Spring Season: सूर्य सात घोड्यांच्या रथात बसून पृथ्वीकडे निघतो, वृक्षवल्लींच्या कुंजवनात 'वसंताचा विहार'

Spring season in india: या वसंताला मधुर आंबा, रसाळ फणस, सुवास देणारे अननस, चुरण, करवंद, जांभूळ, चार, भेसड हे वृक्ष, वेली, झुडपे आपल्या अंगावर फुला-फळांचा बहर आणून प्रसन्न करून घेतात. सुरंग, कस्तुरी, मोगरा, भुईचाफा त्याला खूश करण्यास फुलून आपला सुगंधित दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचवतात.
spring season in india
spring season in indiaDainik Gomantak
Published on
Updated on

मधू य. ना. गावकर

दसरा, दिवाळी आली म्हणजे वर्षा ऋतू निरोप घेतो आणि हिवाळ्याला सुरुवात होते. दक्षिणायनातील सूर्याची किरणे तिरपी होऊन एखाद्या बागायतीमधील सुपारी, माड, अगर झाडांच्या उभ्या बुंध्यावर ती पडल्याने त्या रखरखीत उन्हाची ऊर्जा लागून तो भाग करपून जातो. थंडीने गारठणारा माणूस अगर जनावर सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेऊन शरीराला ऊर्जा देतात.

हिवाळ्याचा हा खेळ चालू असताना, उत्तर गोलार्धात पाण्याचे साठे बर्फाचे रूप घेतात. त्यामुळे, तिथे वावरणाऱ्या पक्ष्यांना थंडीला सामोरे जावे लागते आणि अन्नाचा तुटवडा भासल्याने पाहुणे पक्षी पोटासाठी भारतातील पाणथळांच्या जागी हजारो किमीचा प्रवास करून येतात. भारताचा पश्चिम किनारा अरबी समुद्र आणि पश्चिम घाटाने व्यापलेला असून त्यातून शेकडो लहान मोठ्या नद्या, खाडी अरबी समुद्राला मिळतात.

त्याने पश्चिमेतील नद्या आणि अरबी समुद्र मत्स्यधनाचे कोठार बनले आहे. म्हणून पक्षी जास्त प्रमाणात पश्चिम भारतात येतात. ते दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला हजेरी लावून उत्तर गोलार्धातील थंडीला रामराम करतात आणि शिवरात्री आली म्हणजे मायदेशी जातात. उन्हाळा सुरू होऊन वसंताच्या आगमनाची चाहूल प्रथम पक्ष्यांना लागते.

तशाच प्रकारे पावसाची चाहूल पक्षी, बेडूक, कीटक, कोल्हे यांना प्रथम लागते. म्हणजे पर्यावरणाचे खरे तज्ज्ञ ते आहेत! इवलीशी मुंगी, पण पावसाळा कधी सुरू होणार हे तिला प्रथम समजते व ती ‘पुरूमेता’च्या, धान्य साठवण्याच्या तयारीला लागते.

तशाच प्रकारे सहा ऋतूंचे सहा सोहळे प्रथम वृक्षवल्लींना समजतात. सर्व ऋतू आपापल्या सोहळ्यात बेभान होऊन नाचतात. मात्र वसंत ऋतू हा सर्वात जास्त रंगपंचमी साजरी करतो. तो नाचताना माणूस त्याचे रूप वृक्षवल्लीत पाहतो आणि आपणही रंगांची उधळण करतो.

गोफ, वीरभद्र, तालगडी, लेझीम, मोरूलो अशा प्रकारचे अनेक खेळ खेळत रंगाची उधळण करीत वसंताच्या सोहळ्यात सामील होतो.

वसंत ऋतूचे आगमन होणार हे सांगणारी बारा अमावास्येची आई संक्रांती वसंताचे सांगणे घेऊन येते. ती सुगड आणि तिळगूळ वाटून वृक्षवल्लीचा निरोप घेते. वसंत म्हणजे सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथात बसून त्याला पृथ्वीकडे घेऊन येण्यास सात दिवस रात्री लागतात, म्हणजे अमावास्या ते पुढे येणारी रथसप्तमी.

येणाऱ्या वसंतावर जरी आपल्या शृंगाराचा वर्षाव करण्यास कांदळ, अडुळसा, केवडा, बकुळी, अबोली, गोठला यांना मिळाले नाही किंवा वसंताचे स्वागत करण्यास मिळाले नाही, तरी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपले काही शृंगार त्यांची झुडपे मागे ठेवतात. वसंताच्या आगमनात त्याला प्रसन्न करून घेण्यास फुलणारी सुरंगी आणि बुरंगी आपला दरवळ वाऱ्याच्या झोतात सोडून वसंताच्या नाकापर्यंत पोचवण्यास यशस्वी होतात. त्याने दूरवर असणारी कांदळ, अबोली, अडुळसा हिरमुसला होतो.

हिवाळ्यातील नोव्हेंबर महिना येताच काजूचे झाड आपल्या फांदीवर नकळत मोहराला जन्म देते आणि महिन्याभरात त्या तांबड्या पिवळ्या फुलांतून कोवळ्या बियांचा जन्म होतो, पुढे रथसप्तमीला त्या कोवळ्या बियांचे रूपांतर तांबड्या अगर पिवळ्या रंगाच्या फळांत होऊन ते रसाळ पीक वसंताचे स्वागत करते.

आंब्याचे झाड आपल्या अंगावर पिवळा मोहर लेपून त्याचा सुगंध सकाळच्या प्रहरी वाऱ्याच्या मंद संगतीने कोकिळेच्या मधुर स्वरांच्या विलापातून वसंताकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करते. थंडीच्या कडाक्यात पिकलेली कणेर, हासळ, जाम, फातरफळ या रानमेव्याने जरी निरोप घेतला, तरी चुकून मागे राहिलेला हा रानमेवा त्याला वंदून लाडक्या प्रेमिकांचा निरोप घेतात.

वसंत येणार म्हणून शामली, पळस, कर्ण, लाल चाफा, रतन अबोली आपल्यातील लाल रंगाची उधळण करून वसंताचा मंडप सजवण्यास पक्ष्यांना बोलावत त्यांना मधाची शर्करा देऊन कृष्णाच्या कुंजविहारी खेळ खेळण्यास सांगतात. मोती रंगाचे मधुर चूरण देणारे झुडूप, काटेरी अंगाने व्यापलेले करवंदीचे हिरवे झुडूप आणि तिची बहीण कुसडी वसंताला आपल्या प्रेमपाशात ओढण्यासाठी सफेद फुलांच्या शृंगाराने नटून वसंताची नजर आपल्याकडे खेचतात.

हिरवी उंच जांभूळ, झुडपाने जमलेली भेसड, परस बागेतला कृष्णकांत आपला निळा, जांभळा शृंगारशेला पांघरून कृष्णरूपात त्याला आलिंगन देण्यास आसुसतो.

भगवा रंग परिधान करणारा हिरवा शंकर मुळातून जटा वर आल्याप्रमाणे फांद्या पसरवून वसंताची नजर भगव्या रंगाकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. अननसाचे हिरवे झुडूप वसंताच्या स्वागतासाठी आपल्या डोक्यावर लाल तुरा फुलवून त्यात बारीक निळ्या सुमनांची रांगोळी भरते. माळरानात उभा राहणारा मोठ्या पानांचा चार वसंताच्या स्वागतासाठी आपल्या फांद्यातून पिवळे चवर आकाराचे मोहर सोडून वसंताला वारा घालतो.

उसकी झुडपाची फारच धावपळ पाहावयास मिळते. ते झुडूप लहान आकाराने जन्म घेत मोठे होते. आपल्या शक्तीने भल्या मोठ्या वृक्षावर चढून त्यावर पोपटी, पिवळी सुंदर फुलांचा दाट मंडप उभारून वसंतासाठी आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करते.

रुईचे झुडूप जरी लहान असले तरी ते आपल्या शक्तीने हाताच्या पंजाएवढ्या आकाराचे पान करून त्या फांदीवर वसंताच्या पायात घुंगरू बांधण्यासाठी दाट गुच्छांचे निळ्या सफेद फुलांचा बहर आणते. घरासमोर लावलेली जास्वंदी आपल्या हिरव्या अंगातून वसंताला आवडणारा लालभडक रंग आपल्या फुलातून देते.

बिंबलीचे पोपटी रंगाचे बारीक पानांचे झाड आपल्या मुळापासून वरपर्यंत तांबड्या पीक फुलांचे तुरे फुलवून वसंताच्या मंडपाचा खांब सजवते. करमलीचे हिरवे झाड आपल्या फांद्यावर निळ्या फुलांचे तुरे फुलवून त्यात आपल्या अंगावरील पिवळी पाने भरून साध्या मंडपाची सजावट करते.

उंच सातीण वसंताला आपल्या पालवीने वारा घालतो. हिरवे रूप घेतलेला वड आपल्या पारंब्या खाली सोडून त्याला आलिंगन देण्याचा प्रयत्न करतो. आकाशाला भिडणारा पिंपळ वाऱ्याच्या सुरात सामील होऊन सळसळ आवाजाने त्याच्यावर आपली पाने टाकीत वर्षाव करतो.

spring season in india
Betaki Khandola: सफर गोव्याची! गावकऱ्यांनी पाण्यासाठी मुलीचा बळी दिल्याची दंतकथा; विहंगम 'बेतकी'

शेतातील मळ्यात फुलणारा तांबडा, पिवळा, गुलाबी झेंडू भुंग्याच्या मदतीने वसंताला त्याच्या स्वागताचा निरोप पाठवतो. हे सारे मंडप सजवीत असताना त्याला वसंताच्या भुकेची आठवण राहत नाही. त्याचा फायदा घेण्यास टपलेली शबरीची बोरे, धनुष्य आकृतीची चिंच, बकुळीची फळे घेऊन हे वृक्ष वसंताच्या राजवाड्यात प्रवेशतात.

त्यात धावत पळत येणारी तोरींगही सामील होते. हे काजू वृक्षाच्या लक्षात येताच तो रथसप्तमीला आपल्या अंगावर लाल, पिवळ्या बोंडातील मादक सोमरस त्याला देण्यास सुरुवात करतो. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी त्याला मदिरा हे नाव ठेवले.

spring season in india
Dongri: सफर गोव्याची! इंत्रूज म्हणजेच चैतन्याची सळसळ, आनंदाची चळवळ; मोहक 'डोंगरी'

राम वनवासात असताना झाडांची फळे आणि कंदमुळे खाऊन चौदा वर्षांचा वनवास संपवला. शबरीने रामरूपी वसंताला गोड बोरे दिली. अशा या वसंताला मधुर आंबा, रसाळ फणस, सुवास देणारे अननस, चुरण, करवंद, जांभूळ, चार, भेसड हे वृक्ष, वेली, झुडपे आपल्या अंगावर फुला-फळांचा बहर आणून प्रसन्न करून घेतात.

सुरंग, कस्तुरी, मोगरा, भुईचाफा त्याला खूश करण्यास फुलून आपला सुगंधित दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचवतात. या धावपळीत त्याचे दोन महिने कसे गेले याचे भान त्याला राहत नाही. तो भानावर येण्यास गुलमोहर फुलतो आणि त्याला पावसाच्या काळ्या ढगांचे छत्र आपल्यावर पडून तुझ्यासाठी सजवलेला मंडप वर्षाने मोडून टाकला म्हणत, वसंताला परत जाण्यास सांगतो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com