गोप्रेमींनी एकत्र येऊन छोट्या संस्था उभाराव्यात. गाईबद्दलची विज्ञाननिष्ठ माहिती, देशी गाईंच्या दुधाचे फायदे, गोमूत्र व शेणाचे महत्त्व शाळा कॉलेजमधील युवा पिढीला समजावून सांगणे. २) गावागावांत असलेल्या मोकळ्या जागा, सरकारी जागा सोसायट्यांमध्ये छोट्या छोट्या २ ते १० गाईंना पुरेल एवढ्या गोशाळा उभारणे. गावातील पडीक शेतजमीन शेतमालकाकडून भाड्याने घेऊन तिथे चारा लावणे. पंचायतीच्या मदतीने लाइट, पाण्याची व्यवस्था करणे. शक्य असल्यास गोबर गॅस, धूप, अगरबत्ती, खत उत्पादन, गोमूत्र अर्क तयार करायला स्वयंसाहाय्य गट बनवणे. त्यायोगे छोट्या प्रमाणात का होईना, गावात रोजगार उपलब्ध करणे.

३) देशी गाईचे दूध ८० ते १०० रुपयांना विकले जाते. शुद्ध तूप १,००० ते ३,००० प्रति किलो विकले जाते. गोमूत्र अर्क १०० रुपये लीटर, तर खत २५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकले जाते. हे जर सर्व गोवेकरांना गोव्यातच मिळायला लागले तर गोवा या सर्व बाबतीत आत्मनिर्भर बनेल व एक आदर्श राज्य बनायला वेळ लागणार नाही. ४) प्रत्येक गाव, वस्ती यांनी गाई दत्तक घेण्याची योजना राबवावी. नागरिकांनी थोडा, अंशतः निधी दिला तर गोपालन सोपे होईल. ५) आपण प्रत्येकाने एका भटक्या गाईची जबाबदारी घेणे.

Stray Cattles
Goa Stray Cattles: मोकाट गुरांना वाली कोण? रस्त्यांवरील अपघातांत वाढ; पालिका, पंचायतींचा काणाडोळा

सुपीक जमिनींचे रूपांतरण, कोमुनिदादच्या सामूहिक सहभागातून कसायच्या जमिनींची विक्री किंवा होणारे अतिक्रमण, गाई-बैल कसायाला विकणे, शेती न करता जमीन पडीक ठेवणे, डोंगर कापणे, वृक्षतोड, भटकी गुरे, त्यांचे होणारे अपघात या सर्व समस्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कृषी व गोपालन यांचा अव्हेर केल्याने, दूर सारल्याने या सर्व समस्या एकातून एक करत निर्माण झालेल्या आहेत. या परस्परांवर अवलंबूल असलेल्या समस्यांचे समाधानही गोधनाच्या संरक्षणात सापडते. गोधनाचे संरक्षण झाल्यास कदाचित इतर समस्याही सुटू शकतील. निदान तसा विचार करणे सुरू होईल.

Stray Cattles
Valpoi Stray Animals: 'एवढी गुरे येतात तरी कुठून'? टेम्पो उलटून गेला खड्ड्यात; वाळपईत भटक्या जनावरांमुळे वाढते अपघात

गुरांच्या या समस्या सोडवण्यासाठी अनेक लोकांना माझ्यासारखे वेगवेगळे उपाय माहिती असतीलच, कार्य करायची इच्छाही असेल; मी सर्व अशा गोप्रेमी नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही पुढे या, संघटित होऊया व गाईचे संरक्षण, संगोपन करूया. एकत्रित होऊन कार्य केल्यास यश नक्कीच मिळेल! या कार्यात सहभागी व्हायची इच्छा असल्यास जरूर संपर्क करा, ही विनंती!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com