Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

Goan Traditional Solkadhi: सोलकढीची एक गंमत आहे. ती अशी की-तुम्ही जेवणाच्या आधी भूक अधिक प्रज्वलित व्हावी म्हणून सोलकढी घेऊ शकता. भूक चांगली लागेल, याची हमखास गॅरंटी.
Solkadhi benefits, Goan solkadhi, Traditional solkadhi
Solkadhi benefits, Goan solkadhi, Traditional solkadhiDainik Gomantak
Published on
Updated on

सोलकढीची एक गंमत आहे. ती अशी की-तुम्ही जेवणाच्या आधी भूक अधिक प्रज्वलित व्हावी म्हणून सोलकढी घेऊ शकता. भूक चांगली लागेल, याची हमखास गॅरंटी. जेवणात भाताबरोबर कालवायला म्हणून घेऊ शकता-आणि जेवण अधिक सामिष, अधिक खुलून येतं. आणि जर जेवण थोडं जास्त झालं, किंचित अंमळ जास्तच झालं, आणि पोटाला तडस लागली-तर नक्कीच जिरवण म्हणून सोलकढी घ्यायलाच हवी.

या सोलकढीला कुठलाच प्रहर, कुठलाच स्वर वर्ज्य नाही-असं म्हणा ना! जेवणाच्या ताटात कडेकडेने वाहणारी सोलकढी ही गोवन आहारशास्त्रातली एक प्रवाही रीत आहे. गोव्यात लहान बाळाला ‘लावण’-म्हणजे पहिला घास-भरवला जातो. तो पहिला घास काऊ-चिऊचा नसतो, तर शीतकढीचा असतो.

आणि हा पहिला घास घेतला की त्या लहान बाळाचा गोमंतकीय गोत्रात यथोचित प्रवेश होतो. पुढे आयुष्यभर त्याच्या धमन्यांमधून ही सोलकढी-त्यातल्या नारळाच्या दाट रसासारखी-अगदी रसरसून वाहत राहते.

सोलकढीसाठी लागणारे जिन्नस अगदी माफक असतात-

भिरंडे, मीठ, हिंग (शंकर छाप हिंग धडाधड घातलेला!) आणि ताज्या नारळाचा रस, म्हणजे नारळाचं दूध. हे झालं बेसिक.

त्यात ‘गोल्ड’, ‘प्रो’ आणि ‘अल्ट्रा प्रो’ आवृत्ती हवी असेल, तर बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि लसूण (शाकाहारी नको असेल तर) अधिक रंगत आणतात.

थोडं अधिक पाचक हवं असेल तर ओवा, जिरं-हे तर येतंच येतं. सोलकढीचे प्रकारही काही कमी नाहीत. फुटीकढी किंवा तिवळ (बिनरसाची कढी), लसणीची कढी, ओवा-जिराकढी, गंजनकढी (म्हणजे गवती चहा), तिरफळाची कढी (हिरवी तिरफळं मात्र हवीत!), लाल मिरचीची कढी, फोडणीची कढी-

या फोडणीच्या कढीत सोलकढीला करविलाची पानं (कढीपत्ता), हिरवी मिरची आणि मोहरी (राई) यांची मस्त फोडणी दिली जाते.

गोमंतकीय गृहिणीचं एक खास कौशल्य म्हणजे-नारळ जर किंचित लागला, तर त्यावर योग्य वेळी दिलेली फोडणी!

अशा वेळी ही ‘चर्चरित’ फोडणी सोलकढीची चव आणखीनच खुलवते. हे सगळं झालं चवीचं. पण आरोग्यदृष्ट्याही सोलकढीचं योगदान काही कमी नाही. ही सोलकढी उष्णता कमी करते, पचन सुधारते, तोंडाची चव आणते, वातावर (ओवा-हिंग घालून) गुणकारी ठरते आणि भूक प्रज्वलित करते.

Solkadhi benefits, Goan solkadhi, Traditional solkadhi
Unique food in Goa: फिश करी ते फेणीपर्यंत! गोव्यातील अस्सल खाद्यसंस्कृतीची सफर

एक नाही-अनेक फायदे!

गोव्यातलं आयुष्य आनंदी आणि प्रवाही असतं. हा प्रवाह जर एखाद्या निरूपणकाराच्या ओघवत्या शब्दांत सांगायचा झाला, तर काय सांगावं महाराजा! वाटीतली सोलकढी जितकी सहज ताटात येते, आणि ते ताट ओठाला लावून अलगद पोटात उतरते-

तितक्याच अलगदपणे हा जीवनप्रवाह तुम्हांला संसाररूपी भवसागर तरून नेतो. फरक इतकाच की- अध्यात्म पचवायला नाम लागतं, आणि उदरभरणाच्या संतुष्टीसाठी सोलकढीचं आचमन लागतं.

Solkadhi benefits, Goan solkadhi, Traditional solkadhi
गोव्यात 95 हेक्टर क्षेत्रफळात कोकमची लागवड; 824 टन उत्पादन; सर्वाधिक लागवड सांगे परिसरात

असं म्हणतात की पहाटेची झोप ही साखरझोप असते, आणि या साखरझोपेत पडणारी स्वप्नं गुलाबी असतात. किंचित अतिशयोक्ती होईल, पण राहवत नाही-

गोंयकाराची ही पहाटेची स्वप्नं थोडी अधिक दाट गुलाबी असतात. कारण त्यात सोलकढीतल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा अगदी बेमालूमपणे मिसळलेला असतो!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com