

मांंडवीच्या तीरावर म्हणा किंवा तिच्या कुशीत विसावलेला म्हणजे माझा बेतकी गांव. शेती बागायतीने संपन्न, पूर्वजांनी घाम कष्टानी कुळागरे वसविली.आजपर्यंत त्याचा फायदा आमच्या पिढीला होतो. हिरवीगार शेती एकावेळी करणे शक्य होते, पण आता मातीत उतरून कोणालाही शेती करावे असे वाटत नाही.
प्रत्येकाला पांढरपेशी नोकरी हवी आहे. जेव्हा शेतीची मळणी होत असे तेव्हा मला वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जावे लागे. शेत घरापासून दूर होते. शेताला लागून असलेल्या बांधावरून जावे लागे. मध्ये मध्ये हा बांध तुटला होता तिथे कसरत करावी लागत असे.
बांधावरचे माड शेजारच्या मांडवी नदीत जणूकाही आपले नित्यनेमाने रूप बघत असावेत.आमचं घर नदीच्या तीरावरच. तिथून दुसरा काठ दिसत असे. त्याला माळणी असे नाव होते.
तिथे दिवसरात्र जहाजांमध्ये खनिज भरण्याचे काम चालत असे. संध्याकाळी होडीत बसून माझ्या मित्राबरोबर दुसऱ्या तीरावर फिरायला जाण्याला फार मजा येत असे. दुसरं एक विहंगम दृश्य इथे पाहायला मिळत असे.
ते म्हणजे पांढऱ्या शुभ्र रंगाचे बगळ्यांचे थवे एका मागोमाग बहुतेक आपल्या घरी परतत असत. कधी कधी माणसाचा क्रूरपणा शिकार करून या सुंदर अशा दृश्याचा बेरंग करीत असे. नदीच्या पात्रात फडफडत पांढरे शुभ्र बगळे रक्ताच्या थारोळ्यात पडत असत.
निष्पाप कोवळ्या जीवांचा बळी घेऊन माणूस आपल्या जिभेचे चोचले पुरवीत असे. आजही आपण निर्दयपणे पुढचा मागचा विचार न करता निसर्ग दोन्ही हातांनी लुबाडत आहोत.
गावाच्या जवळ काँक्रिटचं जंगल उभे राहत असताना आमचा बेतकी गाव मात्र त्याला अपवाद आहे. घरं सुधारली आहेत, नवीन घरे बांधली आहेत, पण क्रॉंक्रीटचे जंगल उभे केले नाही. गावकरी जमेल तसे आपल्या जमिनी कसत आहेत. कुळागरे बागायती काजूच्या आंब्याच्या बागा सांभाळून आहेत. काळ बदलला तसा शेतात काम करायला माणसे मिळत नाहीत.
त्यामुळे शेती घटली आहे.तरीही जमेल तशी शेती केली जाते. एकदा पूर्वी गावात दुष्काळ पडला होता. गावकऱ्यांनी एका मुलीचा पाण्यासाठी बळी दिला, अशी दंतकथा आहे. तिच्या आईने गांव चोवीस वर्षे पडीक पडेल म्हणून शाप दिला होता.
तिला शोधून काढून चोवीस तासांचा उःशाप मिळवण्यात गांवकरी यशस्वी झाले. आजही गांवात एप्रिल मे महिन्यात देवीला प्रसाद लावून देवीने सांगितलेल्या दिवशी गावात कोणी तांदळाचा भात खात नाहीत.जी पाण्यासाठी बळी गेली मंडोदरी देवी.
आज देवीचे छान असे मंदिर उभे आहे. जुन्या काळात गावात मनोरंजनाचे काही साधन नव्हते. सत्यनारायण पूजेनिमित्त होणारी दोन ऐतिहासिक नाटके आणि एक सामाजिक नाटक, शिगम्याच्या उत्सवाला दोन सामाजिक नाटके, गावचा काला शिगमोत्सव लोकांचे मनोरंजन करीत.
ह्या नाटकात काम करणारे गणेश सावईकर, राजाराम फडते आदी कलाकार आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या स्मृती आज पण जनमानसात आहेत.मी गावापासून फार दूर नाही, असे असूनही मला गावाचा दुरावा नेहमीच जाणवतो.जे आपल्यापाशी असते त्याचे महत्व आपणाला कळत नाही. दूर गेले की, ते हवेहवेसे वाटते हाच तर माणसाचा स्वभाव.
उमाकांत शेटये
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.